'भीमा कोरेगाव प्रकरणात तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करा' : अॅमनेस्टी इंटरनॅशनल

भीमा कोरेगाव

फोटो स्रोत, Getty Images

भीमा कोरेगाव प्रकरणात अटक केलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ आणि सुटकेसाठी अॅमनेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनं पुढाकार घेतलाय.

भारत सरकारनं भीमा कोरेगाव प्रकरणात अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या अन्याय्य आणि क्रूर अटकेला संपवावं आणि त्यांना सोडावं, अशी मागणी अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं केलीय.

"भीमा-कोरेगाव प्रकरणी अटक केलेल्यांना तुरुंगात दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत 11 मानवाधिकार कार्यकर्त्यांना सोडण्याबाबत भारत सरकारनं विचार करावा. तसंच, हे कार्यकर्ते सरकारचे टीकाकार आहेत म्हणून त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करू नये," असं अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं भारत सरकारला उद्देशून म्हटलंय.

6 जून 2018 रोजी सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, सुधीर ढवळे, शोमा सेन आणि महेश राऊत यांना पुणे पोलिसांनी 2018 मध्ये भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसेत कथित सहभागाप्रकरणी अटक केलं होतं. त्यानंतर सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा, वर्नोन गोंसाल्वेस, आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली.

देशातील कोरोनाची स्थिती पाहिल्यास या 11 जणांना गर्दी असलेल्या तुरुंगात ठेवणं म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखं असल्याचं मत अॅमनेस्टी इंटरनॅशनलचे भारतातील कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी मांडलं.

ते म्हणतात, "गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यकर्ते वेगवेगळ्या संकटांना सामोरं गेलेत. ते पाहता कायद्याची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची शिक्षाच आहे. एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात स्थलांतर करणं, पुणे पोलिसांकडून तपास काढून घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवणं आणि सराकर किंवा माध्यमांकडून या कार्यकर्त्यांना देशद्रोही असल्याचा आरोप करणं, या साऱ्या गोष्टीतून कार्यकर्त्यांना बदनाम केलं जातंय."

गेल्या दोन वर्षांपासून यातील सर्वांचेच जामीन वारंवार फेटाळले जात आहेत. सध्या 11 पैकी 9 जण नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहेत, तर सुधा भारद्वाज आणि शोमा सेन या मुंबईतील भायखळा जेलमध्ये आहेत.

भीमा कोरेगाव

महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कोरोनाची लागण होऊन किमान तीन कैद्यांचा मृत्यू झालाय, तर 250 कैद्यांना कोरोनाची लागण झालीय. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कोरोनाची लागण अत्यंत जास्त झालीय.

त्यामुळे अॅमनेस्टी इंटरनॅशनल संघटनेनं या 11 मानवाधिकार कार्यकर्त्यांबद्दल चिंता व्यक्त केलीय. यातले काही कार्यकर्ते आधीच कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त आहेत. पाच जण तर वयोवृद्ध आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची भीती आहे. अशावेळी यांना तुरुंगात ठेवणं योग्य नसल्याचं मत अॅमनेस्टी इंटरनॅशनलचं आहे.

एल्गार परिषद काय आहे?

1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव इथं 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखालील सैन्यात झालेल्या लढाईला 200 वर्षं पूर्ण झाली. कंपनी आर्मीमध्ये असलेल्या महार रेजिमेंटच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याचा पराभव झाला.

भीमा कोरेगाव

ब्रिटिशांनी उभारलेल्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला इथं मोठा कार्यक्रम होतो ज्याला देशभरातून लाखो दलित अनुयायी जमतात.

या विजय दिवसाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 31 डिसेंबर 2017 ला, विविध संघटनांनी पुण्यातल्या शनिवारवाड्यावर 'भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियाना' अंतर्गत 'एल्गार परिषदे'चं आयोजन केलं होतं.

कोरोना
लाईन

'लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा' या ब्रीद वाक्याखाली झालेल्या या परिषदेचं उद्घाटन रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते झालं. त्यांच्यासोबतच 'भारिप बहुजन महासंघा'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, गुजरात विधानसभेतले आमदार जिग्नेश मेवाणी, 'जेएनयू'मधील विद्यार्थी नेता उमर खालिद, आदिवासी कार्यकर्त्या सोनी सोरी हेही या परिषदेत सहभागी झाले होते. भाषणांसोबत 'कबीर कला मंच' आणि इतर संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळेस झाले होते.

भीमा-कोरेगाव हिंसाचार

एल्गार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा होत असतांनाच सणसवाडी आणि परिसरात हिंसाचाराला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ झाली. अनेक जण जखमी झाले आणि एका तरूणाचा मृत्यूही झाला. या हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटले.

सुधीर ढवळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुधीर ढवळे

भीमा कोरेगावातील हिंसाचाराच्या घटनेबाबत हिंदुत्ववादी नेते 'समस्त हिंदू आघाडी'चे मिलिंद एकबोटे आणि 'शिवप्रतिष्ठान'चे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

तर इकडे 'एल्गार परिषदे'बाबत पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल झाले.

एक गुन्हा जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर प्रक्षोभक भाषण देण्याच्या आरोपावरून झाला, तर दुसरा गुन्हा तुषार दामगुडे यांच्या तक्रारीवरून 'एल्गार परिषदे'शी संबंधित इतर व्यक्तींवर दाखल झाला.

आतापर्यंत कुणावर कारवाई

6 जून 2018 ला पुणे पोलिसांनी दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख शोमा सेन, कार्यकर्ते महेश राऊत व केरळच्या रोना विल्सन यांना अटक केली.

28 ऑगस्ट 2018 ला महाराष्ट्र पोलिसांनी तेलुगू कवी वरवरा राव यांना हैदराबादमधून, व्हनरेन गोन्सालविस व अरूण फरेरा यांना मुंबईतून, सुधा भारद्वाज यांना फरिदाबाद इथून तर नागरी कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना दिल्लीतून अटक करण्यात आली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)