You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन सीमावाद: गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत किमान 20 भारतीय जवान मृत्युमुखी
गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीतला आधी भारताचे तीन जवान मृत्युमुखी झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
पण या चकमकीत किमान 20 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. ही गेल्या 45 वर्षांतील सर्वांत मोठी चकमक असल्याचं म्हटलं जात आहे.
लष्कराने सांगितलं आहे की या चकमकीत 17 सैनिक गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं लष्कराने सांगितलं होतं.
भारत सरकारनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गलवान व्हॅली सीमेवर सैनिक मागे हटत असतानाच ही चकमक झाली. भारत-चीन सीमेवर गलवान व्हॅली भागात सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांमधील सैन्यात चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्कराचे एक अधिकारी आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.
शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखं दुःख - राहुल गांधी
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचं जे नुकसान झालं आहे ते कधीही न भरून येणारं आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी आपल्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी दुःखी आहे. माझ्या जवळ त्यांचं सांत्वन करण्यासाठी शब्द नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कर्नल संतोष यांचं निधन
लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत आणि चीन या दोन देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल संतोष यांचंही निधन झालं.
कर्नल संतोष हे मूळचे तेलंगणातील सूर्यापेट येथील होते.
गेल्या दीड वर्षांपासून कर्नल संतोष हे भारत-चीन सीमेवर तैनात होते. ते 16-बिहार रेजिमेंटमधील अधिकारी होते.
तामिळनाडूतील जवान पलानी हे देखील या चकमकीत ठार झाले आहेत.
'चकमकीमुळे शांतता प्रक्रियाला विलंब होऊ शकतो'
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमुळे चीन आणि भारतात शांततेसाठी जी बोलणी सुरू आहे ती प्रक्रिया लांबणीवर जाऊ शकते असं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य लेफ्टनंट जनरल (नि.) एस. एल. नरसिंहन यांनी मांडलं आहे.
पण यामुळे शांततेची बोलणी पूर्णपणे थांबणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. पण यावर तोडगा कसा निघेल हे पाहावं लागणार आहे. चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट नाही असं नरसिंहन यांनी म्हटलं आहे.
चर्चेतून मुद्दा सोडवू - चीन
चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या विदेश मंत्र्यांनी म्हटलं आहे की सध्या भारत आणि चीनमध्ये जे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे त्यावर चर्चेतून तोडगा काढूत.
दोन्ही देश शांततापूर्ण मार्गाने चर्चा करण्यास तयार आहेत असं देखील चीनच्या विदेश मंत्र्यांनी म्हटलं आहे.
चीनच्या सैन्याचं किती नुकसान झालं याची माहिती नाही
या चकमकीत चीनचे किती सैनिक ठार झाले याबाबत अद्याप माहिती नाही. चीन सरकारकडून अधिकृत माहिती देणाऱ्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की आम्ही ही माहिती कुठेही दिली नाही की चीनचं किती नुकसान झालं आहे.
ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शिजीन यांनी म्हटलं आहे की गलवानमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे तीन सैनिक ठार झाले आहेत. चीनच्या सैन्याचं किती नुकसान झालं आहे याबाबत आम्ही माहिती देऊ शकत नाहीत. चिनी सैन्याचं नुकसान झाल्याची कबुली शिजीन यांनी दिली आहे पण नेमका किती नुकसान झालं हे त्यांनी सांगितलं नाही.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध मुख्यमंत्र्यांशी आज तीन वाजता चर्चा करणार आहेत. या बैठकीत राजनाथ सिंह देखील उपस्थित राहतील.
दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी यासंबंधी घटनास्थळी बैठक घेत असल्याची माहितीही लष्कराने दिलीये. चीनच्या सैन्याचीही या चकमकीच हानी झाल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. मात्र चीनने अजून आपले किती सैनिक मारले गेले किंवा किती जखमी झाले याची अधिकृत आकडेवारी दिली नाहीये.
भारतीय सैनिकांकडून सीमा ओलांडून चीनी सैनिकांवर हल्ला केला, अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलं आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे, की भारतानं एकतर्फी कारवाई करू नये, यामुळे समस्या अजून वाढतील.
या घटनेनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, तिन्ही सेना दलांचे प्रमुख आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत बैठक बोलावली आहे.
गेल्या काही दिवसात याच भागात चीनी सैनिकांनी भारतीय सीमेत प्रवेश केल्यानंतर दोन देशांमधील तणाव वाढला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)