भारत-चीन तणाव: नरेंद्र मोदी लेह दौऱ्यासाठी हे लष्करी हॉस्पिटल उभारण्यात आलं का?

भारत चीन तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी लेहला पोहोचले. तिथे त्यांनी सैनिकांची भेट घेत त्यांचं मनोधैर्य वाढवलं. "तुमच्या शौर्याची जाण संपूर्ण देशाला आहे," असं त्यांनी सैनिकांना सांगितलं.

गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची मोदींनी इथल्या एका लष्करी रुग्णालयात विचारपूस केली. मात्र पंतप्रधान मोदींची ही हॉस्पिटल भेट सोशल मीडियावर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

संजय दत्तच्या 'मुन्नाभाई MBBS' चित्रपटात अगदी आयत्या क्षणी असलेल्या जागेतच हॉस्पिटल उभारण्यात येतं. अगदी तसंच पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी लेहमध्ये हे हॉस्पिटल तयार करण्यात आलं, असा आरोप काही लोक सोशल मीडियावर करत आहेत. त्यामुळे अगदी #MunnaBhaiMBBS हा हॅशटॅगही वापरला जातोय.

सरकार तसंच लष्कराने मात्र हे 'तथ्यहीन' आरोप फेटाळले आहेत.

काय आहे या फोटोंमध्ये?

मोदींच्या या फोटोंमध्ये हॉस्पिटल दिसतंय, बेड्स दिसत आहेत, परंतु ना तिथे ड्रिपची व्यवस्था आहे ना बेडशेजारी औषधं. डॉक्टरांच्या जागी फोटोग्राफर आहे, आणि पिण्याच्या पाण्याची बाटलीसुद्धा नाही, अशा काही गोष्टी नेटिझन्सनी लक्षात आणून दिल्या आहेत. त्यामुळे हा सगळा बनावटीपणा मोदी फक्त फोटोंसाठी करत आहेत, असे आरोप होत आहेत.

"तुम्ही हॉस्पिटलमध्ये प्रोजेक्टर, माईक, प्रेझेंटेशनसाठी स्क्रीन पाहिला आहे का?" असा सवाल नेटिझन्सनी केला आहे.

पंतप्रधान मोदी भेट देणार म्हणून लष्कराच्या कॉन्फरन्स हॉलचं हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आलं, असं काहींनी म्हटलं आहे. हॉस्पिटल आहे आणि तरीही एवढी स्वच्छता कशी, असा सवालही काहींनी केला आहे. बेडशीट पांढऱ्याशुभ्र आहेत, कचऱ्याचं कपटही नाही. असं हॉस्पिटल कुठे असतं असंही काहींनी म्हटलं आहे.

मग सत्य काय?

पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या हॉस्पिटल वॉर्डला काही दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जून रोजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी भेट दिली होती. त्यावेळी लष्कराच्या ट्विटर हँडलवर ते फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी यांनी भेट दिलेल्या वॉर्डाचे फोटो आणि लष्करप्रमुख नरवणे यांनी भेट दिलेल्या वॉर्डाचे फोटो सारखेच असल्याचं स्पष्ट होतं आहे. दोन्ही फोटोंमध्ये दिसणारे वॉर्डातील तपशीलही तसेच आहेत. त्यामुळे हे आयत्यावेळी उभारण्यात आलेलं हॉस्पिटल नाही हे सिद्ध होतं आहे.

लष्करातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "पंतप्रधान मोदींनी 3 जुलै रोजी लेह इथल्या हॉस्पिटलला भेटीबाबत प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने तथ्यहीन आणि संदर्भाविना आरोप करण्यात येत आहेत.

"आपल्या शूर सैनिकांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात येतात, यावर शंका घेणं अतिशय दुर्दैवी आहे. भारतीय लष्कर आपल्या सैनिकांसाठी सर्वोत्तम आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देतात," असंही सांगण्यात आलं.

क्राइसिस एक्स्पान्शन कॅपॅसिटी अंतर्गत 100 बेड्सची व्यवस्था करण्यात आली. हा भाग जनरल हॉस्पिटल संकुलाचाच अविभाज्य भाग आहे. कोव्हिडसंदर्भातील नियमावलीमुळे जनरल हॉस्पिटलमधील काही भाग आयसोलेशनसाठी वेगळे करण्यात आले.

हॉलमधल्या स्क्रीन आणि प्रोजेक्टरबाबत लष्कराने सांगितलं, की "या हॉलचा एरव्ही वापर ट्रेनिंग ऑडियो व्हीडिओ हॉल म्हणून करण्यात येतो. या हॉलचं रूपांतर वॉर्डमध्ये करण्यात आलं कारण हे हॉस्पिटल कोव्हिड हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे."

कोव्हिड रुग्णांपासून अंतरावर ठेवण्याच्या दृष्टीने गलवान खोऱ्यातील संघर्षावेळी जखमी झालेल्या सैनिकांना या वॉर्डातच ठेवण्यात आलं आहे. लष्करप्रमुख एम.एम. नरवणे तसंच आर्मी कमांडर यांनीही या वॉर्डाला भेट दिली आहे, असं लष्कराने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)