रिलायन्स जिओ 5G नेटवर्क आणणार, गुगल करणार 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक: मुकेश अंबानी

मुकेश अंबानी

फोटो स्रोत, Reuters

गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे. रिलायन्सच्या पहिल्या व्हर्च्युअल अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्यांनी ही घोषणा केली. गुगल जिओचे 7.7 टक्के समभाग घेणार आहे.

त्याचबरोबर रिलायन्स जिओ पुढच्या वर्षी 5G आणणार आहे असंही मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं.

भारत सरकार 5 G लिलावाची तयारी करत असताना गुगलने जिओमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं मानलं जात आहे. मागच्या तीन महिन्यांपासून मुकेश अंबानी यांच्या तंत्रज्ञानविषयक उपक्रमांमध्ये गुगलने गुंतवणूक केलेली आहे.

जिओच्या गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेतील कंपनी फेसबुक, जनरल अटलांटीक, केकेआर, इंटेल कॉर्पोरेशन, अबुधाबी येथील मुबादला तसंच अबुधाबी इनव्हेस्टमेंट एजंसी यांच्यासह सौदी अरबमधील पब्लिक इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांचा समावेश होतो.

गुगलसोबतचा हा व्यवहार नियामक आणि इतर करारांच्या अंतर्गत करण्यात आलेला असल्याचं रिलायन्सने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सोमवारीच गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी भारतात 10 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती.

याआधी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

फेसबुकने रिलायन्स जिओचे 9.99 टक्क्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे आता फेसबुक रिलायन्स जिओमधली सर्वांत मोठी शेअरहोल्डर बनली आहे. त्यानंतर गुगलने 7.7 टक्के घेणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स जिओने 38.8 कोटी लोकांना इंटरनेटशी जोडलं आहे. याने नवीन उद्योगांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि लोकांना नव्या पद्धतीने जोडण्याचं काम केलं. त्यामुळेच फेसबुकने जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला होता.

"आम्ही (फेसबुक) भारतात जिओच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असं फेसबुकने म्हटलं होतं.

फेसबुक

फोटो स्रोत, BBC / Getty

पुढे असंही म्हटलं आहे, "भारतात डिजिटल टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सामाजिक आणि आर्थिक पातळीवर वेगाने बदल घडत आहेत. गेल्या 5 वर्षात भारतात जवळपास 56 कोटी लोक इंटरनेट वापरू लागले आहेत."

"सर्व प्रकारच्या उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देणं, हा आमचा उद्देश आहे. विशेषतः संपूर्ण भारतात पसरलेल्या 6 कोटींहून जास्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणं हे आमचं लक्ष्य आहे. कारण, हेच लहान उद्योग देशात जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध करून देतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)