You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजीव सातव यांचं 'ते' ट्वीट काँग्रेसमधल्या 'यंग ब्रिगेड'चं ज्येष्ठांना आव्हान?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला रामराम ठोकला. काही महिन्यातच राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण रोवलं. या दोन नेत्यांच्या निमित्ताने काँग्रेसमधली खदखद बाहेर पडली. पक्षातला 'ज्येष्ठ विरूद्ध तरुण' हा वाद पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला.
राजीव सातव यांनी एक ट्वीट केलं आणि त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद, माजी खासदार प्रिया दत्त इत्यादी अनेक नेत्यांनीही सचिन पायलट यांच्या बंडानंतर नाराजीचे संकेत दिलेत. यातील काहींनी सोशल मीडियावरील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या टीकेनंतर स्पष्टीकरणंही दिली. मात्र, यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला, असं नाही.
राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी एक ट्वीट केलं. "मत पूछ मेरे सब्र की इन्तेहा कहां तक है, तू सितम कर ले, तेरी ताक़त जहां तक है, व़फा की उम्मीद जिन्हें होगी, उन्हें होगी, हमें तो देखना है, तू ज़ालिम कहां तक है." या ट्वीटमुळेच काँग्रेसमधला वाद पूर्णपणे शमला नसल्याचं बोललं जाऊ लागलं.
काँग्रेस नेते मनीष तिवारींनीही आपल्याच नेत्यांना टोला लगावणारं ट्वीट केलं होतं. या वादात मिलिंद देवरा आणि शशी थरुर यांनीही उडी घेतली.
ट्विटरवर शब्दांचे हे खेळ इतके रंगले की, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना जाहीर पत्रकार परिषदेत आपल्याच नेत्यांना 'आपण विरोधी पक्ष आहोत' याची जाणीव करुन द्यावी लागली.
'सहकाऱ्यांनी ट्विटर ट्विटर न खेळता मोदी सरकारविरोधात आवाज उठवला पाहिजे,' असं आवाहन सुरजेवाला यांनी काँग्रेस नेत्यांना केलंय.
नेमका वाद कसा सुरू झाला ?
ज्योतिरादित्य शिंदेआणि सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर नुकतीच गुरुवारी ( 30 जुलै 2020 ) काँग्रेसची व्हीडिओ कॉन्फरंसिगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी मोदी सरकार ज्या मुद्द्यांवर अपयशी ठरत आहे, ते काँग्रेस जोरकसपणे मांडत नसल्याची भूमिका मांडली.
हाच धागा पुढे नेत राजीव सातव यांनीही पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला दिल्याचं समजतं. यानंतरच काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी ट्वीट करत काही नेते भाजप सरकार विरोधात लढायचे सोडून डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातल्या युपीए सरकारला पराभवासाठी जबाबदार ठरवत' असल्याचं म्हटलं.
मनीष तिवारी यांच्या ट्विटला मिलिंद देवरा आणि शशी थरुर यांनीही सहमती दर्शवली. तिवारींचे ट्वीट रिट्वीट करत देवरा यांनी लिहिलं, 'मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की, इतिहास माझ्याप्रती उदार असेल. पण त्यांच्या पक्षातले लोकच त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित करतील, हा विचार त्यांनी केला नसेल.'
यानंतर शशी थरुर, आनंद शर्मा यांनीही मनमोह सिंग यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले.
राजीव सातव ज्येष्ठांना आव्हान देत आहेत?
काँग्रेसमध्ये तरुण आणि ज्येष्ठांमधील दुफळी अनेकदा उघड झालीये. पण राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे राजीव सातव यांनी केलेल्या ट्विटनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मत पूछ मेरे सब्र की इन्तहा कहा तक है, असं म्हणणाऱ्या राजीव सातव यांच्या शायरीची सर्वत्र चर्चा आहे.
ही शायरी म्हणजे त्यांनी मनीष तिवारी यांना दिलेले उत्तर मानलं जात असताना त्यांनी काही वेळातच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या ट्वीटचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला असल्याचं त्यांनी म्हटलं.
पक्षातला अंतर्गत विषय सोशल मीडियावर जाहीरपणे बोलणाऱ्यातला मी नाही असं म्हणत त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याचे कौतुकही केले.
राजीव सातव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, माझी भूमिका मी ट्विटवर मांडलेली आहे. त्याव्यतिरिक्त मला काही बोलायचं नाही.
राजीव सातव यांची शायरी काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांना आव्हान देत असल्याचं चित्र तर निर्माण करते, शिवाय पक्षाच्या निष्ठेवर भाष्य करणारी आहे, असं मत मत ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी व्यक्त केले.
"राजीव सातव यांनी नुकतीच खासदारकीची शपथ घेतली आहे. ते पक्षात नाराज नाहीत. पण मग अचानक असे ट्विट करण्यामागे नेमका काय हेतू आहे याबाबत शंका आहे."
राहुल ब्रिगेड विरुद्ध ज्येष्ठ नेते ?
काँग्रेसमध्ये तरुण नेते विरुद्ध ज्येष्ठ नेते हा संघर्ष वारंवार ठळकपणे समोर आलाय. पण हा वाद आता विकोपाला गेलाय. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले.
