कोरोना व्हायरस मुंबई : धारावीत कोव्हिड-19 रुग्ण वाढीचा वेग असा मंदावला

फोटो स्रोत, ANI
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वेगानं वाढत असताना, धारावीत मात्र रुग्णांच्या संख्येला ब्रेक लावण्यात शासन-प्रशासनाच्या यंत्रणेला यश आलंय.
मुंबई महपालिकेच्या माहितीनुसार, धारावीतील 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा (Doubling Rate) दर 80 दिवसांवर पोहोचलाय.
धारावीतील कोरोनाबाबत आकडेवारी:
- रुग्णांचा रिकव्हरी रेट - 50 टक्के
- 21 जूनपर्यंत रुग्णांची संख्या - 2170
- मृत्यू - 80
मुंबई महानगरपालिकेनं ही आकडेवारी जाहीर केलीय.

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
धारावीत एक एप्रिलला कोरोनाने शिरकाव केला. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि यंत्रणा कामाला लागली. अत्यंत दाटीवाटीने वसलेली घरं, 10 बाय 10 फूटाच्या घरात 10 ते 15 पेक्षा जास्त राहणारी लोक, शक्य नसणारं सोशल डिस्टंसिंग, रस्त्यावरून चालताना अंगाला-अंग लागणारच अशी परिस्थिती आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांवर अवलंबून असणारी 80 टक्क्यांपेक्षा जास्त जनता, हे धारावीचं रूप.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

धारावीत कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण कोणत्या कारणांनी मिळालं. याबाबत आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
'मिशन धारावी'
धारावीचा परिसर 2.5 स्वेअर किलोमीटचा. पण 9 लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती इथेच आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाचा संसर्ग झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वर्तवण्यात येत होती. राजकारणी, मंत्र्यांपासून सर्वांचं लक्ष धारावीकडे होतं. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण मिशनरी धारावीवर केंद्रीत केली.
मुंबई महापालिकेने "चेस-द-व्हायरस" ही संकल्पना राबवली. ताप, सर्दी, खोकला किंवा न्यूमोनियाची लक्षणं असणारे रुग्ण डॉक्टरांकडे येण्याआधीच प्रशासनाने थेट धारावीच्या गल्लो-गल्लीत घुसून लोकांची तपासणी सुरू केली. रुग्णांची वाट पाहण्यापेक्षा, डॉक्टरांनाच घरोघरी लोकांकडे पाठवण्यात आलं.
या कारणांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण शक्य
- फिव्हर कॅम्प घेतले. (तापाचे रुग्ण शोधण्यासाठी)
- घरोघरी जाऊन लोकांचं स्क्रिनिंग केलं.
- ऑक्सिमीटरने लोकांच्या शरीरातील ऑक्सिजनची तपासणी केली.
- कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं.
- सार्वजनिक स्वच्छतागृहांचं निर्जंतुकीकरण केलं.
- होम क्वारंटाईनपेक्षा इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईनवर भर दिला.

