You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे की अजित पवार, सरकारचं स्टिअरिंग कोणाच्या हातात? #सोशल
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याला आता सात-आठ महिने उलटले असले तरी सरकारच्या रचनेवर शंका उपस्थित केल्या जात आहेत.
सरकारचा सुकाणू नक्की शिवसेनेकडे आहे की शरद पवार यांच्याकडे असेही त्यांच्याबद्दल बोलले जात आहे.
कधी काँग्रेसचं रुसणं, काँग्रेस नेत्यांनी थेट ट्वीटरवर नाराजी व्यक्त करणं, त्यावर सामना वृत्तपत्रातून टीका केली जाणं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका या सर्व गोष्टींबाबत प्रश्न उपस्थित केले जातात.
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन पक्षांच्या रिक्षेचं सरकार असलं तरी त्याचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे असं एका मुलाखतीत विधान केलं होतं. त्यापाठोपाठ आलेल्या त्यांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी बारामतीचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोत एका लहानशा गाडीमध्ये अजित पवार आणि उद्धव ठाकरे बसलेले आहेत. या गाडीचं स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात आहे. उद्धव ठाकरे यांनी स्टेअरिंगचं केलेलं वक्तव्य प्रसिद्ध झाल्यावर काही तासांमध्ये या 'शुभेच्छा' अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्यावर चर्चा सुरू आहे.
प्रशासन आपल्याच हातात घ्यायची अजित दादांना इच्छा आहे का? सरकारमध्ये सहभागी होऊनही ते अजून आपलं स्वप्न विसरलेले नाहीत का? मुख्यमंत्री खरेच सर्व प्रशासन सांभाळत आहेत का? एका सरकारमध्ये राहूनही हे दोन्ही पक्ष असे संकेत का देतात अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. बीबीसी मराठीने याबद्दल सोशल मीडियावर चर्चा घडवून आणल्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
'यांचा काही नेम नाही'
या चर्चेमध्ये बहुतांश प्रतिक्रिया मजेशीर आणि काही तिरप्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. नितिन पानतावणे यांनी प्रतिक्रिया देताना लिहिलंय, 'यांचा काही नेम नाही. कदाचित लवकरच स्टिअरिंग हातात घेऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं'.
तर प्रफुल्ल नवले यांनी, 'राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने काम करत आहे. त्यांना महाराष्ट्र काबिज करायचा आहे. त्यासाठी ते कोणाशीही युती करायला तयार आहेत. शरद पवार सर्वत्र दौरे करुन यापुढे स्टेअरिंग आमच्याच हातात असेल असा मेसेज देत आहेत' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राजेश कुलकर्णी यांनी हे स्टेअरिंग कोणीही पकडलं तरी सरकार फार काळ चालणार नाही अशी कमेंट केली आहे तर शशिकांत भोईटे यांनी अजितदादांनी स्टेअरिंग आपल्याच हातात आहे असं दाखवून दिलं आहे असं लिहिलं आहे.
हे चित्र सूचक आहे. अशी प्रतिक्रिया धनंजय पांडे यांनी दिली आहे. पांडे यांनी या गाडीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी नाहीत असंही आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. दयानंद राजमाने यांनी काहीही झालं तरी ही गाडी पाच वर्षे चालूदे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हेमंत चित्राव यांनी योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचला आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टाग्रामवर हा फोटो 'मजेशीर' असल्याचं मत काही लोकांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार सर्वांना बरोबर घेऊन चालतात याची छोटीशी झलक त्यांनी दाखवल्याचं मत अभिषेक सरनाईक यांनी इन्ट्राग्रामवरील चर्चेत लिहिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)