You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस टेस्ट : अँटीजेन आणि अँटीबॉडी टेस्ट नेमक्या कशा होतात?
कोरोना व्हायरसच्या चाचण्यांच्या संदर्भात अँटीजेन, अँटीबॉडी आणि आरटी- पीसीआर अशी विविध नावं ऐकू येतात. मग या अँटीजेन आणि अँटीबॉडी टेस्ट नेमक्या कशा होतात?
पुण्यामध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेमध्ये पुण्यातल्या 51% लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज सापडल्या. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे की नाही, हे समजून घेण्यासाठी अँटीबॉडी टेस्ट केली जाते.
कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची जलद तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने अँटीजेन टेस्ट आणि अँटीबॉडी टेस्ट या दोन चाचण्या करण्याचा निर्णय 26 जूनला घेतला होता. तेव्हापासून या चाचण्या राज्यभर होत आहे.
1 डिसेंबरच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 92.49% आहे.
अँटीजेन टेस्ट
ICMRने ही परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात या टेस्ट्स करण्याची घोषणा केली.
याबद्दल माहिती देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात, "कोरोनाची तपासणी करण्याची सध्याची पद्धत ही RTPCR पद्धतीप्रमाणे होते. याचा रिपोर्ट मिळण्यासाठी 24 तासांचा अवधी लागतो. मात्र, अँटीजेन टेस्टचा आता निर्णय घेण्यात आला आहे. ICMRने याला परवानगी दिली आहे.
या टेस्टमध्ये थ्रोट स्वॅब घेतला जातो आणि त्यानंतर अवघ्या एक तासात त्याचा रिपोर्ट मिळतो. साऊथ कोरियाच्या बायोसेन्सर्स कंपनीने ही टेस्ट बनविली आहे. फ्रंटलाईन वर्कर्सवर ही टेस्ट करणार आहोत. याची किंमत 450 रुपये आहे. एक लाख टेस्ट करणार आहोत, तसंच इतर व्यक्तींवरसुद्धा ही टेस्ट करता येईल. प्रत्येक जिल्ह्यात ही टेस्ट केली जाणार आहे."
अँटीबॉडी टेस्ट
राजेश टोपे पुढे सांगतात, "अँटीजेन टेस्ट बरोबरच आम्ही अँटीबॉडीज टेस्ट करण्याचाही निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी राज्यात कंटेन्मेंट झोन आहेत आणि तिथे रुग्ण वाढीचं प्रमाण सर्वाधिक आहे. अशा ठिकाणी एखाद्याला संसर्ग होऊन गेला आहे का नाही हे तपासण्यासाठी अँटीबॉडी टेस्ट करता येईल. यामध्ये रक्त घेतलं जातं. अर्ध्या तासात रिपोर्ट मिळू शकतो. याला ICMRने मान्यता दिली आहे."
अँटीजेन आणि अँटीबॉडी टेस्टमध्ये फरक काय?
अँटीजेन टेस्टमध्ये थ्रोट स्वॅब घेतला जातो. या स्वॅबमध्ये कोरोनाचे विषाणू आहेत किंवा नाही हे या अँटीजेन टेस्टमध्ये कळतं. कारण, अँटीजेन्स हे विषाणूंचा एक भाग असतात. तर, अँटीबॉडी टेस्ट ही यापेक्षा वेगळी आहे.
अँटीबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्या अँटीबॉडीजची तपासणी ही अँटीबॉडीज टेस्टमध्ये केली जाते. याबद्दलची सविस्तर वैज्ञानिक माहिती आपण आता पुढे पाहूयात.
अँटीजेन टेस्ट कशी होते?
शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंच्या पृष्ठभागावर अँटीजेन्स असतात. आपलं शरीर या अँटीजेन्सना बाहेरून आलेला घटक म्हणजेच फॉरेन बॉडी म्हणून ओळखतात. हा घटक शरीरातला नसल्याचं आपल्याला कळतं.
त्यावर उपाय म्हणून मानवी रक्ताच्या पेशीतले लिंफोसाईट्स नावाचे घटक अँटीबॉडीजची निर्मिती करतात. या अँटीबॉडीजचा आकार हा त्या अँटीजेन्सना सामावून घेईल किंवा त्यांना आपल्याशी जोडून घेईल अशा पद्धतीचा असतो.
त्यामुळे रक्तपेशींनी निर्माण केलेल्या अँटीबॉडीज या त्यावेळी शरीरात प्रवेश केलेल्या विशिष्ट विषाणूलाच प्रतिकार करतात. या अँटीबॉडीज त्या विषाणूंच्या अँटीजेन्सना जोडल्या जाऊन दुसरीकडे नेतात. या प्रक्रियेमुळे विषाणूची मोठ्या प्रमाणात एरव्ही होणारी निर्मिती थांबते आणि शरीरात जास्त संसर्ग होत नाही.
अँटीबॉडीजना जोडल्या गेलेल्या विषाणूंच्या अंटीजेन्सना संपवण्याचं काम फॅगोसायटोसिस या प्रक्रियेद्वारे केलं जातं. आता या प्रक्रियेत नेमकं काय होतं? हा प्रश्न इथे पडू शकतो.
तर या फॅगोसायटोसिस प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक म्हणजेच (फॅगोसाईट्स) पांढऱ्या रक्त पेशी. या पांढऱ्या रक्त पेशी विषाणूंच्या अँटीजेन्सशी जोडल्या गेलेल्या अँटीबॉडीजना गिळून टाकतात. पांढऱ्या रक्त पेशींमध्ये असणारे इंझाईम्स हे काम करतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)