शकुंतला देवी : शाळा कॉलेजात पहिल्या येणाऱ्या मुली भरपूर, पण महिला गणितज्ञ, शास्त्रज्ञ नगण्य का?

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

'द इमिटेशन गेम' नावाचा एक सुंदर सिनेमा आहे एका गणितज्ञाच्या आयुष्यावर. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड-अमेरिकेच्या गणितज्ञांनी जर्मनी आणि जपानचे कोड तोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच काळावर बेतलेल्या या चित्रपटातला एक सीन आहे, जेव्हा तो गणितज्ञ, आपल्या तोडीचे गणितात प्रचंड हुशार असणारे सहकारी शोधत असतो. त्यासाठी तो गणिताचंच एक कोडं बनवतो आणि पेपरमध्ये छापतो. ज्याला ते कोडं सुटेल त्याने येऊन भेटावं.

काही मोजकी माणसं येऊन भेटतात, आणि त्यात असते विशीतली एक मुलगी. तिथला सरकारी अधिकारी तिला वारंवार सांगत असतो, "मॅडम, मदतनीसांची मुलाखत वर चालूये, तुम्ही इथे काय करताय."

ती मुलगी परोपरीने सांगते असते, "अहो मी ते गणित सोडवलंय," आणि तो अधिकारी हसून म्हणत असतो, "तुमचा गैरसमज झालाय."

अनेक अर्थांनी मला या विशिष्ट सीन महत्त्वाचा वाटतो. या कथित घटनेला अनेक दशकं झालीयेत. ती विशीतली मुलगी, जोन क्लार्क, नंतर इंग्लंडची आघाडीची क्रिप्टोअॅनालिस्ट (सांकेतिक भाषेचं विश्लेषण करणं) बनली.

त्यानंतर गणितज्ञ कॅथरिन जॉन्सन आणि डोरेथी व्होगन आणि नासाच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला इंजिनियर मेरी जॅक्सन यांनी अमेरिकच्या अंतराळ मोहिमांमध्ये मोलाची भूमिका बजावून कित्येक वर्षं उलटली.

आज शंकुतला देवी पिक्चर रिलीज झालाय तर भारताच्या या ह्युमन काँप्युटरचीही चर्चा होईलच. पण प्रश्न तोच राहील, भारतात किंवा जगातही महिला गणितज्ञ, शास्त्रज्ञ बोटावर मोजण्याइतक्या कमी का?

योगायोग पाहा, नुकतेच दहावीचे निकाल लागले, त्याच्या आधी बारावीचे निकाल लागले, आणि सगळीकडे बातम्या झळकल्या 'यंदाही मुलींची बाजी', पण शाळा कॉलेजमध्ये कायम पहिल्या नंबरात असणाऱ्या या मुली पुढे शास्त्रज्ञ, संशोधक, गणितज्ञ होताना का दिसत नाहीत? म्हणजे काही अपवाद असतीलही पण त्यांची संख्या नगण्यच असते.

ऑर्गनाझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) या संस्थेने 2015 साली एक सर्व्हे केला होता, त्यात म्हटलं होतं की हुशार मुलींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. याला अनेक सामाजिक घटकही कारणीभूत असतात आणि म्हणूनच त्या विज्ञान आणि गणित या क्षेत्रात पुढे करियर करण्याचा विचार करत नाहीत.

मुलांना या क्षेत्रात करियर करण्यासाठी घरच्यांकडून प्रोत्साहन दिलं जातं पण मुलींना मात्र मागे ओढलं जातं असंही या अभ्यासात म्हटलं होतं.

मुली गणितात कच्च्या?

सर्वसाधारण समज असा आहे, जो मी वर उल्लेखलेल्या प्रसंगातही प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे 'बायकांना गणितात कमीच गती असते.' याला काही वैज्ञानिक आधार आहे का?

जॉनथन ऑसबोर्न अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विद्यापीठात विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मुलांच्या आणि मुलींच्या गणित समजण्याच्या किंवा त्यात प्रगती करण्याच्या क्षमतेत काहीही फरक नसतो. मुली अशा क्षेत्रात मागे पडण्याची कारणं पूर्णपणे सामाजिक आणि सांस्कृतिक असतात."

आता सामाजिक किंवा सांस्कृतिक कारणं म्हणजे काय? उदाहरणच द्यायचं झालं तर संशोधन, गणित या विषयात काम करायचं झालं तर त्याला वेळेचं बंधन नसतं. अनेकदा तहानभूक हरपून, घर विसरून काम करावं लागतं. आपल्या सारख्या देशात पुरुषांना हे शक्य आहे, पण घर-करियर-मुलं अशी कसरत करणाऱ्या महिलांना ते त्रासाचा ठरतं. दुसरीकडे ज्यांना हे करायचं आहे त्यांनाही अनेकदा घरातून विरोधाचा सामना करावा लागतो.

आणि म्हणूनच गणित किंवा विज्ञानात सारखीच क्षमता असणाऱ्या मुलांपैकी मुलींच्या तुलनेत चौपट मुलगे गणित, कोडींग, संशोधन, आणि मुलभूत विज्ञानात करियर करण्याचा विचार करतात.

'लग्न म्हणजे मुलीचा मोक्ष'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे संशोधन क्षेत्रात असलेल्या स्त्री-पुरुषांच्या प्रमाणात दरी का आहे हे सविस्तर उलगडून सांगतात.

