कोरोना औषध : बायोकॉन इंजेक्शन बाजारात आणणार, DCGI कडून मंजुरी : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं तसंच वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. बायोकॉन कोरोनावरील इंजेक्शन बाजारात आणणार, DGCI कडून मंजुरी

बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने कोरोनावर इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल. या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे. बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) इटोलीझुमॅब इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे.

कोरोनाची मध्यम ते गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.

"करोनावर लस येईपर्यंत आपल्याला प्राण वाचवणाऱ्या औषधांची गरज आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला लस मिळाली तरी पुन्हा इन्फेक्शन होणार नाही, याची कुठलीही खात्री नाहीये. आपल्याला अपेक्षित आहे त्याप्रमाणेच ती लस काम करेल याचीही कोणती खात्री नाहीये. त्यामुळे आपल्याला तयार राहिले पाहिजे," असं बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझूमदार शॉ यांनी म्हटलं आहे.

2. 'RSS मुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कहर का?'

'संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र काम करून धारावी करोनामुक्त केली असेल तर संघाचे मुख्यालय जिथं आहे, त्या नागपुरात करोनाचा कहर कसा? तिथं संघाचे कार्यकर्ते नाहीत का,' अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीत करोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या कामाला दाद दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसह सर्वांचे आभार मानले आहेत. मात्र, हे श्रेय केवळ सरकारचं नाही, आरएसएसनंही इथं अहोरात्र काम केलंय, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह काही नेते, आमदारांनी केला आहे. त्यावरून राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे.

3. मुंबईत पुन्हा लॉकडाऊनची आवश्यकता नाही- किशोरी पेडणेकर

"मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे," अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. TV9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

"मुंबईत रुग्णसंख्या दुपटीचा दर हा 50 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर डिस्चार्ज रेटही 70 टक्के आहे," असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

सध्या सात ते आठ हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेकडे 250 व्हेटिंलेटर आहेत. सात हजार बेड आहेत, अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली.

4. एसटीला मोठ्या सरकारी बँकेचा कर्ज देण्यास नकार

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्जाच्या शोधात असलेल्या एसटी महामंडळाला बड्या सरकारी बँकेने कर्ज देण्यास नकार दिला आहे. यामुळे आता महामंडळाची भिस्त केवळ सरकारी मदतीवरच अवलंबून आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.

एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पूर्ण पगार अद्याप मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचे पगार आणि पुरवठादारांची थकबाकी देण्यासाठी महामंडळाने सरकारी बँकेकडे कर्ज मिळवण्याबाबत बोलणी सुरू केली होती. त्यानुसार मोठ्या सरकारी बँकेसोबत चर्चा करण्यात आल्या.

एसटी वाहतूक बंद असल्याने रोजचं 23 कोटींचं उत्पन्न बुडत आहे. सामान्य वाहतूक सुरू झाल्याशिवाय हे उत्पन्न भरून काढणे शक्य नाही. राज्यातील सध्याची स्थिती पाहता जवळच्या काळात पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होण्याची शक्यता खूप कमी आहे. हे मुद्दे चर्चेत उपस्थित करण्यात आले. अखेर संचित तोटा आणि वाहतूक बंद असल्याने कर्जाची परतफेड कशी करणार, या मुद्द्यावरून चर्चा फिस्कटली.

5. महाराष्ट्रात सर्वांनी वेगवेगळे लढून पाहू- चंद्रकांत पाटलांचं

सर्वांनी वेगवेगळे लढून पाहू. महाराष्ट्रात एकदा टेस्ट होऊन जावू द्या, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे.

'सामना'साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे. झी24तासनं ही बातमी दिली आहे.

"शरद पवार यांच्या मुलाखती मधून सरकार स्थिर आहे, हे सरकार बदलत नाही हा संदेश द्यायचा होता. या मुलाखातीमधून प्रशासनामध्ये चलबिचल पण सुरू होती. ती थांबवायची होती," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

"देवेंद्र फडणवीस शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत आपलं मत लवकरच मांडतील. भाजप राष्ट्रवादीकडे गेले होते की राष्ट्रवादी भाजपकडे आले होते यावर फडणवीस बोलतील," असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)