कोरोना लशीबद्दलच्या 'या' दाव्यांमध्ये किती तथ्य?

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जॅक गुडमॅन आणि फ्लोरा कार्मिकेल
    • Role, बीबीसी रिअॅलिटी चेक

ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून सुरू असलेल्या कोरोना लशीच्या मानवी चाचणीला मोठं यश मिळालं असलं तरी सोशल मीडियावर याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. लशीच्या सुरक्षेबाबत गैरसमज पसरवणाऱ्या पोस्टही व्हायरल होत आहेत.

गेल्या काही वर्षांत लशींविरोधातल्या ऑनलाईन मोहिमा जोर धरु लागल्या होत्या. त्यातच आता कोरोनावरील लशीबाबतही अनेक दावे केले जातायत.

लशीचा डीएनएवर परिणाम?

सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हीडिओ ऑस्टिओपॅथ कॅरी मडेज यांचा असल्याचं सांगितलं जातंय. यात कोरोना व्हायरसच्या लशीबाबत चुकीचे दावे करण्यात आलेत. या व्हीडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार कोरोनाची लस मानवी डीएनएमध्ये बदल करेल.

"कोव्हिड-19 लस शरीरात अनुवंशिक बदल करेल अशा पद्धतीनं बनवली जातीये," असं या व्हीडिओमध्ये म्हटलंय.

इतकंच नाही तर या व्हीडिओमध्ये ही लस आपल्याला आर्टिफिशिलय इंटेलिजंसशी जोडेल, असा दावा कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय करण्यात आलाय.

हा दावा पूर्णपणे चुकीचा

जगभरात सध्या 25 वेगवेगळ्या लशींची चाचणी सुरू आहे. यापैकी कोणतीही लस मानवी डीएनएशी संबंधित नाही. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी त्याचा काही संबंध नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केलंय.

व्हायरसशी लढण्यासाठी मानवी शरीराच्या प्रतिकार क्षमतेला सक्षम बनवण्यासाठी लस तयार केली जाते.

कॅरी मडेज यांनी आणखी काही चुकीचे दावे केले आहेत. "लशीची चाचणी होत असताना ती सुरक्षित असल्याबाबत शास्त्रीय प्रोटोकॉल पाळला जात नाहीय," असंही त्या म्हणतायत.

स्क्रीनशॉट

फोटो स्रोत, Screenshot

बीबीसी ऑनलाईन आरोग्य संपादक मिशेल रॉबर्ट्स सांगतात, "लस प्रत्यक्षात वापरात आणण्यापूर्वी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. तसंच मुल्यमापनाच्या प्रक्रियेचंही पालन केलं जातं."

बीबीसीने कॅरी मडेज यांना त्यांनी केलेल्या दाव्याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून हा लेख प्रकाशित होईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सर्वप्रथम हा व्हीडिओला युट्यूबवर अपलोड करण्यात आला. 3 लाखांहून अधिक लोकांनी युट्यूबवर हा व्हीडिओ पाहिला आहे. आता फेसबुक आणि इन्स्टग्रामवरही हा व्हीडिओ पाहिला जातोय.

दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञ सारा डाउन्स यांनी सांगितले की, हा व्हीडिओ सगळ्यांत आधी त्यांना त्यांच्या आईने दाखवला. त्यांची आई प्रार्थनेच्या एका ग्रुपशी जोडलेली आहे. तिथे हा व्हीडिओ शेअर केला होता.

कोरोना लस

फोटो स्रोत, AFP

याच ग्रुपवर सारा यांनी या व्हीडिओमध्ये करण्यात आलेले दाव्यांमधली वस्तुस्थिती उघड केली. त्यांनी योग्य माहिती ग्रुपवर शेअर केली. त्या सांगतात, "या ग्रुपवर आता सदस्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचली आहे याचा मला आनंद आहे."

लशीच्या चाचणीबाबत इतर दावे

गेल्या आठवड्यातच ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोरोनावरील लशीच्या चाचणीला सुरुवात झाली. या चाचण्यांचे निष्कर्ष समोर येताच फेसबुकवर वाद सुरू झाला.

ही लस 'गिनीपिग'प्रमाणे वापरली जाईल आणि 'खबरदारी न घेता याचे वेगाने उत्पादन' होईल,' अशी भीती फेसबुक युजर्सने व्यक्त केलीय.

लस लवकरात लवकर यावी यासाठी वेगाने काम होत असल्याने त्याच्या सुरक्षेबाबत सामान्य लोकांमध्येही शंका असू शकतात.

सोशल मीडिया

फोटो स्रोत, Facebook

ऑक्सफर्ड लशीच्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक अँड्य्रू पोलार्ड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, लशीची चाचणी करत असताना सुरक्षा प्रक्रियेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. ज्या देशांमध्ये या लशीची चाचणी केली जातेय तिथेही नियामकांच्या सुरक्षा रिपोर्ट्सची काळजी घेतली जातेय.

ह्या लशीच्या पहिल्या दोन टप्प्यांची चाचणी तातडीने झाली कारण कोरोना व्हायरसच्या लसीचे काम ऑक्सफर्डमध्ये लवकर सुरू करण्यात आले होते. ही लस अत्यावश्यक असल्याने त्याची प्रशासकीय प्रक्रियाही वेगाने झाली. तसंच अनुदान वेळेत उपलब्ध होऊ शकलं. स्वयंसेवक शोधण्यासाठीही जास्त वेळ लागला नाही.

या लशीची चाचणी जेव्हा तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल तेव्हा तिच्या साईड इफेक्ट्सची पडताळणी करण्यासाठी हजारो स्वयंसेवकांची आवश्यकता भासेल, असं प्रा.पोलार्ड यांनी सांगितलं.

ज्या व्यक्तींवर लशीची चाचणी करण्यात आली त्यांना किरकोळ ताप आला. या व्यतिरिक्त पहिल्या दोन टप्प्यात कुठलाही मोठा साईड इफेक्ट पाहायला मिळाला नाही. या साईड इफेक्टलाही पॅरासिटामॉलच्या मदतीने नियंत्रणात आणता येऊ शकतं, असं संशोधक सांगतात.

कोरोना लस चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

ऑक्सफर्डने सुरुवातीला केलेल्या चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला होता. बीबीसीचे वैद्यकीय प्रतिनिधी फर्गुस वाल्श यांनी त्या स्वयंसेवकाची मुलाखत करून हा दावा खोटा असल्याचं समोर आणलं होतं.

लस आणि स्पॅनिश फ्लूबाबत चुकीचे दावे

1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या लशीमुळे पाच कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचं एक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे.

कोरोना लस दावे

फोटो स्रोत, Social media

मुळात त्यावेळी कोणतीही लस नव्हती, असं US Centers for Disease Control नं म्हटलं आहे.

इतिहासकार आणि लेखक मार्क होनिंग्सबॉम सांगतात की, त्यावेळी ब्रिटन आणि अमेरिकेतले संशोधक एका सामान्य बॅक्टेरिया लशीवर काम करत होते. पण आतासारखी एकही लस त्यावेळी नव्हती. तसंच कुणाला याचीही कल्पना नव्हती की, 'इन्फ्लुएन्झा' हा व्हायरस होता.

त्यावेळी स्पॅनिश फ्लूमुळे लोकांच्या मृत्यूची दोन कारणे होती. पहिले कारण म्हणजे तापाचा संसर्ग आणि दुसरे म्हणजे संसर्गामुळे रोग प्रतिकारक क्षमेतवर ताण पडल्याने फुप्फुसांमध्ये पाणी भरणं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)