हरीश साळवे : एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची बाजू मांडणारे हे मराठी वकील कोण आहेत?

हरिश साळवे

फोटो स्रोत, PENGUIN RANDOM HOUSE INDIA

फोटो कॅप्शन, हरिश साळवे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यानुसार महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं सरकार कायम राहणार, हे स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी मांडली होती. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शिवसेनेची बाजू लढवली.

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना नोटीस बजाविण्यात आली होती.

प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे भारतातील अतिशय उच्चभ्रू वकील समजले जातात. त्यांच्या फी चा आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारतात. त्यांचं राहणीमान, त्यांचं ज्ञान याविषयी इंटरनेटवर माहितीचा मोठा साठा आहे.

कधी सलमान खानचे वकील म्हणून त्यांच्यावर टीका झाली तर कधी कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढण्यासाठी फक्त एक रुपया मानधन घेतलं म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होतो.

त्यांचे वडील एनकेपी साळवे हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते. विदर्भवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती.

पण वडिलांप्रमाणे त्यांनी राजकारणात जाण्याचा मार्ग निवडला नाही.

1. सीएचं शिक्षण घेणारे हरिश साळवे

हरीश साळवे यांचं मूळगाव नागपूर. दिवंगत काँग्रेस नेते एनकेपी साळवे यांचे ते पुत्र. त्यांनी आधी सीएचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते वकिली व्यवसायात दाखल झाले.

त्यांना लहानपणापासून इंजिनिअर व्हायची इच्छा होती. मात्र महाविद्यालयात दाखल होईपर्यंत त्यांचं लक्ष सीए होण्याकडे गेलं. सीएच्या परीक्षेत ते दोनदा नापास झाले.

प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी वकिलीचं शिक्षण सुरू ठेवलं.

ते सांगतात, "माझे आजोबा प्रसिद्ध वकील होते. वडील सीए होते. आई डॉक्टर होती. त्यामुळे व्यवसायाला पूरक गुण माझ्याकडे आधीपासूनच होते."

वडिलांनी पहिल्यांदाच वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर नेला.

हरीश साळवे यांचे वडील सीए असले तरी राजकारणी आणि क्रिकेट प्रशासक म्हणून ते अतिशय प्रसिद्ध होते. वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर घेऊन जाण्याचं श्रेय त्यांना जातं. त्यांच्या नावावर बीसीसीआय ने 1995 मध्ये एनकेपी साळवे ट्रॉफी ही स्पर्धा सुरू केली होती.

ते इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी.व्ही.नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता.

साळवे हरिश

फोटो स्रोत, Getty Images

2. पहिला खटला दिलीप कुमार यांचा

वडील राजकारणी असल्याचा त्यांना फायदा झालाच. त्यांची ओळख ज्येष्ठ वकील नानी पालखीवाला यांच्याशी झाली.

हरीश यांच्या मते त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात 1975 साली दिलीप कुमार यांच्या खटल्यासह झाली. हरीश या खटल्यात त्यांच्या वडिलांना मदत करत होते.

दिलीप कुमार यांच्यावर काळा पैसा बाळगल्याचा आरोप झाला होता. आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. त्यांना कर आणि दंड दोन्ही भरावा लागला होता. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं.

सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना साळवे म्हणतात, "मी सुप्रीम कोर्टात दिलीप कुमार यांचा वकील होतो. आयकर विभागाचं अपिल फेटाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाला फक्त 45 सेकंद लागले. ते आमचे मित्र होते. ते अतिशय खुश झाले.

त्यादिवशी कोर्टाने मला युक्तिवाद करायला सांगितला नाही हे माझं नशीब. माझा तर आवाजच फुटला नसता."

3. कोर्टातली स्तुतीसुमनं

सरकारने जेव्हा बेअरर बाँड आणले तेव्हा तत्कालीन ज्येष्ठ वकील सोली सोराबजी यांच्या सल्ल्याने साळवे यांनी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात एक याचिका दाखल केली.

याच प्रकरणी ज्येष्ठ वकील आर.के गर्ग यांनीही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. गर्ग यांनी तीन तास युक्तिवाद केला. त्यानंतर साळवे यांची पाळी आली.

साळवे यांनी अडखळत सुरुवात केली. दुपारी एक वाजता तुमचा युक्तिवाद पूर्ण झालाय का असा प्रश्न न्या. चंद्रचूड यांनी विचारला. साळवे पेचात पडले.

पुढे न्या. भगवती म्हणाले, "तुम्ही तीन दिवस गर्ग यांचा युक्तिवाद ऐकला. हा तरुण चांगले मुद्दे मांडतोय. आपले मुद्दे पूर्ण करण्यासाठी त्याला हवा तितका वेळ देण्यात यावा." भगवती यांचे हे शब्द ऐकून साळवे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

त्यादिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंत साळवेंनी युक्तिवाद केला. साळवे सांगतात, "जेव्हा मी माझा युक्तिवाद संपवला तेव्हा पहिली शाबासकी अॅटर्नी जनरल एल.एन. सिन्हा यांच्याकडून मिळाली.

