कोरोना लॉकडाऊन : मजुरांच्या हालाखीला कोण जबाबदार?

MayankBhagwat

फोटो स्रोत, MayankBhagwat

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

केंद्रातलं मोदी सरकारचं रेल्वे मंत्रालय आणि राज्यातील ठाकरे सरकार आमने-सामने उभं ठाकलंय. मजुरांसाठी सोडल्या जाणाऱ्या श्रमिक ट्रेन्सवरून नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय.

हा विसंवाद इतका पराकोटीला गेला आहे की, भारतासमोर कोरोनाचं संकट आहे याचं बहुदा या राजकारण्यांना भान उरलेलं नाही. एसी ऑफिसमध्ये बसून ट्विटवर आणि फेसबुकवर हे राजकारणी आरोप प्रत्यारोप करतायत. पण, नेत्यांच्या भांडणात जीव जातोय तो सामान्यांचा….

त्यामुळेच घरी जाण्याच्या आशेनं रेल्वे स्टेशनवर गर्दी करणाऱ्या मजुरांच्या हालाखीला कोण जबाबदार?

वसईतील सन सिटी ग्राउंडवर मंगळवारी हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी जमा झाली होती. ट्रेन सुटेल आणि आपल्याला आपल्या गावी, घरी जायला मिळेल. मुंबईत लॉकडाऊनचे दोन महिने कसेतरी काढले. आता आपले कष्ट संपले... या आशेने लोकांची गर्दी सिटी ग्राउंडमध्ये जमा झाली होती.

या गर्दीतीलाच एक चेहरा होता 58 वर्षीय विदोत्तमा शुक्ला. विदोत्तमा ट्रेन मिळेल म्हणून आपल्या मुलासह वसईच्या सन सिटी ग्राउंडवर आल्या होत्या.

सकाळपासूनच लोकांची गर्दी जमा झाली होती. ऊन चढू लागलं. मात्र, रणरणत्या उन्हातही लोक मैदानात बसले होते. पोलिसांच्या आदेशाची वाट पहात होते. कधी एकदा पोलीस ट्रेन येण्याची आनंदाची बातमी सांगतात. आपण आपल्या गावी जातो याची आतुरता सर्वांच्याच मनात होती आणि अचानक विदोत्तमा शुक्ला यांना चक्कर आली.

बीबीसीशी बोलताना त्यांचा मुलगा विनय शुक्ला यांनी म्हटलं, "सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आईला घेवून मी सन सिटी ग्राउंडवर पोहोचलो. खूप गर्दी होती. आम्हीसुद्धा मैदानात सर्वांसोबत बसलो होतो. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आईला अचानक चक्कर आली. तब्येत खराब होऊ लागली. पोलिसांच्या मदतीने तात्काळ अॅम्ब्युलन्समधून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं."

कोरोना
लाईन

"रुग्णालयात आल्यानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टांनी सांगितलं उन्हामुळे त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता आहे. याला जबाबदार कोण? कोण गुन्हेगार? कोणावर आरोप करायचा? याने माझी गेलेली आई परत येणार नाही," असं विनय यांनी म्हटलं.

हे कधी संपणार, आम्ही घरी जाऊ शकणार का नाही? असे प्रश्न आमच्यासमोर उभे आहेत. काम नाही, घर कसं चालवायचं हा प्रश्न असताना आता माझी आई मला सोडून गेली, असं दुःख विनय शुक्ला यांनी व्यक्त केलं.

याबाबत बोलताना वसईच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील यांनी सांगितलं, "मंगळवारी (26 मे) सन सिटी ग्राउंडवर लोकं गावाला जाण्यासाठी जमा झाले होते. ट्रेन कधी सुटणार याची वाट पाहत होते. त्यातील एका महिलेल्या अचानक लो-ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दुर्दैवाने त्यांना मृत्यू झाला."

MayankBhagwat

फोटो स्रोत, MayankBhagwat

विनय यांनी उपस्थित केलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या घटनेला जबाबदार कोण? विदोत्तमा यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

पण, विदोत्तमा एकट्या नाहीत. केंद्र आणि राज्यात रेल्वेवरून सुरू असलेल्या वादात भरडल्या जाणाऱ्या लाखो विदोत्तमा देशभरात आहेत. केंद्र आणि राज्याच्या वादात हजारो मजूर रोज भरडले जात आहेत.

वसईत हजारो लोक रस्त्यावर

मंगळवार (26 मे) सारखीच वसईतून बुधवारीही (27 मे) दोन ट्रेन उत्तरप्रदेश आणि दोन पश्चिम बंगालला सुटणार, अशी माहिती लोकांना मिळाली. घरी जाता येणार या आशेने हजारो लोकं पुन्हा सन सिटी ग्राउंडवर जमा झाले.

कोणी राहतं घर सोडलं, कुणी भाड्याचं घर सोडून गावाला निघाला, तर कोणी रात्रभर ट्रेन मिळेल या आशेने रस्त्यावरच थांबला. पण, पुन्हा या लोकांच्या पदरी निशाराच पडली. सन सिटी ग्राउंडवर चार तास थांबल्यानंतर ट्रेन पुढील काही दिवस जाणार नाही अशी बातमी आली.

