जिओचं गिगा फायबर काय आहे, त्यावर मोफत टीव्ही कसा पाहता येणार?

अंबानी

फोटो स्रोत, AFP

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

जिओ फायबरची घोषणा आज करण्यात आली. पण त्यातही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मुकेश अंबानींनी जाहीर केलेल्या एका खास गोष्टीने.

ते म्हणजे 'जिओ फायबर वेलकम प्लान'मध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी जिओ फायबर सेवा घेणाऱ्यांना मोफत 4K LED टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स देण्यात येणार आहे.

काय आहे जिओ फायबर

ही आहे एक ब्रॉडबॅण्ड सेवा. यामध्ये फायबर टू द होम (FTTH) च्या माध्यमातून थेट घरापर्यंत फायबर कनेक्शन येतं. आतापर्यंतच्या इतर ब्रॉडबॅण्ड सेवांमध्ये फायबर कनेक्शन बिल्डिंगपर्यंत आणलं जातं आणि तिथून घरापर्यंत केबलने कनेक्टिविटी पोहोचवली जाते. पण थेट घरापर्यंत फायबर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जास्त स्पीडचं इंटरनेट कनेक्शन मिळू शकतं.

२०१६ पासून या गिगा फायबरच्या चाचण्या सुरू होत्या आणि सध्या तब्बल ५ लाख घरांमध्ये ही सेवा पायलट बेसिसवर सुरू आहे. पण आता ५ सप्टेंबरपासून ही सेवा सर्वांसाठी खुली होणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योगाच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM)मध्ये जाहीर केलं.

गिगा फायबरची वैशिष्ट्यं काय?

अति-वेगवान इंटरनेट सेवा हे या फायबर नेटचं वैशिष्टयं असेल. जिओ फायबरचे प्लान्स 100Mbps पासून सुरू होतील आणि 1Gbpsचा सर्वोच्च स्पीड उपलब्ध असेल. ही सेवा घेण्यासाठी दरमहा ७०० ते १०,००० रुपयांपर्यंतचे विविध प्लान्स लाँच करण्यात येणार आहेत. एक वर्षासाठी ही सेवा घेणाऱ्यांना मोफत 4K LED टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स देण्यात येणार आहे.

अंबानी

फोटो स्रोत, ANI

याशिवाय प्रिमियम OTT सेवाही यासोबत देण्यात येणार आहेत. हॉटस्टार, नेटफ्लिक्स या OTT प्रकारातल्या सेवा आहेत. पण नेमकी कोणती सेवा असेल, हे मुकेश अंबानींनी स्पष्ट केलं नाही.

यासोबतच जिओ फायबरच्या ग्राहकांना नवीन सिनेमे रीलिज झाल्याबरोबर ताबडतोड पाहता येतील. याला 'जिओ फर्स्ट - डे - फर्स्ट - शो' नाव देण्यात आलं असून २०२०च्या मध्यात ही सेवा सुरू होईल.

इतर सेवा

जिओ फायबरच्या ग्राहकांना फॅमिली प्लान्स, डेटा शेअरिंग, इंटरनॅशनल रोमिंग आणि लँडलाईनवरून आंतरराष्ट्रीय कॉल्स करायला विशेष दरही मिळतील. तर जिओ फायबरच्या ग्राहकांसाठी व्हॉईस कॉलिंगसाठी पैसे आकारले जाणार नाहीत.

जिओ गिगा फायबर सेट टॉप बॉक्स हा स्थानिक केबल ऑपरेटर्सकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेट टॉप बॉक्सने गेमिंगही करता येईल आणि सध्या बाजारात असणारे सगळे गेमिंग कन्ट्रोलर्स यासोबत चालणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

स्पर्धक कोण

एअरटेल कंपनी सध्या भारतात अनेक शहरांमध्ये 100Mbps ची इंटरनेट सेवा पुरवते. You Broadband च्याही काही शहरांमध्ये अशा प्रकारच्या सेवा आहेत. Nextra FiberBolt ही कंपनी उत्तर भारतातल्या काही शहरांमध्ये सेवा देते. पण देशभर सेवा जाहीर करणारी जिओ ही पहिली कंपनी आहे.

रिलायन्समध्ये आरामको कंपनी करणार 75 अब्ज डॉलरची गुंतवणूक

सौदी अरेबियामधली कंपनी आरामको मुकेश अंबानी यांच्या आरआयएल ऑईल टू केमिकलचे 20 टक्के शेअर खरेदी करणार आहे. याचं मूल्य 75 अब्ज डॉलर इतकं आहे. याला सरकारी परवानगी मिळणं अद्याप बाकी आहे.

क्राऊन प्रिंस सलमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युवराज सलमान

मुकेश अंबानी म्हणाले, मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे. रिलायन्सच्या इतिहासात सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक करण्याबाबत एकमत झालं आहे. रिलायन्स आणि सौदीची आरामकोने भागीदारीबाबत निर्णय घेतला आहे.

'आरआयएल ऑईल टू केमिकल'चं बाजारमूल्य पाच लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. रिलायन्स उद्योगसमूहाचा गुजरातच्या जामनगरमध्ये सर्वात मोठा रिफायनिंग प्रकल्प आहे. इथली उत्पादनक्षमता प्रतिदिन 14 लाख बॅरल आहे.

अंबानी यांनी भागधारकांना संबोधित करताना याबाबत सांगितलं. आरामको पाच लाख बॅरल तेल दर दिवशी रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीमध्ये पाठवेल. भारतातली ही सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक असल्याचं सांगितलं जात आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात आरामकोने याबाबतच्या रहस्यावरून पडदा उठवला. मागच्या वर्षी त्यांना 111.1 अब्ज डॉलरचा नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही कंपनीची ही सर्वाधिक कमाई आहे, असं म्हटलं जातं.

2018 मध्ये अॅपलची कमाई 59.5 अब्ज डॉलर होती. यासोबतच इतर तेल कंपन्या रॉयल डच शेल आणि एक्सोन मोबीलसुद्धा या स्पर्धेत खूपच मागे आहेत. आरामकोने आपली कमाई उघड करून त्यांची क्षमता दाखवून दिली.

सौदीतील कारखाना

फोटो स्रोत, Getty Images

आरामकोच्या वतीने आर्थिक आकडेवारी जाहीर करणं म्हणजे बाँड विकून 15 अब्ज डॉलरचं भांडवल उभं करण्याच्या तयारीच्या स्वरूपात पाहिलं जात आहे.

संपत्ती जाहीर करून आरामको आणि सौदी अरब भांडवल जमा करण्यासाठी आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकतात, असं म्हटलं जात आहे. सौदी अरेबिया तेल आणि गॅसवर अवलंबून असलेलं उत्पन्न इतर मार्गांनीही कमावण्याच्या प्रयत्नात आहे.

आरामकोला या पैशांनी सौदी अरेबियाच्या मालकीची पेट्रोकेमिकल कंपनी विकत घेण्यास मदत मिळेल. या कंपनीचे प्रमुख क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान आहेत. हा व्यवहार 69 अब्ज डॉलरचा आहे.

सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत विविधता असावी अशी सलमान यांची इच्छा आहे. अर्थव्यवस्थेचं तेलावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीकोनातून सौदी अरेबिया तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)