कोरोना व्हायरस : पुण्यात आईच्या पोटात बाळाला कोरोनाचं संक्रमण, देशातील पहिली घटना

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, PA Media

आईच्या पोटात बाळाला कोव्हिड-19 किंवा कोरोना व्हायरसची ची लागण झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? किंवा गेल्या तीन-चार महिन्यात वाचलं आहे? नाही?

आईच्या गर्भाशयात बाळाला कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाला गर्भाशयात कोरोनाची लागण झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गर्भाशयात बाळाला कोरोना संक्रमण झाल्याची ही देशातील पहिली घटना आहे.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, 22 वर्षीय महिलेने 27 मे ला, ससून रुग्णालयात बाळाला जन्म दिला. जन्मानंतर आई आणि बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्यात बाळाला आईच्या गर्भाशयात कोव्हिड-19 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

डॉक्टर काय म्हणतात?

याबाबत बीबीसीशी बोलताना पुण्याच्या ससून रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख (Paediatric) डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, "प्रसूतीपूर्वी बाळाच्या आईला ताप होता. मात्र, कोणत्याही उपचाराविना ताप बरा झाला.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सूचनेप्रमाणे महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली. या महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जन्मानंतर प्रोटोकॉलप्रमाणे बाळाच्या नाकातून, नाळेतून आणि प्लॅसेंटाचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. बाळाचे तीनही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले."

"आईच्या शरीरातील रक्त प्लॅसेंटामधून नाळेत पोहोचतं आणि त्यानंतर बाळापर्यंत जातं. त्यामुळेच बाळाला कोरोनाचं इंन्फेक्शन झालं," असं डॉ. किणिकर म्हणाल्या.

याबाबत पीटीआयशी बोलताना पुण्याच्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, "गर्भाशयात आईकडून बाळाला कोरोना व्हायरस इन्फेक्शनची लागण होण्याचं हे पहिलं प्रकरण आहे. आई आणि बाळावर उपचार करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांचं मी अभिनंदन करतो."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, SPL

बाळाला धोका होता

डॉ. किणीकर यांच्या माहितीनुसार, जन्मानंतर बाळाची तब्येत गंभीर होती. शरीरात सायटोकाईन स्टॉर्म निर्माण झालं होतं. 8 दिवस बाळ ऑक्सिजनवर होतं. 2 आठवड्यांनी तब्येत सुधारल्यानंतर, तिसऱ्या आठवड्यात स्तनपान देण्यात आलं. या बाळावर उपचार खूप आव्हानात्मक होते.

गर्भाशयात इन्फेक्शन झाल्याचं कसं कळलं

डॉ. आरती पुढे म्हणाल्या, " चौथ्या आठवड्यात आम्ही आई आणि बाळाची अँटीबॉडी टेस्ट केली. आईच्या शरीरात मोठ्या संख्येने अँटीबॉडी तयार झाल्या होत्या. याचा अर्थ आईला कोरोनाची लागण झाली होती. त्याचप्रमाणे बाळाच्या शरीरातही कोव्हिड-19 विरोधात अँटीबॉडी तयार होण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे आईच्या गर्भाशयात बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं,".

डॉ. किणीकर म्हणतात, "आईच्या गर्भाशयात होणाऱ्या इन्फेक्शनला व्हर्टिकल ट्रान्समिशन किंवा ट्रान्सप्लॅसेंटल ट्रान्समिशन म्हणतात. ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. याआधी अमेरिका, मॅक्सिको, इटली आणि चीनमध्ये अशी काही प्रकरणं समोर आली असल्याची माहिती आहे."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे काय?

याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग (Gynecology) विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद म्हणाले, "आईकडून बाळाला होणाऱ्या जंतूसंसर्गाला व्हर्टिकल ट्रान्समिशन असं म्हणतात.

यात आईच्या शरीरातील जंतू पहिल्यांदा गर्भाशयात पोहोचतात, त्यानंतर नाळेत आणि नाळेच्या माध्यमातून बाळापर्यंत पोहोचतात. बाळाच्या जन्मापूर्वीच किंवा जन्मानंतर आईकडून बाळाला लागण होते."

"कोव्हिडमध्ये व्हर्टिकल ट्रान्समिशनबाबत स्टडी अजून करण्यात आलेला नाही. कोरोनामध्ये व्हर्टिकल ट्रान्समिशनची शक्यता नाकारता येत नाही. एचआयव्हीसारख्या रोगामध्ये आईकडून बाळाला संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणं आढळून आली आहेत," असं डॉ. आनंद पुढे म्हणाले.

कोरोना
लाईन

आईकडून बाळाला कोरोनाची लागण कशी होते?

मुंबईच्या एनएससीआय डोम कोव्हिड सेटंरमध्ये आरोग्यसेवा देणाऱ्या वरिष्ठ लॅप्रोस्कोपिक गायनेकोलॉजिस्ट डॉ. नीता वर्टी सांगतात, "स्तनपान करताना ड्रोपलेटमुळे किंवा इतर गोष्टींच्या संपर्कातून जन्मानंतर बाळाला कोरोनाची लागण होते. अशी प्रकरणं समोर आली आहेत. मात्र, गर्भाशयात बाळाला संसर्ग होणं खूप दुर्मिळ आहे. जगभरात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या केसेस आहेत. प्लॅसेंटामधून संसर्ग होत नाही असा समज होता. मात्र, गर्भाशयात इंन्फेक्शन होण्याची शक्यता आहे हे आता दिसून आलंय."

"ब्रेस्ट मिल्कमध्ये व्हायरस नसतो. त्यामुळे आई कोरोनाग्रस्त असली तरी स्तनपान देण्यास काहीच हरकत नाही. फक्त स्तनपान देताना आईने तोंडावर मास्क घालावा. हात स्वच्छ धुवून घ्यावेत. ही काळजी घेतली तर बाळाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असते," असं डॉ वर्टी म्हणतात.

प्रातिनिधिक फोटो

तज्ज्ञांचं मत काय?

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात आत्तापर्यंत कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असलेल्या 300 महिलांची प्रसूती झाली आहे. यातील फक्त 11 बाळांना जन्म झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची माहिती सायन रुग्णालयाचे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. अरूण नायक यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

"खूप कमी प्रकरणं समोर आल्यामुळे आईच्या गर्भात संसर्ग होतो असं म्हणता येणार नाही. यासाठी अभ्यास करावा लागेल. प्रत्येक प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. गर्भाशयात संसर्ग होण्यामागे काय फॅक्टर आहेत. काही पूर्वनिश्चित घटक आहेत का. याबाबतची माहिती अजूनही मिळालेली नाही," असं डॉ. अरूण नायक पुढे म्हणाले.

काय म्हणते जागतिक आरोग्य संघटना?

WHO ने 9 जुलै ला कोरोना व्हायरसचं संक्रमण कोणत्या मार्गाने होतं याबाबत माहिती जारी केली होती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, सद्य स्थितीत इंन्ट्रायुटेराइन म्हणजे गर्भाशयात कोव्हिड पॉझिटिव्ह आईपासून बाळाला कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचा पुरावा नाही. मात्र, याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.

जगभरात गर्भाशयात कोरोना व्हायरस इंन्फेक्शन झाल्याची प्रकरणं अमेरिकेतील येल स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये नाळेतून बाळाला कोव्हिड-19 ची लागण झाल्याचं प्रकरण समोर आलं

मॅक्सिकोमध्ये 17 जूनला प्रिमॅच्युअर जन्म झालेल्या तीन बाळांना आईच्या गर्भाशयात कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)