सचिन पायलट : हवाई दलाचं स्वप्न, राजकारणातील एन्ट्री ते आताच्या बंडापर्यंतचा प्रवास

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातली नाराजी सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? प्रदेशाध्यक्ष आणि तरुण चेहरा असलेल्या सचिन पायलट यांच्या गळ्यात की माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानच्या राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेले अशोक गहलोत यांच्या गळ्यात? हा प्रश्न डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बराच काळ चर्चेत होता. त्यामागे कारणही तसंच होतं.

2018 साली पाच वर्षांनंतर काँग्रेसने राजस्थानमध्ये बहुमत मिळवलं होतं. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या होत्या. मात्र, 2018 मध्ये पक्षाने 99 जागांपर्यंत मजल मारली.

काही ठिकाणी मित्रपक्षांनी बाजी मारली आणि अशाप्रकारे काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत आली.

या विजयाचे शिल्पकार ठरवण्यात आलं - सचिन पायलट यांना. 2018 च्या निवडणुकीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी राज्याचा कानाकोपरा फिरून 2013 मध्ये काँग्रेसपासून दूर गेलेल्या किंवा हताश झालेल्या मतदाराचं मन वळवलं.

मात्र, जेव्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागायची वेळ आली त्यावेळी अशोक गहलोत यांची निवड झाली आणि सचिन पायलट यांना उप-मुख्यमंत्रीपद देण्यात आलं.

सचिन पायलट यांनी 2002 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ते राजकारणाच्या पायऱ्या झपाझप चढल्या.

सचिन पायलट 23 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करायची होती. भारतीय हवाई दलात भरती होण्याचंही त्यांचं स्वप्न होतं.

मात्र, 11 जून 2000 रोजी त्यांचे वडील राजेश पायलट यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्या घटनेने सचिन पायलट यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.

गाडी चालवत गावोगावी फिरणारा नेता

सचिन पायलट यांच्यासाठी राजकारण नवीन नव्हतं. भारतीय राजकारणात त्यांचे वडील राजेश पायलट यांचं नाव मोठं आहे. त्यांच्या आई रमा पायलट यादेखील आमदार आणि खासदार होत्या.

1977 साली उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये जन्मलेले सचिन पायलट यांचं प्राथमिक शिक्षण नवी दिल्लीतल्या हवाई दलाच्या बालभारती शाळेतून झालं. यानंतर त्यांनी दिल्लीतल्याच सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. यानंतर अमेरिकेतल्या एका विद्यापीठातून त्यांनी पद्युत्तर शिक्षण घेतलं.

काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधी सचिन पायलट यांनी बीबीसीच्या दिल्लीतल्या ऑफिसमध्ये इंटर्न म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर अमेरिकी कंपनी जनरल मोटर्समध्येही त्यांनी काही दिवस काम केलं.

मात्र, लहानपणापासूनच त्यांनी हवाई दलात वैमानिक होण्याचं स्वप्न बघितलं होतं.

'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, "जेव्हा मला कळलं की, माझी दृष्टी थोडी कमकुवत आहे त्यावेळी मला खूप वाईट वाटलं होतं. कारण मला मोठं होऊन माझ्या वडिलांसारखं एअरफोर्स पायलट व्हायचं होतं. शाळेत मुलं मला माझ्या पायलट या आडनावावरून चिडवायचे. त्यावेळी मी माझ्या आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं."

मात्र, वडिलांच्या अपघाती निधनानंतर सचिन पायलट यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी तेसुद्धा वडिलांप्रमाणेच स्वतः गाडी चालवून गावोगावी फिरायचे.

काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर 'घराणेशाहीचे' आरोप झाले.

राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी बोलले होते.

ते म्हणाले होते, "राजकारण सोन्याची वाटी नाही की कुणीही पुढे सरकवेल. या क्षेत्रात स्वतःचं स्थान तुम्हाला स्वतःला बनवावं लागतं."

42 वर्षांचे सचिन पायलट आज 17 वर्षं राजकारणात सक्रीय आहेत.

आपल्या या राजकीय प्रवासाविषयी ते म्हणाले होते, "माझे वडील हयात असताना मी कधीही त्यांच्याशी माझ्या राजकीय जीवनाविषयी चर्चा केली नव्हती. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर आयुष्य अचानक बदललं. त्यानंतर मी अत्यंत विचारपूर्वक राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. कुणीही माझ्यावर बळजबरी केली नाही. माझ्या शिक्षणातून मी जे काही शिकलो त्यातून मी व्यवस्थेत बदल घडवू इच्छित होतो."

दलाई लामांकडून नम्रतेची शिकवण

सचिन पायलट दौसा आणि अजमेर मतदारसंघातून खासदार होते.

या निवडणुकींमध्ये त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि थेट लोकांशी संपर्क स्थापन केला.

एका रॅलीत त्यांना पोहोचायला उशीर झाला तेव्हा त्यांनी त्यांना ऐकायला जमलेल्या लोकांची माफीही मागितली होती.

'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले होते, "दलाई लामांप्रती माझ्या मनात नितांत आदर आहे. एखादी व्यक्ती ती कुणीही असो तुमच्यासोबत 30 सेकंदही असेल त्यावेळी तुमच्या मनात नम्रपणा, धीर आणि चेहऱ्यावर सुहास्य असायला हवं, जेणेकरून तुमच्या सोबत असताना त्या व्यक्तीला अवघडल्यासारखं होऊ नये, हीच व्यक्तीची खरी ताकद असते. गेल्या 50 वर्षांपासून हेच सुहास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे."

साराशी लग्न

सचिन पायलट यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची मुलगी साराशी लग्न केलं आहे.

इंडियन टेरेटोरियल आर्मीमध्ये अधिकारी म्हणून काम साभांळणारे सचिन पायलट यांनी मुस्लीम समाजातल्या मुलीशी विवाह करण्यावरून प्रश्न विचारणाऱ्यांना एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं.

सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले होते, "धर्म ही अत्यंत खाजगी बाब आहे. आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना केवळ धर्म आणि जातीच्या आधारावर निर्णय घ्यायचे नसतात."

राहुल गांधींशी संबंध

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक अशी सचिन पायलट यांची ओळख आहे. आपलं म्हणणं अत्यंत स्पष्टपणे मांडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं.

ब्लूमबर्ग क्विंटला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले होते, "राहुल गांधी समाजासाठी काहीतरी करू पाहणारे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यात सत्तालोलुपताही नाही, असं मला वाटतं."

राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बघितलं जात होतं. मात्र, काँग्रेस नेतृत्त्वाचे मुख्यमंत्री पदाची माळ घातली ती ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या गळ्यात.

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन पायलट 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या आधारे गमतीत म्हणाले होते, "या खोलीत सगळेच बसले होते. शेवटी यातले दोघं करोडपती बनतील, हे कुणाला ठाऊक होतं."

गंभीर मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलणारे सचिन पायलट त्यावेळी मनमोकळेपणाने हसतानाही दिसले.

राजकारणात मोकळेपणाने हसणारे खूपच कमी नेते सापडतील.

आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडण्याचं कसब त्यांच्याकडे आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)