ज्यांना मी आदर्श मानत होतो, ते उभे राहून म्हणाले, "मी गर्ग यांच्या युक्तिवादाला 15 मिनिटात उत्तर देऊ शकतो. मी या तरुणाचं बोलणं व्यवस्थित ऐकलं आहे.

मी माझे मित्र पराशरन (तत्कालीन सॉलिसिटर जनरल) यांना विनंती करतो की त्यांनी आधी या मुलाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी."

4. अंबानी, महिंद्रा आणि टाटांचे वकील

1992 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी टाटा, महिंद्रा आणि अंबानी यांसारख्या मोठ्या घराण्यांची वकिली केली.

अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी

केजी बेसिन प्रकरणात जेव्हा अंबानी बंधुंमध्ये वितुष्ट निर्माण झालं तेव्हा मुकेश अंबानी यांचा पक्ष हरीश साळवे यांनी मांडला.

भोपाळ वायुगळती प्रकरणात युनियन कार्बाईड प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा केशव महिंद्रा यांच्यातर्फे त्यांनी युक्तिवाद केला.

नीरा राडिया प्रकरणात खासगी पणाच्या अधिकाराचा मुद्दा घेऊन सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा त्यांची बाजू साळवे यांनी मांडली.

5. व्होडाफोन खटल्यामुळे आले नावारुपाला

व्होडाफोनने 14200 कोटी रुपयांचा कर कथितरित्या चुकवल्याचं प्रकरण गाजलं होतं. त्यात साळवेंनी व्होडाफोनला विजय मिळवून दिला होता.

सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला होता. भारतीय कर प्रशासनाला परदेशात झालेल्या व्यवहारावर कर आकारण्याचा अधिकार नाही. त्यावेळी नानी पालखीवाला यांचा फोटो समोर ठेवायचो अशी आठवण ते सांगतात.

6. इटलीच्या सैनिकांची बाजू

केरळ मध्ये दोन मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी साळवेंनी इटलीच्या दुतावासाची बाजू मांडली होती. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं.

इटालियन खलाशी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इटालियन नौसेनिक

मात्र जेव्हा इटली सरकारने या मच्छीमांरांना भारताकडे सोपवण्यास नकार दिला तेव्हा साळवेंनी या खटल्यातून फारकत घेतली.

बिल्किस बानो खटल्यातील त्यांचा विजय हाही उल्लेखनीय समजला जातो.

7. गुजरात दंगलीच्या वेळी भेदभावाचा आरोप

गुजरात दंगलीच्या खटल्याच्या वेळी सुप्रिम कोर्टाने त्यांची नियुक्ती अॅमिकस क्युरी म्हणून केली होती. ही व्यक्ती जनहिताच्या प्रकरणी कोर्टाची मदत करते. मात्र काही दंगलग्रस्तांनी साळवेंवर पक्षपाताचा आरोप लावला. साळवे काही पोलिसांना वाचवत आहे असा आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी साळवेंवर केला होता. सुप्रिम कोर्टाने या आरोपांचं खंडन केलं होतं.

8. पियानो वाजवण्याचा छंद

1999 साली रालोआ सरकारच्या कार्यकाळात त्यांची भारताचे सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती झाली. तेव्हा ते 43 वर्षांचे होते. 2002 पर्यंत ते या पदावरती होते.

आपल्या या पदावरील कारकिर्दीबद्दल सांगताना ते म्हणाले होते, 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, माझे मित्र, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी, अनंत कुमार, सुरेश प्रभू आणि इतर नेत्यांकडून मिळालेल्या स्नेहभावाला आणि पाठिंब्याला मी नेहमीच लक्षात ठेवेन. '

त्यांना कायदेविषयक पुस्तकं वाचायला आवडतं. दुसऱ्या महायुद्धातील चर्चिलच्या कारकिर्दीवरचे लेखही त्यांना आवडतात. सानिया आणि साक्षी या आपल्या मुलींशी गप्पा मारणं, पियानो वाजवणं त्यांना फार आवडतं. क्युबाचा जॅझ पियानिस्ट गोंजालो रुबालकाबाचे ते जबरदस्त फॅन आहेत. खासगी संपत्तीबद्दल ते सांगतात, 'स्वतःच्या यशाबद्दल कधीही शरम वाटता कामा नये, मी हे सगळं कष्टानं कमावलं आहे. कोणाच्या थडग्यावर उभं राहून मी आजवरची वाटचाल केलेली नाही.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)