You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : मुंबई आणि पुण्यात काही लोकांवर लशीची चाचणी होणार - अदर पुनावाला
भारतात कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 12 लाखांच्या पुढे गेली आहे. तर 30 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावरील लस डिसेंबरच्या अखेरीस बाजारात येईल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या कोव्हिड-19 लशीचे पहिल्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आशादायक वाटत आहेत.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या या चाचणीत सहभागी आहे. भारतात ही लस कधी उपलब्ध होईल? ही लस सामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळेल का? याबाबत बीबीसी मराठीसाठी मयांक भागवत यांनी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली.
ऑक्सफर्डची लस किती समाधानकारक आहे?
या लशीबाबत सर्व प्रकारच्या चाचण्या आणि ट्रायल पूर्ण झाल्यानंतरच याची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती किती आहे याबाबत काही टिप्पणी करणं योग्य ठरेल.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या चाचणीत 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका'च्या लशीचे इतरांच्या तुलनेत सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आता या लशीवर अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
सामान्य भारतीयांना तुमची लस कधीपर्यंत खरेदी करता येईल? ही लस 2020 मध्ये मिळेल? की 2021 साल उजाडेल?
या लशीचं राष्ट्रीय आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेता ही लस पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेचा भाग असली पाहिजे. ही लस सरकार खरेदी करून देशभरात वितरित करेल. जेणेकरून सामान्यांना थेट ही लस खरेदी करण्याची गरज लागणार नाही.
या लशीचा दुसरा आणि तिसरा टप्पा यशस्वी झाला आणि आम्हाला आवश्यक असलेल्या विविध परवानग्या वेळेत मिळाल्या तर या लशीचं वितरण डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होऊ शकतं, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जेणेकरून ही लस 2021 च्या पहिल्या तिमाहीत मोठ्या संख्येने लोकांना उपलब्ध होऊ शकेल.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
1000 रुपयांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटत नाही का?
आम्ही या लशीची किंमत 1000 रूपयांच्या आत ठेवू! पण, सद्यस्थितीत या लशीची किंमत किती असेल यावर भाष्य करणं फार लवकर होईल.
मी आधी सांगितल्याप्रमाणे, या लशीची सरकारकडून खरेदी आणि वितरण मोफत केलं जाईल अशी आम्हाला आसा आहे. ही लस सामान्यांना परवडणारी आणि कार्यक्षम बनवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.
या लशीला अनुदान मिळावं यासाठी चर्चा सुरू आहे का?
या प्रश्नांचं उत्तर मी आधीच दिलं आहे.
या लशीमुळे व्यक्तीलाकिती काळ संरक्षण मिळेल?
या लसीने गरजेच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर याची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती याबाबत काही भाष्य केलं जाऊ शकतं.
तुम्ही आधी म्हणाला होतात की या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. दोन डोस का? पहिल्या डोसनंतर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल?
सहसा कोणतीही लस दोन डोसमध्ये दिली जाते. पहिला डोस घेणाऱ्याला प्राईम करण्यासाठी (शरीराला तयार करण्यासाठी) आणि दुसरा डोस बूस्टर म्हणून. ज्यामुळे खात्रीलायकरित्या मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होईल.
माझ्या मते, येणाऱ्या काळात उपलब्ध होणाऱ्या कोव्हिड-19 विरोधातील सर्व लशींना हेच तत्व लागू होईल.
ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाईल का तोंडावाटे?
ही लस इंजेक्शनद्वारे देण्यात येईल.
प्रत्येकाला ही लस घ्यावी लागेल? की 60-70 टक्के लोकांनी ही लस घेतली तर बाकी लोक हर्ड इम्युनिटीमुळे सुरक्षित राहतील?
याबाबत कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं फार लवकर ठरेल. मात्र, ही लस तळागाळातील लोकांपर्यंत, देशातील कानाकोपऱ्यात आणि सर्वांत जास्त धोका असणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.
माझ्यामते, सुरूवातीला सर्वांत जास्त धोका असणाऱ्यांना ही लस पहिल्यांदा दिली गेली पाहिजे. उदाहरणार्थ, आरोग्य कर्मचारी, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. कोव्हिड-19 विरोधात फ्रंटलाईनवर लढा देणारे लोक.
सुदृढ आणि निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तींना ही लस नंतरच्या टप्प्यात दिली जाऊ शकते.
भारतात या लशीच्या ट्रायलबाबत रणनिती काय? कोणत्या शहरात याची चाचणी होईल? किती स्वयंसेवकांना या चाचणीसाठी घेतलं जाईल?
भारतात या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी आम्ही परवानगी घेत आहोत.
ऑगस्ट 2020 मध्ये याची सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई आणि पुणे ही शहरं या चाचणीसाठी महत्त्वाची आहेत.
कारण ही शहरं कोव्हिड-19 चा हॉटस्पॉट आहेत. देशभरातील 11-12 रुग्णालयात या लशीची चाचणी करण्याचा आमचा मानस आहे. 4000-5000 लोकांवर ही चाचणी केली जाईल. यासाठी आम्ही ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) च्या परवानगीची वाट पाहात आहोत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)