कोरोना अहमदाबाद: कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील कोरोना रुग्णालयात आग लागण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

अहमदाबादमधील नवरंगपुरा भागातील रुग्णालयात पहाटे तीन वाजता आग लागली, अशी माहिती अहमदाबादचे अतिरिक्त मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश भट्ट यांनी बीबीसीला दिली.

आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं अग्निशम दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आग लागली तेव्हा हॉस्पिटलमधील कर्मचारी पीपीई किट घालून काम करत होते.

आगीवर एका तासातच नियंत्रण मिळविण्यात आलं होतं, मात्र आग लागल्यानंतर जो गोंधळ उडाला त्यामध्ये आठ रुग्णांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील 40 रुग्णांना एसपीव्ही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते.

बचाव कार्यात सहभागी झालेल्या अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. कारण ते कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले होते.

पोलिसांनी याप्रकरणी दुर्घटनेमध्ये मृत्यूचं प्रकरण नोंदवलं असून पुढील तपास सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मुख्यमंत्री विजय रुपाणींशी संवादही साधला आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आग लागण्याच्या घटनेची तात्काळ तपास करण्याचा आदेश दिला आहे. तीन दिवसात दोषींवर कारवाई करण्याचाही आदेश त्यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)