"या बाबीला फक्त एक गोष्ट कारणीभूत नाहीये. अनेक पातळ्यांवर या दरीचा विचार करायला हवा. पहिलं म्हणजे आपल्याकडे आजही मुलीचा मोक्ष लग्नातच आहे असं समजतात. त्यामुळे तिच्या आयुष्याची सगळी जडणघडण, तिचं करियर, तिचे चॉइसेस हे सगळं लग्न या एका गोष्टीभोवती बांधलेले असतात. साहजिकच घरसंसाराच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला करण्यात पालक, समाज पुढाकार घेतो."

संशोधन, शास्त्र किंवा गणित या क्षेत्रांमध्ये करियर करायला प्रचंड पेशन्स लागतात या गोष्टीकडेही डॉ. श्रुती लक्ष वेधतात. त्यांच्यामते तुम्हाला तुमच्या कामाचे काही दृश्य स्वरुपात परिणाम दिसायलाच पस्तिशी उजाडते, आणि इतका वेळ खर्च करण्याची मुभा आपली समाजव्यवस्था महिलांना देत नाही.

"दुसरा प्रश्न असतो की तुमच्या संशोधनाचा काय उपयोग? हे आपल्याला माहितेय की गणितानेच अंतराळातमध्ये माणूस नेला, गणितानेच अंतराळ मोहिमा चालतात, इतकंच काय गणितानेच कळतं विहीर किती खोल खणावी, पण तरीही त्याचे इंस्टंट परिणाम दिसत नाहीत जसे इतर क्षेत्रात दिसतात.

त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्याची हेटाळणी होते. महिलांची तर क्रूर थट्टा होते. एक उदाहरण देते, तुमचे नातेवाईक जमले आहेत आणि त्यांच्यात एक चश्मेवाली, हातात जाडजूड पुस्तक वाचणारी पीएचडी करणारी मुलगी आहे. तिला कसले सल्ले दिले जातात माहितेय? पुस्तकं वाचण्यापेक्षा स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष दे. कसं संशोधनासाठी पोषक वातावरण मिळणार महिलांना," त्या विचारतात.

शैक्षणिक धोरणही कारणीभूत

अर्थात संशोधन, विज्ञान आणि गणित या क्षेत्रात महिलांचा टक्का कमी आहे याला शैक्षणिक धोरणही कारणीभूत असल्याचं डॉ. श्रुती नमूद करतात.

आपल्या शैक्षणिक धोरणात अजूनही जेंडर डिस्पॅरिटीचा साकल्याने विचार होत नसल्याचं त्या म्हणतात.

"तुम्हाला दिसतंय ना मुली मुलभूत विज्ञानात आणि संशोधनात येत नाहीयेत. मग त्यासाठी सत्ताधारी वर्ग काय करतोय? आणि यात सत्ताधारी वर्ग म्हणजे कुठला विशिष्ट पक्ष नाही तर शासन, धोरण राबणारं प्रशासन, शिक्षक अगदी पत्रकार असे सगळेच येतात. या क्षेत्राकडे मुलींना आकर्षित करण्यासाठी काही धोरणं आखली गेलीत का? त्यांना या विषयांची गोडी लागावी म्हणून स्पेशल स्कॉलरशिप्स, फेलोशिप्ससारखे इन्सेंटिव्ह देता येतील का हाही विचार करायला हवा," त्या म्हणतात.

मुलभूत विज्ञान अजूनही पुरुषांचीच मक्तेदारी

अमेरिकन इंस्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या मते जवळपास 20 टक्के महिला फिजिक्समध्ये बॅचलरची डिग्री घेतात तर 18 टक्के महिला पीएचडी करतात.

नॅशनल टास्क फोर्स ऑन विमेन इन सायन्सच्या रिपोर्टनुसार भारताचा विचार करायचा झाला तर वेगवेगळ्या संस्था आणि विद्यापीठांमध्ये फक्त 25 टक्के महिला विज्ञानाच्या क्षेत्रात शिकवत आहेत.

भारतातल्या वेगवेगळ्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट संस्थांमध्ये जवळपास 3 लाख शास्त्रज्ञ, इंजिनिअर आणि तंत्रज्ञ काम करतात. त्यापैकी फक्त 15 टक्के महिला आहेत. याच क्षेत्रांमधली जागतिक सरासरी 30 टक्के आहे. इस्रोमधल्या एकूण शास्त्रज्ञांपैकी फक्त 8 टक्के शास्त्रज्ञ महिला आहेत.

'शाळेत मार्क मिळवणं ही स्वातंत्र्याची आस'

आता पुन्हा जाऊ पहिल्या प्रश्नाकडे, शाळेत, कॉलेजात,दहावी, बारावीत टॉपचे मार्क मिळवणाऱ्या मुली जातात कुठे?

"त्या जातात कुठे म्हणण्यापेक्षा, त्यांना कायमच मुलांपेक्षा जास्त मार्क का मिळतात या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं आहे," डॉ श्रुती म्हणतात.

"आजही भारतातल्या अनेक भागांमध्ये शाळेत जाणं हा मुलींसाठी मोकळा श्वास असतो. त्या जीव तोडून अभ्यास करून पहिल्या येतात कारण आयुष्यात त्यांचं दुसरं कशासाठी कोणीच कौतुक करत नाही. ग्रामीण भागात मी पाहिलंय मुली सकाळी सात चाळीसचं कॉलेज असेल ना, तर सव्वासातला घरातून धुणीभांडी करून, पाणी भरून, स्वयंपाक करून निघतात. कारण त्यांना माहीत असतं आपण शिकतोय तोवर आपल्याला पुरुषसत्ताक पद्धतीचा जाच कमी आहे."

आणि म्हणूनच कदाचित शिक्षण पूर्ण झालं की या पहिल्या आलेल्या मुली परत त्याच परंपरांच्या जोखडात अडकून जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)