You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजनाथ सिंह : संरक्षण मंत्रालय 100 हून अधिक उपकरणांची आयात थांबवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात 'आत्मनिर्भर भारत'ची घोषणा केली होती. संरक्षण मंत्रालयाने त्यादृष्टिनं पाऊल टाकत शंभरहून अधिक उपकरणांची आयात थांबवून आत्ननिर्भर होण्याचं पक्कं केलं आहे.
संरक्षण क्षेत्राशी आवश्यक वस्तूंचं उत्पादन देशातच व्हावं यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राजनाथ यांनी म्हटलं आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून 'निगेटिव्ह आर्म्स लिस्ट' तयार करण्यात येणार आहे. या संरक्षण सामुग्रीच्या आयातीवर बंदी घालण्यात येईल. लष्कराला आवश्यक साधनसामुग्रीचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, 2020 ते 2024 या कालावधीसाठी आत्मनिर्भर अर्थात देशांतर्गत साधनसामुग्रीचं उत्पादन व्हावं यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराला आवश्यक उपकरणं, सोयीसुविधा यांचं उत्पादन देशातील संरक्षण क्षेत्रातील उत्पादकांनी करावं जेणेकरून स्वदेशीचं उद्दिष्ट प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकेल.
शंभराहून अधिक उपकरणं आणि साधनसामुग्रीची सिद्धता झाल्यानंतर आणखी एक सूची तयार करण्यात येईल. निगेटिव्ह लिस्टमधील कोणत्याही गोष्ट आयात करायला लागू नयेत यासाठी उत्पादन ते प्रत्यक्ष पुरवठा करणाऱ्या संबंधितांशी चर्चा करून कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
"ऑगस्ट 2015 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत 260 योजनांसाठी 3.5 लाख कोटी रुपयांचे करार करण्यात आले. पुढच्या सहा ते सात वर्षात 4 लाख कोटी रुपये देशांतर्गत सुरक्षेशी निगडीत उत्पादकांना मिळू शकतील. यापैकी 1,30,000 कोटी लष्कर आणि हवाई दलासाठी तर 1,40,000 एवढी रक्कम नौदलासाठीच्या साधनसामुग्रीकरता वर्ग करण्यात आली आहे."
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी (9 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता महत्त्वपूर्ण घोषणा करतील असं ट्वीट संरक्षण मंत्रालयाने केलं होतं.
भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोणती घोषणा करणार याबद्दल उत्सुकता होती.
भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात 15-16 जूनच्या रात्री ज्या भागात जवानांमध्ये हिंसक चकमक झाली होती.
मे महिन्यापासून चिनी जवान या भागात दिसू लागले होते. त्यानंतर गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी जवान समोरासमोर होते.
त्यातच 15 जूनच्या रात्री भारतीय जवान आणि चिनी जवान यांच्या हाणामारी झाली. समुद्रसपाटीपासून 4300 मीटर उंचीवरचा हा सगळा भाग आहे आणि अत्यंत थंड प्रदेश आहे. याला बर्फाचं वाळवंट असंही म्हणतात. हाणामारीत काही भारतीय जवान गलवान नदीत पडले. नदीच्या पाण्याचं तापमान शून्य अंशाच्याही खाली होतं.
या चकमकीत 20 जवानांचा मृत्यू झाला. आधी एका कर्नलसह तीन जवानांचा मृत्यू झाला होता. शहीद झाल्याची बातमी आली. मात्र, त्यानंतर थंडीमुळे जखमी झालेले 17 जवानांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, याव्यतिरिक्त आणखी 76 जवान जखमी झाले होते.
चीनने मात्र त्यांच्या जवानांच्या जीवितहानीविषयी अद्याप काहीच माहिती दिली नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)