एकाचवेळी 25 शाळांमध्ये शिकवून घेतला 1 कोटी रुपये पगार

    • Author, समिरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

आताच्या काळात एक नोकरी मिळणं आणि टिकवणं कठीण वाटत असलं तरी उत्तर प्रदेशात मात्र एका शिक्षिकेने 25 ठिकाणी काम करत पगारापोटी एक कोटी रुपये मिळवण्याचं कसब साधलंय. या घटनेमुळे केवळ शिक्षण विभागच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेश सरकार चक्रावून गेलंय.

उत्तर प्रदेशात प्राथमिक शिक्षण विभागात गैरव्यवहार करत 25 शाळांमध्ये एकाचवेळी शिकवून 1 कोटी रुपये पगार घेण्याचा आरोप असलेल्या शिक्षिका अनामिका शुक्ला यांना शनिवारी कासगंजमध्ये अटक करण्यात आली. अनामिक शुक्ला यांना प्राथमिक शिक्षण विभागाने नोटीस पाठवली होती. पण नोटीसला उत्तर देण्याऐवजी राजीनामा देण्यासाठी त्या आल्या असताना अत्यंत नाट्यमय पद्धतीने अनामिका यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासगंजच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शिक्षिका अनामिका शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करून आता चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पण गैरव्यवहार करून पैसे हडप करणाऱ्या अनामिक शुक्ला याच आहेत की त्यांच्या नावाचा उपयोग करुन इतर कुणी हा गंडा घातला आहे, याबाबत अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

कासगंजच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी अंजली अग्रवाल यांनी बीबीबीला याबाबत माहिती दिली. त्या सांगतात, "या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अनामिका शुक्ला नावाच्या या शिक्षिकेला नोटीस पाठवण्यात आली होती. शनिवारी त्यांनी एका व्यक्तीच्या मार्फत त्यांनी आपला राजीनामा पाठवला. त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर अनामिका स्वतः कार्यालयाबाहेर आल्याची माहिती मिळाली. पोलिसांना तातडीने याबाबत कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अटकेनंतर शिक्षिकेने तिथं उपस्थित पत्रकारांना आपलं नाव पहिल्यांदा अनामिका सिंह असल्याचं सांगितलं. पण नंतर त्यांनी पोलिसांना वेगळंच नाव सांगितलं. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.

एकाचवेळी बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून वर्षाला 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त पगार घेण्याचा आरोप अनामिका शुक्ला यांच्यावर आहे.

अटक करण्यात आलेल्या अनामिका शुक्ला कासगंज जिल्ह्यातील फरीदपूरमध्ये कस्तुरबा विद्यालयात शिक्षिका पदावर गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहेत.

शुक्रवारी प्राथमिक शिक्षण अधिकारी अंजली अग्रवाल यांनी त्यांचं वेतन रोखून नोटीस दिली होती. कस्तुरबा विद्यालयात शिक्षकांची नियुक्ती मर्यादित करारापुरती होते. दर महिन्याला त्यांना तीस हजार रुपये पगार मिळतो.

प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांचा डेटाबेस तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा हे प्रकरण समोर आलं. डेटाबेस बनवत असताना शिक्षण विभागाला अनामिका शुक्ला यांचं नाव 25 शाळांच्या यादीत आढळून आलं.

ही माहिती मिळताच शिक्षण विभाग हादरून गेलं. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. सध्या उपलब्ध कागदपत्रांनुसार, अनामिका शुक्ला यांचं नाव अमेठी, आंबेडकर नगर, रायबरेली, प्रयागराज, अलीगढसह 25 शाळांच्या शिक्षकांच्या यादीत होतं. इथं त्या एकाच वेळी नोकरी करत असल्याची माहिती मिळाली.

अनामिका शुक्ला यांना मागच्या 13 महिन्यांत 25 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमधून तब्बल 1 कोटी रुपयांचं वेतन देण्यात आलं आहे.

पण हे सगळे पैसे एकाच बँक खात्यात पाठवण्यात आले की वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवले याबाबत जास्त माहिती मिळू शकली नाही. पोलीस या सर्व बाबींचा तपास करत आहेत.

प्राथमिक शिक्षण अधिकारी अग्रवाल सांगतात, "अनामिका शुक्ला याच विद्यालयामार्फत पगार घेत होत्या. पण इतर ठिकाणी याच नावे काम करत असलेल्या शिक्षिकांचा पगार यांच्या खात्यात आला किंवा नाही, याबाबत माहिती मिळवत आहोत. तसंच ज्यांच्या नावे 25 ठिकाणी काम करून पगार घेतला जात होता त्या शिक्षिका याच आहेत की आणखी इतर कुणी आहे, याबाबतही तपास सुरू आहे."

"आम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन दरम्यान जी कागदपत्रं मिळाली, त्याच्या आधार कार्डमध्ये हेच नाव आहे. यामध्ये वडिलांचं नावसुद्धा तेच आहे. पण कागदपत्रांमधला फोटो अस्पष्ट आहे," असं अग्रवाल सांगतात.

अटकेनंतर अनामिका शुक्ला पत्रकारांशी बोलल्या. त्यांना नोकरी मिळण्यासाठी एका व्यक्तीने मदत केली होती. त्या व्यक्तीला अनामिका यांनी एक लाख रुपये दिले होते, असं त्यांनी सांगितलं.

कासगंजचे स्थानिक पत्रकार अशोक शर्मा सांगतात, "ज्या अनामिका शुक्लाचं नाव या सगळ्या गैरव्यवहारामध्ये समोर येत आहे, ती महिला ही नसल्याची माहिती संभ्रमात टाकणारी आहे. जर असं असतं तर त्यांनी नोटीसला उत्तर देण्याऐवजी राजीनामा देण्याची काय गरज होती?"

दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाच्याच काही लोकांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कोणताही शिक्षक एकट्याच्या जीवावर इतका मोठा भ्रष्टाचार करण्याची शक्यता कमी आहे.

प्राथमिक शिक्षण मंत्री सतीश द्विवेदी यांनी या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. आता अनामिका शुक्ला यांच्या अटकेनंतर त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी उघड होतील, असा अंदाज आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)