रिलायन्स जिओ मध्ये फेसबुक करणार 43,574 कोटींची गुंतवणूक, 9.99 टक्के भागीदारी

फेसबुक

फोटो स्रोत, BBC / Getty

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असताना जगातल्या दोन मोठ्या कंपन्यांना एक मोठी घोषणा केली आहे.

सोशल मीडिया जायंट असलेल्या फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या करारानंतर फेसबुकची रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्क्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे आता फेसबुक रिलायन्स जिओमधली सर्वात मोठी शेअरहोल्डर बनली आहे.

फेसबुकने आपल्या न्यूजरूम पेजवर या करारासंबंधीची माहिती प्रसिद्ध केली आहे. "ही गुंतवणूक भारताप्रति आमची वचनबद्धता आणि रिलायन्स जिओने भारतात जे बदल घडवले त्याप्रति आमचा उत्साह दर्शविते.

चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स जिओने 38.8 कोटी लोकांना इंटरनेटशी जोडलं आहे. याने नवीन उद्योगांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि लोकांना नव्या पद्धतीने जोडण्याचं काम केलं.

फेसबुकने म्हटलं आहे, "आम्ही (फेसबुक) भारतात जिओच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत."

पुढे असंही म्हटलं आहे, "भारतात डिजिटल टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सामाजिक आणि आर्थिक पातळीवर वेगाने बदल घडत आहेत. गेल्या 5 वर्षात भारतात जवळपास 56 कोटी लोक इंटरनेट वापरू लागले आहेत."

"सर्व प्रकारच्या उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देणं, हा आमचा उद्देश आहे. विशेषतः संपूर्ण भारतात पसरलेल्या 6 कोटींहून जास्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणं हे आमचं लक्ष्य आहे. कारण, हेच लहान उद्योग देशात जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध करून देतात.

"कोरोना विषाणुच्या या काळात आपण सर्वांनी एकत्र येत या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करणं आणि येणाऱ्या काळात लोकांना आणि त्यांच्या उद्योग-व्यवसायांना मदत करण्यासाठी ठोस व्यासपीठ तयार करणं अत्यंत आवश्यक आहे."

कंपनीने आपली उद्दिष्टं स्पष्ट करताना सांगितलं की रिलायन्स जिओसोबत भागीदारी केल्याने भारतीयांसाठी शक्यतांच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत. त्यासोबतच या भागीदारीचा फोकस वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत परिणामकारकरीत्या काम करणे आणि लोकांसाठी व्यवसायाचे नवे मार्ग तयार करणं असेल.

फेसबुक-रिलायन्स जिओ करार किती महत्त्वाचा?

मुकेश अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी प्रतिनिधी निखील इनामदार यांच्या मते हा करार फेसबुकला भारतात आणखी एक मोठं पाऊल रोवायला मदत करेल. यासोबतच जिओ ज्या सेवा आपल्या ग्राहकांना देते त्या सेवांमध्ये सुसंगतता आणण्यातही मदत होईल. यात लाईव्ह टिव्हीपासून ते म्युजिक स्ट्रिमिंग आणि मनी ट्रान्सफरचाही समावेश आहे.

सध्या फेसबुकचे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत. तर फेसबुकचाच चॅट अॅप असणाऱ्या व्हॉट्सअॅपचे भारतात 30 कोटी सबस्क्रायबर्स आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा विचार केल्यास तर या कराराची कंपनीवर असलेलं कर्ज कमी करण्यास मदत होईल. 2021 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजला 'शून्य कर्ज' असणारी कंपनी बनवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

कोरोना
लाईन

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)