महाजॉब्स पोर्टलवर अर्ज कसा करायचा? नोंदणी कशी करायची?

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औद्योगिक महाजॉब संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही mahajobs.maharashtra.gov.in या साईटवर जाऊ शकाल.
या पोर्टलवर नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
केवळ महाराष्ट्राचे डोमिसाईल असलेल्या उमेदवारांनाच या पोर्टलवर अर्ज करता येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
लॉकडॉऊनमुळे राज्याची आर्थिक स्थितीही कोलमडलेली असताना हजारोंच्या संख्येने नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसंच बेरोजगारीही प्रचंड आहे. या परिस्थितीमध्ये सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलला महत्त्व आहे.
उद्योग मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 50 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यावर 64 हजार उद्योग सुरू झालेत.
इंजिनिअरिंग, आयटी, औषध निर्माण, रसायनशास्त्र अशा एकूण 16 क्षेत्रांसाठी नोकरीची संधी आहे. तर कौशल्य विकास अंतर्गत इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डिंग असे 950 व्यवसायांची सरकारने नोंद घेतली आहे. तेव्हा या आधारावरही उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

"या वेब पोर्टलवर नोकऱ्या देणाऱ्या औद्योगिक कंपन्याही असणार आहेत. यामुळे नोकरीची गरज असणारे आणि नोकरी देणारे या दोघांनाही एकाच मंचावर आणण्यात आले आहे. शिवाय, उमेदवारांना प्रत्यक्षात नोकरी मिळेपर्यंत MIDC अंतर्गत एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असणार आहे," अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या वेबपोर्टलवर अर्ज करताना डोमेसाईल असणं बंधनकारक आहे. "भूमीपुत्रांना संधी मिळण्याकरता डोमासाईलची अट आहे. लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार राज्याबाहेर गेले आहेत. तेव्हा महाराष्ट्रातल्या तरुणांनी या संधीचा फायदा करुन घ्यावा," असंही सुभाष देसाई म्हणाले.
या पोर्टलवर अर्ज कसा करायचा?
या पोर्टलवर नोंदणीसाठी सर्वप्रथम तुमच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल आहे का? याची विचारणा केली जाते.
यानंतर यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरुन पोर्टलवर नोंदणी करायची आहे.
तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी (पर्यायी) ही माहिती दिल्यावर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी निश्चित होईल.
कोरोना व्हायरस जगभरातली आकडेवारी
यानंतर तुमचे शिक्षण याविषयीची माहिती भरायची आहे.
तुम्ही एखाद्या विषयाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचाही उल्लेख करायचा आहे. शिवाय, एखाद्या कामात तुम्ही कुशल असाल तर तुमच्या कौशल्याविषयी माहिती द्यायची आहे.
तुमच्याकडे एखाद्या विषयाचे कौशल्य नसेल तर कौशल्य विकास विभागाला जोडून तुम्हाला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
'एकाच सरकारचे रोजगारासाठी दोन स्वतंत्र पोर्टल'
या वेबपोर्टलवरुन एक नवीन संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात जिल्हा पातळीवर रोजगारासाठी कौशल्य विकास विभागाकडून 'महा स्वयम' नावाचे पोर्टल सुरू आहे.

तेव्हा रोजगारासाठी नोंदणी करता यावी यासाठी एक पोर्टल असताना दुसऱ्या पोर्टलची आवश्यकता काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शिवाय, नोकरी मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या पोर्टलवर नोंदणी करायची ?
"हे पोर्टल स्किल डेव्हलपमेंटवर आधारित आहे. महाराष्ट्रात कोव्हिडच्या काळात गुंतवणूक व्हावी यासाठी MIDC ने स्वतंत्र पोर्टल असावं असा निर्णय घेतला. Mahaswayam.gov.in हे पोर्टल mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलशी जोडलेले असेल. एकाच उमेदवाराला नोकरीसाठी दोन्ही ठिकाणी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही एका पोर्टलवर नोंदणी केल्यावर ती माहिती दोन्हीकडे उपलब्ध असेल." असं स्पष्टीकरण कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.
मेगाभरतीचे काय झाले ?
फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या सरकारी पदांची मेगाभरती मात्र लांबवणीवर पडली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सरकारकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषध निर्माण ही खाती वगळता इतर कोणत्याही खात्यात पुढील आदेश येईपर्यंत भरती होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, NOAH SEELAM/getty
राज्यात शासकीय विभागांमध्ये शेकडो रिक्त पदं आहेत. गृह, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण अशा विविध विभागांसाठी एकूण 72 हजार पदांच्या मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एप्रिलमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल असंही माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सांगण्यात आले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








