You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राफेल विमानामध्ये 'हॅमर' क्षेपणास्त्र बसवल्याने वायूदलाची ताकद कशी वाढणार?
- Author, बीबीसी हिंदी टीम
- Role, नवी दिल्ली
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच राफेल जेट्स सामील होत आहेत. 29 जुलै रोजी हरियाणातल्या अंबाला हवाई तळावर या लढाऊ विमानांची पहिली तुकडी दाखल होईल. भारत फ्रान्सकडून या लढाऊ विमानांपाठोपाठ हॅमर क्षेपणास्त्रही खरेदी करणार असल्याचं वृत्त आहे. भारतीय सैन्याला असलेल्या "इमर्जन्सी पॉवर" अंतर्गत हा करार करण्यात येणार आहे.
60 ते 70 किमी अंतरावर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्रांचा करार चीनबरोबरच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचा अंदाज आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट नोटिशीवरच फ्रान्सने भारतासाठी तयार करत असलेल्या रफाल विमानांसाठी हे क्षेपणास्त्रंही पुरवण्याची तयारी दाखवली आहे.
5 राफेल विमानांची पहिली तुकडी चार दिवसांनंतर हरियाणातल्या अंबाला हवाई तळावर दाखल होणार आहे.
हॅमर हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे आणि हे क्षेपणास्त्र लक्ष्याचा अचूक भेद घेतं, असंही सांगण्यात आलं आहे. 'हॅमर क्षेपणास्त्र दूरनच सहज वापरता येतं', असं हे क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या साफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीचं म्हणणं आहे.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कंपनीचा दावा आहे की 'हे क्षेपणास्त्र गायडन्स किटच्या सहाय्याने लक्ष्यावर मारा करतं. शिवाय हे क्षेपणास्त्र कधीही जॅम होत नाही. मिसाईलच्या पुढच्या भागात लावण्यात आलेल्या गायडन्स किटमध्ये जीपीएस, इन्फ्रारेड आणि लेसर बसवण्यात आले आहेत.'
हॅमरचं खरं नाव 'आर्मेमेंट एअर सोल मोदूलार' आहे. फ्रान्समध्ये विक्रीनंतर त्याला हॅमर नावाने संबोधलं गेलं आणि पुढे हेच नाव प्रचलित झालं.
हॅमर म्हणजे हायली एजाईल मॉड्युलर अॅम्युनेशन्स एक्सटेंडेड रेंज.
भारताने फ्रान्सकडून जी राफेल विमानं खरेदी केली आहेत त्यात आधीपासूनच हवेतून हवेत मारा करणारी 'मेटियोर' म्हणजेच लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आहेत. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता शेजारील देशांच्या तुलनेत खूप वाढणार आहे.
1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयात आपल्या हवाई दलाने मोठी भूमिका बजावली होती. गेल्या 50 वर्षात भारतीय हवाई दलाची क्षमता वेगाने वाढली आहे.
250 किलो वजनापासून सुरुवात होणारी हॅमर क्षेपणास्त्रं रफालव्यतिरिक्त मिराज लढाऊ विमानांमध्येही बसवता येतात.
फ्रान्स व्यतिरिक्त इजिप्त, कतार यासारख्या आशियातील इतर राष्ट्रांकडेही हॅमर क्षेपणास्त्रं आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने माहिती देताना म्हटलं आहे की हॅमर क्षेपणास्त्रं डोंगराळ भागासारख्या कुठल्याही भागांमध्ये तयार करण्यात आलेले बंकर उद्ध्वस्त करू शकतात.
याविषयी लिहिताना लडाखचाही विशेष उल्लेख करण्यात आला आाहे.
लडाखमधल्या गलवान खोऱ्यावरून गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे.
भारताने चीनकडे इशारा करणारे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. असं असलं तरी युद्ध किंवा कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याचे संकेत भारताकडून आलेले नाही. तसंच चीनकडूनही असे कुठलेच संकेत आलेले नाहीत.
मात्र, या दोन देशांमध्ये यापूर्वी दोन युद्धं झाली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1962 साली भारत आणि चीन यांच्यात झालेल्या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
कारगिलही लडाखमध्येच आहे. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाचं सरकार असतानाच्या काळात कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं.
भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांचा करार केला आहे. यासाठी भारताला 60 हजार कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, विमानांच्या योग्य किंमतीवरून बराच वाद आहे.
राफेल युद्ध विमानांच्या खरेदीचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आहे. मात्र, तिथेही सुरक्षेच्या कारणांवरुन या कराराविषयीची बरीचशी माहिती उघड करण्यात आली नव्हती.
'राफेल खरेदी कराराच्यावेळीच हॅमर क्षेपणास्त्राची खरेदी का करण्यात आली नाही?', असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनी विचारला आहे.
त्यांनी यासंबंधीच्या एका ट्वीटमध्ये विचारलं आहे, "या प्रकरणात आणखी स्वस्त दरात मिळणाऱ्या स्पाईस आणि पेवव्हेव शस्त्रांस्त्रांचा विचार का करण्यात आला नाही. भारतीय हवाई दलाजवळ हे आधीच आहेत."
'हॅमरची किंमत याहून जास्त आहे का?', असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
फ्रान्सच्या सैन्यात 2007 साली हॅमर क्षेपणास्त्रांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर अफगाणिस्तान आणि लिबियामध्ये या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे.
हॅमर क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा दावा आहे की 'हॅमर क्षेपणास्त्रांचे आजवर जिथे जिथे वापर केला तिथे तिथे तो फार यशस्वी ठरला आहे.'
मात्र, भारत फ्रान्सकडून किती हॅमर क्षेपणास्त्रं खरेदी करणार आणि किती किंमतीला खरेदी करणार, हे अजून सांगण्यात आलेलं नाही.
द इंडिया टुडे मासिकाने भारत फ्रान्सकडून 100 हॅमर क्षेपणास्त्रं घेणार असल्याचं म्हटलं आहे.
भाजप सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे, "जे लोक भारताला आमच्या सीमा संरक्षणावरून प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांच्यासाठी माहिती - भारत राफेलमध्ये हॅमर क्षेपणास्त्रं बसवणार आहे. शत्रूचे बंकरही आता वाचणार नाही."
रफालच्या किंमतीवरून प्रश्न विचारण्यात आले तेव्हा भाजप सरकारने तोदेखील राष्ट्रीय संरक्षणाचा मुद्दा बनवला होता.
मात्र, 1980 च्या दशकता बोफोर्स तोफांची खरेदी झाली. त्यावेळी बोफोर्स करारावरून रान उठवणाऱ्यांमध्ये भाजप सर्वात पुढे होता.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युटच्या म्हणण्यानुसार अमेरिका आणि चीननंतर संरक्षण दलावर सर्वाधिक खर्च करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे. दक्षिण आशियात तर भारताचं स्थान सर्वात वर आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या संरक्षण दलाच्या बजेटमध्ये 6.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019 साली भारताने संरक्षण दलावर 71.1 अब्ज डॉलर्स खर्च केले होते.
मात्र, भारताच्या कुठलाही संरक्षण करार असा नाही ज्यावरून वाद झालेला नाही. मग तो जवाहरलाल नेहरू यांच्या काळातला जीप करार असो, बोफोर्स किंवा मग सध्याचा राफेल करार.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)