कनिमोळी यांना चेन्नईतच विचारलं, 'तुम्ही भारतीय आहात का?'

द्रमुक पक्षाच्या खासदार कनिमोळी यांना चेन्नई विमानतळावर अजब प्रश्नांना सामोरं जावं लागलं आणि त्याबाबत त्यांनी ट्विटरवरून खंत व्यक्त केलीय.

चेन्नई विमानतळावर तैनात असलेल्या CISF च्या महिला कॉन्स्टेबलनं कनिमोळी यांना हिंदीतून काही माहिती विचारली. कनिमोळी यांनी त्या महिला कॉन्स्टेबलला म्हटलं की, "मला हिंदी येत नाही. त्यामुळे तुम्हाला जे विचारायचं आहे, ते इंग्रजी किंवा तामिळमधून विचारा."

तेव्हा CISF च्या महिला कॉन्स्टेबलनं कनिमोळी यांना विचारलं, "तुम्ही भारतीय आहात का?"

कनिमोळी यांनी हा प्रसंग ट्विटरवरून सांगितला आहे आणि प्रश्नही उपस्थित केलाय की, "मला जाणून घ्यायचंय की, हिंदी येणं म्हणजे भारतीय असणं हे कधीपासून ठरलं?"

या ट्वीटसोबत कनिमोळी यांनी #hindiimposition हा हॅशटॅगही वापरला आहे.

कनिमोळी यांच्या ट्वीटखाली बऱ्याच जणांनी महिला कॉन्स्टेबलवर टीका केलीय.

CISF कडून तातडीनं दखल

कनिमोळी यांच्याबाबत घडलेल्या घटनेची चौकशी करण्याच आदेश CISF नं दिले आहेत. विशिष्ट भाषेबाबत CISF चं कोणतेही धोरण नाही, असं CISF च्या मुख्यालयानं कनिमोळी यांच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलंय.

CISF नं तातडीने आपल्या ट्वीटची दखल घेतली, याबाबत कनिमोळी यांनी ट्विटरवरून आभारही मानले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)