सुशांत सिंह राजपूत : सोनम कपूरचं फादर्स डेचं 'ते' ट्वीट घराणेशाहीचं समर्थन करणारं?

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने रविवारी एक ट्वीट केलं. रविवारी (21 जून) दिवसभर तिचं नाव या ट्वीटसाठी चर्चेत राहिलं. फादर्स डेच्या निमित्ताने तिने केलेल्या ट्वीटमुळे दिवसभर तिच्या नावाचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सोनम कपूरचं ट्वीट असं होतं- फादर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की, मी माझ्या वडिलांची लाडकी लेक आहे. त्यांच्यामुळेच आज मी इथवर वाटचाल केली आहे. म्हणूनच मला खास असल्यासारखं वाटतं आणि हा अपमान नाही. माझ्या वडिलांनी अथक मेहनत करून मला हे सगळं मिळवून दिलं आहे. मी कुठे आणि कुठल्या घरात जन्माला आले हे माझं कर्म आहे. बाबांची लाडकी मुलगी असल्याचा मला अभिमान आहे.

याच ट्वीटमुळे सोनम कपूर चर्चेत आलीये. सोशल मीडियावर अनेकांनी तिची 'शाळा' घेतली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाही होत असल्याच्या चर्चेला उधाण आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली आहे.

अनेकजण सुशांत सिंह राजपूतच्या बाजूने बोलत आहेत. त्यांच्यामते बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध निर्माते केवळ स्टारकिड्स म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्यांच्या मुलामुलींनाच संधी देतात.

सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर चित्रपट निर्माते करण जोहर यांना ट्रोल करण्यात आलं होतं. करण जोहर यांनी चित्रपट व्यवसायातील अनेकांना अनफॉलो केलं होतं.

याच आठवड्यात नकारात्मकतेपासून दूर राखण्यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्वीटर अकाऊंट बंद करून टाकलं. मानसिक आरोग्य राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सोनाक्षीने सांगितलं.

संगीत क्षेत्रात एखाद्या कलाकाराला कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं याबाबत सोनू निगमने एक व्हीडिओ शेअर केला होता. गटबाजी संपली नाही तर संगीत क्षेत्रातून एखादी वाईट बातमी कानावर येऊ शकतं, असं सोनूने म्हटलं होतं.

बॉलीवूडमध्ये घराणेशाहीमुळे चांगली प्रतिभा आणि अथक मेहनत घेणाऱ्यांना संधी मिळत नाही असं ऊर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत यांनी म्हटलं आहे.

सोनमच्या ट्वीटवर लक्ष्मीनारायण यांनी लिहिलं की, प्रिव्हिलेज्ड असणं वाईट गोष्ट नाही. मात्र सगळं काही मिळालेली माणसं, संघर्ष करणाऱ्या कलाकारांची स्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करतात का? आपण अत्यंत संवेदनशील अशा विषयावर बोलत आहोत. घराणेशाहीमुळे तसंच श्रीमंतांच्या मुलांना मिळणाऱ्या प्राधान्यामुळे छोट्या शहरातून येणाऱ्या कलाकारांना काम मिळत नाही, मिळालं तर ते हिरावून घेतलं जातं'.

स्वाती नावाच्या हँडलवर म्हटलं होतं की, प्रिव्हिलेज्ड असण्याबरोबर तुझ्यात थोडी नम्रताही असतं तर बरं झालं असतं.

आनिया अजीज म्हणतात, 'समाजातली असमानता आणि शोषणाची संरचना सोनमला योग्य वाटते. तिने याला 'कर्मा' असं नावही दिलं आहे. गरीबाने गरिबीतच जगावं आणि श्रीमंतांनी श्रीमंतच असावं', असं सोनमला वाटतं.

तेजस म्हणतात सोनमने जातीवाद आणि वर्गवादाची आधुनिक व्याख्याच केली आहे.

'जी माणसं तुझ्यासारखी प्रिव्हेल्जड नाहीत, गरीब आहेत, ते आपल्या कर्मामुळेच गरीब आहेत किंवा त्यांच्या वडिलांनी पुरेशी मेहनत केली नाही. तुला हे माहिती नसावं की प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या भल्यासाठी झटत असतो. स्वत:च्या क्षमतेपेक्षाही मेहनत करत असतो', असं मनमीत यांनी म्हटलं आहे.

सुमीन विश्वकर्मा म्हणतात, 'तुम्हाला तुमच्या वडिलांचा अभिमान वाटलाच पाहिजे. पण मग त्या बापाचं काय ज्याला आपल्या मुलाचा अभिमान होता? घराणेशाहीमुळे इंडस्ट्रीत बाहेरून येणाऱ्यांची वाट अडवली जाते'.

अभिषेक सिंह म्हणतात, 'वडिलांमुळे अभिनेत्री झाले हे सोनमने मान्य केलं हे बरं झालं. प्रिव्हिलेज्ड असण्याचा तिला अभिमान आहे. स्वत:मध्ये काहीही नैपुण्य नाही तरीही अभिनेत्री झाले हे चारचौघात सांगायला धैर्य लागतं. वडिलांच्या प्रभावामुळे ती इंडस्ट्रीत टिकून आहे. प्रांजळपणे कबुली दिल्याबद्दल सोनम तुझे आभार', असं अभिषेक सिंग यांनी उपरोधाने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)