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
याबाबत बीबीसीशी बोलताना धारावीच्या आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात, "धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सार्वजनिक स्वच्छतागृहांचं वेळोवेळी होणारं निर्जंतुकीकरण आणि घरोघरी जाऊन करण्यात आलेली तपासणी. खासगी डॉक्टर, फिव्हर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. रुग्ण डॉक्टरांकडे येण्याची वाट पाहण्यापेक्षा आम्ही घरोघरी जाऊन संशयित रुग्ण शोधून बाहेर काढले. यामुळे धारावीत कोरोनाचा संसर्ग पसरला नाही."
धारावीत जून महिन्यात किती रुग्ण सापडले?
(स्रोत - मुंबई महापालिका)
धारावी म्हटल्यावर अत्यंत गर्दीचा, दिवस-रात्र कायम गजबजलेला, लोकांची रस्त्यांवर रिघ असलेला परिसर डोळ्यासमोर येतो. कोरोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. यामुळे मुंबई महापालिकेने काही विशेष उपाययोजना या भागात राबवल्या.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,
- हाऊस-टू-हाऊस सर्व्हे मध्ये जवळपास 4,76,000 लोकांची तपासणी करण्यात आली.
- खासगी डॉक्टरांनी हॉट स्पॉटमध्ये राहत असलेल्या 2.5 लाख लोकांची तपासणी केली.
- यामध्ये 8,246 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी झाली.
- तर 14,970 लोकांची मोबाईल क्लिनिकच्या मदतीने तपासणी करण्यात आली.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल पाचणेकर गेली 30 वर्षांपेक्षा जास्त काळ धारावीत रुग्णसेवा देतायत.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणतात, "धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याची तीन प्रमुख कारणं आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतानाच पहिल्या फेजमध्ये हॉटस्पॉटमध्ये घरोघरी जावून लोकांची तपासणी करण्यात आली. दुसऱ्या फेजमध्ये धारावीतील 350 डॉक्टरांनी आपली क्लिनिक सुरू केली. त्याचसोबत लोकांना हात सतत का धुवावेत, स्वच्छता कशी पाळावी, मास्कचा वापर याबाबत प्रबोधन करण्यात आलं."
इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईनवर भर
धारावीत घरं छोटी, एकमेकांना खेटून उभारलेली. 100 फूटांच्या घरात 10 ते 15 लोक राहतात. त्यामुळे घरात क्वारंटाईन होणं शक्य नव्हतं. त्यामुळे प्रशासनाने संशयित लोकांना त्यांच्या घरात ठेवण्यापेक्षा घरातून बाहेर काढून इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवलं. याचा फायदा म्हणजे, संशयित इतरांच्या संपर्कात आले नाहीत आणि संसर्ग लोकांमध्ये पसरला नाही.
धारावीत सामाजिक अंतर शक्यच नाहीत. एकाच्या घरात दुसऱ्याची खिडकी, एकाने दरवाजा उघडला तर दुसऱ्याचं घर बंद, समोरासमोरच्या दोन घरांमध्ये फक्त काही फुटांचं. पुरेसा श्वास घेणंही शक्य नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे मते लोकांना बाहेर काढणं का एकच पर्याय होता.

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
धारावीत इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईन हा एकच पर्याय होता का? आणि तो किती यशस्वी झाला? याबाबत विचारल्यानतंर जी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणतात,
"धारावीतील कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सेंटरनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. लोकांना घरात ठेवणं शक्यच नव्हतं. होम क्वॉरेंन्टाईन हा पर्यायच नव्हता. त्यामुळे आम्ही 12 ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारले.
तब्बल 9,000 लोकांना इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आलं. वेळीच लोकांना धारावीतून बाहेर काढल्यामुळे या संशयितांच्या कुटुंबीयांना लागण झाली नाही. केसेस जरी वाढत असल्या तरी मृत्यूचं प्रमाण कमी होतं."
"खासगी डॉक्टरांकडे ताप, सर्दी, खोकला किंवा शरीरात ऑक्सिजनची मात्र कमी झालेले रुग्ण आढळून आले की महापालिकेला माहिती दिली जायची. पोलीस आणि महापालिका या रुग्णांना इंस्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवायचे. घरं लहान असल्याने होम क्वॉरेंन्टाईन शक्य नव्हतं. इंस्टिट्युशनल क्वारंटाईनचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. संशयित रुग्ण इतकांच्या संपर्कात आले नाहीत आणि संसर्ग कमी झाला, " असं डॉ पाचणेकर म्हणतात.
धारावीची महिनानिहाय परिस्थिती
एप्रिल -
- कोरोनाग्रस्तांची संख्या - 491
- ग्रोथ रेट - 12 टक्के
- डबलिंग रेट - 18 दिवस
- रिकव्हरी - 33 टक्के
- मृत्यू - 5.5 टक्के
मे -
- कोरोनाग्रस्तांची संख्या - 1216
- ग्रोथ रेट - 43 टक्के
- डबलिंग - 43 दिवस
- रिकव्हरी - 43 टक्के
- मृत्यू - 4 टक्के
जून -
- केसेस - 274
- ग्रोथ रेट - 1.1 टक्का
- डबलिंग रेट - 80 दिवस
- रिकव्हरी - 49 टक्के
- मृत्यू - 3.7 टक्के
सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर पुढे म्हणतात, "धारावीत कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यामागे सरकारी आणि खासगी क्षेत्र दोघांचंही मोठं योगदान आहे. सामाजिक संस्थांनी लोकांना राशन पुरवलं. कंटेनमेंट झोनमध्ये लोकांच्या घरापर्यंत सर्व वस्तू पोहोचवण्यात आल्या. खासगी हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांनी केलेले प्रयत्न यामुळेच धारावीत सद्य स्थितीत रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे."

