कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्र आणि उत्तर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू लागलंय. महाराष्ट्रात दुपारी 3.04 वाजेपर्यंत हे सूर्यग्रहण दिसेल. राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधूनही कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू लागलंय.

गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा दुर्मिळ योग आला आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? ते कुठून दिसणार आहे? तुम्हाला ते कसं पाहता येईल?

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतातत, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. ही ग्रहणं तीन प्रकारची असतात आणि शाळेत याविषयी आपण शिकलो आहोत. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती.

ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.

सूर्यग्रहण तुम्ही या लिंकवर क्लिक करून पाहू शकता...

पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.

एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.

पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.

याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात.

सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.

हे ग्रहण वेगळं का आहे?

एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखादं दुसरंच खग्रास ग्रहण असतं आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाही. आणि कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी त्याहीपेक्षा दुर्मिळ.

भारतातून याआधी गेल्या वर्षअखेरीस, म्हणजे 26 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसलं होतं. पण त्याआधी गेल्या पाच दशकांचा विचार केला, तर भारतातून 15 जानेवारी 2010 रोजी कंकणाकृती ग्रहण दिसलं होतं.

पण आता सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, मात्र त्यानंतर पुढची जवळपास अकरा वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही. भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा पुढचा योग 21 मे 2031 रोजी येणार आहे.

यंदाचं कंकणाकृती ग्रहण कुठे पाहायला मिळेल?

कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच 'ring of fire' दिसून येते. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं.

येत्या रविवारी दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था यंदा दक्षिण सुदान, इथियोपिया, येमेन, सौदी अरेबिया, ओमान, पाकिस्तान या देशांतील काही भागातून दिसेल.

भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून हे ग्रहण कंकणाकृती स्थितीत दिसणार आहे. तर भारताच्या बाकीच्या भारतात खंडग्रास स्थितीत ग्रहण पाहायला मिळेल.

महाराष्ट्रातून खंडग्रास ग्रहण दिसणार असून साधारण 70 टक्के सूर्य झाकला गेलेला पाहायला मिळेल.

ग्रहण पाहण्याची वेळ काय?

भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ग्रहणाची सुरूवात होईल. पण तुम्ही नेमकं कुठल्या देशातून आणि कुठल्या शहरातून ग्रहण पाहणार आहात, त्यानुसार वेळेत थोडा फरक पडू शकतो.भारतातून साधारण सकाळी सव्वा दहा ते दुपारी पावणेदोन या वेळेत हे ग्रहण दिसणार आहे.

उत्तर भारतात हरयाणाच्या कुरुक्षेत्र इथे सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहणाची सुरूवात होईल. दुपारी 12 वाजून एक मिनिट ते 12 वाजून दोन मिनिटे अशी साधाराण एक मिनिटापर्यंत ग्रहणाची कंकणाकृती अवस्था पाहता येईल. तर दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात.

महाराष्ट्रातून खंडग्रास ग्रहण दिसण्याच्या वेळा अशा आहेत :

मुंबई - 10.01 ते 13.28

पुणे - 10.03 ते दुपारी 13.03

नाशिक - 10.04 ते 13.33

नागपूर - 10.18 ते 13.51

औरंगाबाद - 10.07 ते 13.37

ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?

ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते. पिनहोल कॅमेरा कसा तयार करायचा, त्याची माहिती इथे पाहू शकता.

तुमच्या शहरात किंवा शाळेत एखादं विज्ञानकेंद्र असेल किंवा विज्ञानप्रेमींची संस्था असेल, तर तिथे अनेकदा ग्रहण पाहण्यासाठी विशेष सोय केलेली असेल. त्याविषयीची माहिती घ्या.

सध्या लॉकडाऊन आणि कोव्हिडच्या साथीमुळे अशा संस्था बंद असण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळातलं ग्रहण

एरवी अनेक हौशी खगोलप्रेमी ग्रहण पाहण्यासाठी जिथे ते सर्वोत्तम स्थितीत दिसेल, अशा जागी जातात. पण यंदा कोरोना विषाणूच्या साथीमुळे अभूतपूर्व स्थिती असताना हे कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. त्यामुळे अनेकजण प्रवास टाळण्याच्या विचारात आहेत.

पण तरीही ग्रहणकाळात कुरुक्षेत्र किंवा अन्य ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता टाळता येणार नाही, असं सोमण सांगतात. "उत्तर भारतात ग्रहणकालामध्ये तीर्थस्नानाची प्रथा आहे. कुरुक्षेत्र हे आधीच आपल्याकडे महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ग्रहणकालात तिथल्या ब्रह्मसरोवरात तीर्थस्नानासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारला तिथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल."

'गैरसमज बाजूला सारून ग्रहणाचा आनंद घ्या'

ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होतं असं लोकांना वाटायचं. ग्रहणात हवा, पाणी अन्नपदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता. त्यामुळं पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत, साठवलेले सर्व पाणी ओतून टाकीत व नव्याने पाणी भरत असत.

पण अशा प्रथा चुकीच्या असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, "ग्रहण सुटले म्हणून आंघोळ करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण ग्रहणात काहीही अशुद्ध होत नाही. ग्रहणात जेवू नये, ग्रहणात झोपू नये, ग्रहणात मलमूत्र विसर्जन करू नये असेही सांगितले जाते. परंतु त्यात काहीही तथ्य नाही. काही लोक मला प्रश्न विचारतात की, आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे ? मी त्यांना सांगतो, की जे लोक ग्रहण पाहतील, त्यामागचे वैज्ञानिक कारण समजून घेतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)