लैंगिक शोषण : गुगलने 48 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

फोटो स्रोत, Reuters
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुगलमध्ये कारवाई करण्यात आली आहे. 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 48 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती गुगलने दिली आहे. यांच्यावर गेल्या 2 वर्षांत लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.
गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे गुगल हे पाऊल उचलत आहे, असं पत्र गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हे पत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्ताला उत्तर देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे.
अँड्रॉइडचे निर्माते अँडी रुबिन यांना त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या बदल्यात 90 मिलियन डॉलरची भरपाई देऊन कामावरून काढून टाकण्यात आलं असं या वृत्तात म्हटलं होतं. या वृत्तातील दावा रुबीन यांच्या प्रवक्त्याने फेटाळला आहे.
रुबिन यांनी 2014मध्ये Playground हा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी कंपनी सोडली होती. त्यावेळी त्यांना जबरदस्त फेअरवेल पार्टी देण्यात आली होती, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
"न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट वाचणं त्रासदायक आहे आणि याप्रकारच्या प्रकरणांबाबत गुगल खूपच गंभीर आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित असं कामाचं ठिकाण देण्यासाठी कंपनी प्रतिबद्ध आहे," असं पिचई यांनी म्हटलं आहे.
"लैंगिक शोषणाशी संबंधित प्रत्येक आरोपाची आम्ही चौकशी केली आहे आणि चौकशीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे," असं पिचई यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2013मध्ये एका महिलेनं रुबिन यांनी हॉटेलात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची निश्चिती केल्यानंतर गुगलचे तत्कालीन सीईओ लॅरी पेज यांनी रुबिन यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितलं होतं, असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे.
गुगलने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
"मी कोणतंही गैरवर्तन केलेलं नाही आणि मी स्वत:हून गुगल सोडत आहे," असं रुबिन यांनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








