You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सरोज खान यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
बॉलीवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या.
सरोज खान यांचा समावेश बॉलीवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शकांमध्ये होतो. त्यांनी अनेक लोकप्रिय अभिनेत्यांना नृत्याचे धडे दिले होते.
सरोज यांनी आपलं करिअर सहायक नृत्यदिग्दर्शक म्हणून सुरू केलं. 1974 मध्ये गीता मेरा नाम या चित्रपटापासून त्यांनी स्वतंत्रपणे नृत्यदिग्दर्शनास सुरुवात केली.
त्यांनी आतापर्यंत 2 हजारांपेक्षा जास्त गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. सरोज यांना आतापर्यंत तीनवेळा नृत्यदिग्दर्शनातील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शिवाय आपल्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना इतर अनेक पुरस्कारही मिळाले होते.
सरोज यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तेव्हापासून त्या रुग्णालयातच दाखल होत्या. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्यानंतर आज सरोज यांचं निधन झालं आहे.
सरोज खान यांचं मूळ नाव निर्मला किशनचंद साधूसिंग नागपाल असं होतं. त्यांचा जन्म मुंबईतच झाला होता.
काही दिवसांपूर्वी सरोज खान यांनी बीबीसीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला होता. त्या म्हणाल्या होत्या, "भारताच्या फाळणीनंतर सरोज माझे आई-वडील पाकिस्तानातून भारतात आले होते. आमचं कुटुंब खूप जुनाट विचारांचं होतं, घरात मुलांना कोणत्याही डान्सिंग स्कूल किंवा अभिनय क्षेत्रात पाठवणं, याला मान्यता नव्हती. पण तरीसुद्धा वयाच्या फक्त तिसऱ्या वर्षी मी चित्रपटक्षेत्रात आले."
सरोज खान यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांनी त्या आपल्या सावलीसमोर नृत्य करत आपल्या हालचाली टिपायच्या आणि सराव करायच्या. पण सरोज यांच्या या हालचाली विचित्र वाटल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी यात विचित्र असं काहीच नसून सरोज यांना नृत्याची आवड असल्याचं त्यांच्या आईला सांगितलं. शिवाय, तुम्ही तिला डान्स करण्याची परवानगी का देत नाही, तुम्ही स्थलांतरित असल्यामुळे तुम्हाला पैशांची गरज भासत असणार, असंही डॉक्टर म्हणाले.
पण या क्षेत्रात ओळखी नसल्यामुळे काय करावं, हा प्रश्न सरोज यांच्या कुटुंबीयांसमोर होता. मग डॉक्टरांनीच आपल्या ओळखीच्या लोकांकडे संपर्क साधला व त्यांच्याशी जोडून दिलं. त्यानंतर सुरुवातीला बालकलाकार म्हणून सरोज यांनी काम केलं. पुढे नृत्यदिग्दर्शक म्हणून सरोज यांनी ओळख मिळवली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)