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

धारावीत सद्यस्थिती
- कोरोना संशियत रुग्णांसाठी 3840 खाटा
- कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी 800
- रुग्णालयात 100 खाटा
- येत्या काही दिवसात 200 खाटा अजून वाढवण्यात येतील
माटुंगा लेबर कॅम्पमध्ये वाढत्या केसेस
माटुंगा लेबर कॅम्प हा धारावीतीलच एक परिसर आहे. धारावीत कोरोनाच्या केसेस नियंत्रणात येत असतानाच या भागात मात्र परिस्थिती गंभीर आहे. हा परिसर धारावीच्या क्षेत्रफळाच्या फक्त सात टक्के आहे. मात्र, धारावीतील एकूण कोरोनाबाधितांपैकी 23 टक्के रुग्ण याच भागात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत बोलताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणतात, "माटुंगा लेबर कॅम्पमध्ये कोरोनाच्या केसेस जास्त आहेत ही खरी गोष्ट आहे. आम्ही आता या विभागावर लक्ष केंद्रीत केलंय. या भागात सद्य स्थितीत 243 केसेस आहेत. या भागात रुग्णालयं, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. यामुळे या भागात जास्त रुग्ण आहेत का याची आता आम्ही तपासणी करतोय. लेबर कॅम्पसोबतच 90 फिट रोड, धारावी क्रॉस रोड, कुंची कोर्वे नगर या भागावर आता लक्ष केंद्रीत करण्यात आलंय."
धारावीत राहणारे विश्वनाथ प्रभू आयटीमध्ये काम करतात. धारावीत कोरनाचा संसर्ग कमी झालाय, याबाबत बोलताना ते म्हणतात, "माझ्या सोसायटीत 1000 लोक राहतात. 2 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 9 लोक डिस्चार्ज झाले. दोघांवर अजूनही उपचार सुरू आहेत. इथे लोकं मास्क न घालता फिरताना पहायला मिळतात याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं. केसेस कमी झाल्या कारण टेस्ट होत नाहीत. आता बंधंनं शिथिल झाल्यामुळे लोक बाहेर पडतायत. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड होण्याची भीती आहे. पालिकेने आता जास्त लक्ष दिलं पाहिजे."
धारावतीले रहिवासी भीतीत
धारावीतील कोरोनाची साथ नियंत्रणात येऊ लागली असली तरी, इथे राहणाऱ्यांना अजूनही भीती वाटते. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अनिश जॉज राहतात. त्यांचं धारावीत हॉटेल आहे. लॉकडाऊनपासून हॉटेल बंद आहे. अनिश आता आपल्या कुटुंबीयांना घेवून आपल्या गावी केरळला गेलेत.
बीबीसीशी बोलताना अनिश म्हणतात, "धारावीत लोकांनी सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही. कोणीच ऐकत नव्हतं. त्यामुळे केसेस वाढू लागल्या. त्यामुळे मे महिन्यात मी कुटुंबाला घेऊन माझ्या गावी केरळला येण्याचा निर्णय घेतला. अजूनही काही दिवस गावालाच राहणार आहे. धारावीत वाढत्या केसेसमुळे भीती वाटायची. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईला परतेन, पण परिस्थिती पूर्णत: निवळली की. कधी येईन हे आत्ता सांगू शकणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
अनिश सारखे जवळपास दीड लाख लोक धारावी सोडून गेलेत. पालिकेच्या माहितीनुसार, धारावी सोडून जाणारे बहुशांत जरी कारखान्यात, लेदर कारखान्यात काम करणारे गरीब मजूर आहेत. हाताला काम नाही, कोरोनाची भीती यामुळे हे मजूर आपल्या गावी परत गेले आहेत.
हळूहळू पूर्ववत होणारं जनजीवन
मुंबईत लॉकडाऊन नियम शिथिल केल्यांनतंर धारावीतही ऑड-इव्हन फॉर्म्युलाद्वारे दुकानांना खुलं ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे धारावीचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय.
सहाय्यक आयुक्त किरण दिघावर सांगतात, "आम्ही दुकानांना परवानगी दिली आहे. ऑड-इव्हन फॉर्म्युलाद्वारे दुकानं उघडी रहात आहेत. हळुहळु धारावी पूर्पपदावर येईल. मात्र, हे होत असताना पावसाळ्यात कोरोनासोबत डेंग्यू, मलेरियाची साथ पसरणार नाही याकडे आमचं लक्ष आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वारंटाईनसाठी घेतलेल्या पालिका शाळा निर्जंतुकीकरन करून शिक्षण विभागाला देण्यात येणार आहेत. जेणेकरून येणाऱ्या काळात मुलांचं शिक्षण सुरू होईल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








