कोरोना व्हायरस : लग्नानंतर वधु-वरासह 35 जणांना कोव्हिड-19ची लागण, 7 गावं सील : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं तसंच वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. धूमधडाक्यात केलेल्या लग्नानंतर नवदाम्पत्यासह 35 जणांना कोरोना, सात गावं सील

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने 50 वऱ्हाड्यांमध्ये लग्न लावण्याची मुभा दिली. पण पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हा नियम बदलण्यात आलाय. इथं केवळ 20 वऱ्हाड्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कारण इथं पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यासह 35 हून अधिक वऱ्हाड्यांना कोरोनाची लागण झालीये. त्यामुळे वर-वधूच्या गावांसह सात गावं सील करण्यात आली आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुकमधील मुलाचा धालेवाडीतील मुलीशी नुकताच विवाह झालाय. वर-वधू एकाच तालुक्यातील असल्याने या विवाहात 50 वऱ्हाड्यांची परवानगी धुडकवली गेली. आसपासच्या गावातील पै-पाहुणे आणि मित्र मंडळीच्या मोठ्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला.

विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. नववधू-वर, आई-वडील, पै-पाहुणे, मित्र-मंडळी असे उपस्थित 35 पेक्षा जास्त वऱ्हाडी आजवर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

संपर्कात आलेल्या इतरांची ही तपासणी अद्याप होणं बाकी आहे. परिणामी हिवरे बुद्रुक, धालेवाडी, धनगरवाडी, वडगाव सहाणे, शिरोली, तेझेवाडी, ठिकेकर ही गावं कंटेन्मेंट म्हणून सील करण्यात आलीत.

2. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- संजय राऊत

"सरकार पाडणार... सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच," असं आव्हानच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं.

तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला राज्यातलं सरकार पाडण्याचं थेट आव्हानच दिलं.

"काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. पण हे काही गोवा आणि मध्यप्रदेश नाही. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू. मग रोज सतत पाच वर्षं तुम्हाला मुहूर्तच काढावा लागेल," असा टोलाही राऊत यांनी लगावला.

3. कोरोनाकाळात राज्य सरकारचा भ्रष्टाचार पाहून डोळे पांढरे होतील- चंद्रकांत पाटील

"कोरोना संसर्गाच्या काळात उपचार आणि उपाययोजनांच्या नावाखाली राज्य सरकारने केलेला भ्रष्टाचार पाहून लोकांचे डोळ पांढरे होतील," असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

"मृतदेहाच्या बॅगमध्ये भ्रष्टाचार, तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, रुग्णांना जेवण पुरवण्यात भ्रष्टाचार, मास्कमध्ये भ्रष्टाचार, याशिवाय राज्याच्या ग्रामविकास खात्याने चौदाव्या वित्त आयोगाच्या व्‍याजाचाही गैरवापर केला.

या सर्व विषयांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही विधानसभा अधिवेशनची वाटच बघत आहोत," असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. रविवारी (13 जुलै) कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांचे दावे खोडून काढले.

"भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास विभागावर काही आरोप केले. त्यांनी अज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे वक्तव्य केलं. त्याबद्दल त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी माझी मागणी आहे. त्यांनी माफी मागितली नाही, तर मी त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार आहे," असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.

4. UGC च्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक- मनुष्यबळ विकास मंत्रालय

महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

गुणवत्ता आणि भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिलीये.

कोरोना विषाणू संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा विरोध आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) गेल्या आठवड्यात सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करताना विद्यापीठांच्या परीक्षा जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील, असे स्पष्ट केले होते. 'यूजीसी'च्या एप्रिलमधील सूचनेनुसार या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आलं होतं.

कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे आहे. परीक्षांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी त्यांना आत्मविश्वास आणि समाधान देते. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीचं प्रतिंबिंब त्यांची क्षमता, कामगिरी आणि विश्वासार्हतेवर पडते. कारण या तीन गोष्टी त्यांच्या गुणवत्तेला जागतिक मान्यतेसाठी आवश्यक असतात, असंही मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

5. आपण सेल्फ क्वारंटाइन केलं नसल्याची राज्यपाल कोश्यारींची माहिती

राजभवनातील जवळपास 18 कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी आपल्या म्हटलं होतं. त्यावर स्वतः राज्यपालांनी माहिती दिली असून, आपण स्वतःला क्वारंटाइन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या राजभवनात जवळपास 18 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

त्यानंतर मुंबई महापालिकेनं या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या केल्या आहेत. तसंच राजभवनाचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे.

दरम्यान, करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. ते वृत्त निराधार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

"आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे," असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)