"काँग्रेस नेत्यांनीच हा संघर्ष चव्हाट्यावर आणल्यामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आलाय. युपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या मनीष तिवारी आणि नुकतेच राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतलेल्या राजीव सातव यांनी जाहीरपणे ट्विटरवर वाद घातले असले तरी त्यांचे बोलविते धनी वेगळे आहेत हे आपण समजून घ्यायला हवे," असं मत राजकीय विश्लेषक सुनील चावके यांनी व्यक्त केले.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
मनीष तिवारी यांच्यापाठोपाठ शशी थरुर, मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्यांनीही त्यांना समर्थन दिलं. त्यामुळे राजीव सातव विरुद्ध काँग्रेसचे तीन नेते असं चित्र निर्माण झालं.
मिलिंद देवरा गेल्या काही महिन्यांपासून सतत काँग्रेस विरोधात सूचक वक्तव्य करत असून याउटल ते नरेंद्र मोदींची प्रशंसा करत आहेत. देवरा काँग्रेसमध्ये असूनही ते पक्षात नाहीत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य गंभीरपणे घ्यायची गरज नसल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी व्यक्त केले.
काँग्रेसमध्ये आता 'आर या पार'?
काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधले अंतर्गत राजकारण आणखी पेटले. राहुल गांधी आपल्या विश्वासार्ह टीमशीच चर्चा करुन पक्षाचे निर्णय घेत असल्याचा ज्येष्ठ नेत्यांचा सूर आहे.
काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेचे वर्चस्व आजही ज्येष्ठ नेत्यांकडे असल्याने राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर आपली पक्षातील महत्त्व संपुष्टात येईल असंही ज्येष्ठांना वाटते, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना लवकरात लवकर अध्यक्ष करावं यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत.
"सध्या ट्विटरवर सुरू झालेला वाद हे त्याचेच पडसाद आहेत. राजीव सातव यांनी अचानक केलेली सूचक शायरी म्हणजे राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड करत नसल्यामुळे नाराजी आहे," असं पत्रकार दीपक भातुसे सांगतात.
2024 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवायचं असेल तर त्यांना आतापासूनच आक्रमक होणं गरजेचं आहे. पण मुळात काँग्रेसमधला अंतर्गत वाद संपुष्टात येत नाही तोपर्यंत काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून समोर येणार नाही हे स्पष्ट आहे.
काँग्रेसला अशा टोकाच्या संघर्षातूनच पुनरुज्जीवन मिळाल्याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधींकडे आलेल्या नेतृत्वपदालाही त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला होता. पण त्यातून पक्ष आणि नेतृत्त्व अधिकच बळकट होत गेले.
त्यानंतर सोनिया गांधीच्या बाबतीतही सुरूवातीला तेच झाले. काँग्रेसमधल्या काही दिग्ग्जांनी सोनिया गांधीना विरोध केला होता. त्यावेळीही काँग्रेस दिशाहीन झाली होती. शरद पवार, पी.ए.संगमा, तारिक अन्वर पक्ष सोडून गेले. पण या परिस्थितीतूनही काँग्रेस पुन्हा यशस्वीरित्या उभी राहिली आणि सोनिया गांधीच्या नेतृत्त्वाने दहा वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणलं.
राजकीय विश्लेषकांच्या मते सध्याची काँग्रेसची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. "काँग्रेस भरकटली आहे. पण अशा परिस्थितीतूनच काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळाल्याचा इतिहास आहे," असं मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.
सध्याच्या घडामोडी पाहता मोठ्या नेत्यांनी असे जाहीरपणे बोलणे म्हणजे काँग्रेस पुन्हा एकदा निर्णायक क्षणापर्यंत येऊन ठेपल्याची चिन्ह आहेत. चोरमारे सांगतात, "राहुल गांधी यांना अध्यक्षपद मिळवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत," असं म्हणता येईल.
काँग्रेसचे भविष्य काय ?
काँग्रेसमध्ये फूट पडते तेव्हाच काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळते हा इतिहास असला तरी आताची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेसमधली ज्येष्ठांची फळी आणि तरुणांची टीम दोन्हीमध्ये आक्रमक चेहऱ्यांची कमतरता दिसून येते.
"ज्येष्ठांकडे मोठा अनुभव असला तरी त्यांना मार्गदर्शक भूमिकेमध्ये न जाता आजही सत्ता उपभोगण्याची लालसा आहे," असं ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात.
"या वयातही डॉ. मनमोहन सिंगांना राज्यसभेचे सदस्यत्व हवे असते. लोकसभेवर निवडून न येता अनेक ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत वर्चस्व गाजवायचे असते," असंही चावके सांगतात.
दुसऱ्या बाजूला राहूल ब्रिगेडमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याची धमक आहे का? हाही प्रश्नच आहे. काँग्रेसच्या तरुण नेत्यांना जनाधार नसल्याचेही दिसून येते.
चावके सांगतात की, त्यांच्याकडे संयमही नाही. ते लगेच नाराज होतात आणि पक्ष सोडून पळून जातात. असे तरुण नेते बदल कसा घडवणार?
शिवाय, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे ती टिकवून ठेवण्यातही काँग्रेसला यश येत नाहीये. युवक काँग्रेसमध्ये राहुल गांधींनी सामान्य कार्यकर्त्यांमधून अनेकांना संधी दिली होती. त्यामुळे काँग्रेसला भविष्यातल्या यशस्वी वाटचालीसाठी तरुण पण निष्ठावंतांची फळी निर्माण करण्याची गरज आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)