लाईन

लाईन

पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी वसई-रोड स्टेशनवरून चार ट्रेन सुटणार अशी शक्यता होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याबाबत काहीच ठोस माहिती आली नाही. ट्रेन्स सुटतील या आशेने हजारो लोकं जमा झाले होते.

"आम्ही त्यांना समजावून पुन्हा घरी जाण्याची विनंती करतोय. रेल्वे प्रशासनाकडून पुढे ट्रेन कधी जाईल याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही लोकांना गर्दी करू नका अशी विनंती करतोय."

हे मुद्दाम घडवलं जातंय का?

लोकांना ट्रेन सुटेल अशी माहिती मिळणं आणि त्यानंतर ट्रेन न जाणं या गोष्टी जाणून-बूजून करण्यात येत आहेत का? हा प्रश्न राज्यातील सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय.

याबाबत राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं होतं, "आम्हाला दुसऱ्या बाजूने जो रिस्पॉन्स मिळतो तो योग्य नाही. आम्ही 178 ट्रेनची मागणी केलीये. लोकांना एका स्टेशनवरून ट्रेन जाईल असं सांगून दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन सोडण्यात येते. हे कन्फ्यूजन जाणून-बूजून करण्यात आलंय का? आम्हाला माहित नाही. पण, हे टाळता येऊ शकतं. राज्य सरकार आणि पालिकेच्या तयारीप्रमाणे ट्रेन देण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे."

आजारी मुलीला घेऊन बाप रस्त्यावर

उत्तरप्रदेशच्या अलाहाबादचे वासीम खान आपल्या15 वर्षांच्या मुलीसोबत अडीच महिन्यांपूर्वी मुंबईला आले. आलियाला मेंदूचा आजार आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या 'बिइंग ह्युमन' फाउंडेशनकडून मुलीच्या आजारासाठी मदत मिळेल या आशेने ते मुंबईत पोहोचले. वासीम मुंबईत आले आणि लॉकडाऊन सुरू झाला.

ट्रेन सुरू होईल, गावाला जाता येईल, या भाबड्या आशेने आपल्या कुटुंबासह त्यांनी वसईच्या सन सिटी ग्राउंडची वाट धरली. पण, त्यांच्याही पदरी निराशाच पडली.

MayankBhagwat

फोटो स्रोत, MayankBhagwat

बीबीसीशी बोलताना वासीम म्हणतात, "आलियाला मेंदूचा आजार आहे. उपचारांसाठी पैशांची गरज आहे. आम्हाला कळलं, की सलमान खान आजारी मुलांसाठी पैशाची मदत करतो. अशा मुलांचे उपचार करतो. म्हणून आम्ही मुंबईत आलो. वसईत महिन्यासाठी घर भाड्याने घेतलं. पण मुंबईत आलो आणि लॉकडाऊनमध्ये अडकलो. अडीच महिने झाले. पैसे संपले. गावाला जाऊ म्हणून ट्रेनची आशा होती. पण आता काय करणार असा प्रश्न पडलाय."

बीबीसी मराठीने वासीम यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा ते आपल्या कुटुंबीयांसोबत सन सिटी ग्राउंडच्या जवळ फुटपाथवर बसले होते. फुटपाथच आता त्यांचं घर बनलं आहे.

वासीम म्हणतात, "माझ्याकडील सर्व पैसे संपलेत. ट्रेन मिळेल या आशेने भाड्याचं घर सोडलं. आता मालक पुन्हा घरात घेणार नाही. ट्रेन सुटेल अशी आशा होती. पण, आता पुढील चार दिवस ट्रेन सुटणार नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिलीये. आता मी करायचं काय? आजारी मुलीला घेवून कुठे जाऊ? एक रात्र रस्त्यावर काढलीये. आता पुढचे चार दिवस कसं जगायचं हा प्रश्न आहे."

कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर

वसई, नालासोपारा, विरार या भागातील हजारो परप्रांतीय वसईमध्ये जमा झालेत. पूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊन ट्रेनची वाट पाहत आहेत. ट्रेन कधी येईल याची खात्री नसतानाही वाट पहात बसले आहेत.

याबाबत वसईतील समाधान फाउंडेशनचे हानिफ पटेल म्हणतात, "रेल्वे प्रशासनाचा गोंधळ कळतच नाही. आम्ही 15 दिवसांपूर्वी 5000 लोकांची लिस्ट दिली आहे. पण, अजूनही ट्रेनबाबत काहीच माहिती मिळत नाही. तुम्हाला ट्रेन देण्यात येईल असं आश्वासन देण्यात येतं. मात्र, प्रत्यक्षात लोकांच्या पदरी ताटकळत बसण्याशिवाय काहीच येत नाही. हजारो लोक जमा होतात, ट्रेनची वाट बघतात. हे लोक कुठे जातील? काय करतील? याचा विचार प्रशासन करत नाही."

या मजूरांच्या हाताला मुंबईत काम नाही. अशा परिस्थितीतही केंद्र आणि राज्यात राजकारण सुरू आहे. मात्र या भांडणात जीव जातोय तो सामान्यांचा आणि गरीब मजुरांचा जो आपल्या गावी सुरक्षित पोहोचण्यासाठी धडपडतो आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)