कोरोना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर, पेरणी तोंडावर असतानाही पीक मिळेना कर्ज

अनिल बंगाळे
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. राज्यभरातल्या शेतकऱ्यांची पेरणीपूर्व कामं होत आली आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणं, खतांच्या खरेदीला सुरुवात केली आहे.

पाऊस पडल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे, तर दुसरीकडे बँकांनीही पीक कर्ज वाटपास सुरुवात केली नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

त्यामुळे शेतकरी बँकांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत. यापैकी एक आहेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावचे नामदेव पतंगे.

ते सांगतात, "मी आज सकाळी हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगावच्या SBIच्या शाखेत पीक कर्जाविषयीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. इथल्या बँकेनं अजून पीक कर्ज वाटप सुरू केलं नाही. बँकेतले कर्मचारी म्हणतात, बँकेचं ऑफिस नवीन जागेत गेलं की पीक कर्ज वाटप सुरू होईल. आता ही बँक नवीन जागेत कधी जाईल, बँक कधी कर्ज वाटपाचे फॉर्म घेईल आणि मग कधी कर्ज मिळेल?"

कोरोना
लाईन

दोन-तीन दिवसांपासून आमच्याकडे पाऊस सुरू आहे. पण, अजून बँका कर्जवाटप करणार नसेल तर त्याचा काय फायदा?, असा सवाल ते विचारतात.

पतंगे यांच्याशी बोलून झाल्यानंतर आम्ही SBIच्या गोरेगाव शाखेशी संपर्क साधला.

तिथल्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "पीक कर्जाचं वाटप दोन-तीन दिवसांपासून सुरू झालं आहे. पूर्वी इथल्या पीक कर्जाच्या फाईल्स परभणीला जात असे. पण, आता परभणीचं कार्यालय बंद पडल्यामुळे त्या हिंगोलीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे फाईल इथून तिथं पाठवण्यात विलंब होत आहे."

शेतकऱ्यांना पीक कर्ज कधीपर्यंत मिळेल, याविषयी मात्र ते स्पष्ट काही सांगू शकले नाही.

मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही स्थिती आहे, तर विदर्भातल्या शेतकऱ्यांसमोर नवीनच प्रश्न आहे.

अनिल बंगाळे हे बुलडाणा जिल्ह्यातल्या सिनगाव जहांगीरचे शेतकरी आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही काही दिवसांपूर्वी शेतजमीन घेतली, त्यामुळे आमचं नवीन खातं आहे. आता पेरणीसाठी पैसे लागेल म्हणून पीक कर्जाची फाईल देण्यासाठी बँकेत गेलो, तर तिथले कर्मचारी म्हणाले की, सध्या नवीन खातेदारांना पीक कर्ज वाटप सुरू झालेलं नाही. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे, सध्या त्यांना प्राधान्यानं पीक कर्ज दिलं जात आहे."

"आमच्याकडे गेले दोन दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे मग अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. पण, बँक जर पेरणी उलटून गेल्यानंतर पीक कर्ज देणार असेल, तर त्याचा काय उपयोग?," असा सवालही ते उपस्थित करतात.

बुलडाणा जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाची स्थिती
फोटो कॅप्शन, बुलडाणा जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाची स्थिती

बुलडाणा जिल्ह्यातील कर्जवाटपाविषयी आम्ही बुलडाण्याचे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना विचारलं.

ते म्हणाले, "बुलडाणा जिल्ह्याला खरीप हंगामात 2400 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 21 टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप झालं आहे."

"पीक कर्ज वाटप करताना कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होता कामा नये," अशा सूचना बँकांना दिल्या आहेत, असंही चव्हाण म्हणाले.

बँकांवर कारवाई करू - कृषी राज्यमंत्री

शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर बीबीसी मराठीनं कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी संपर्क साधला.

ते म्हणाले, "पीक कर्जाची मागणी घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला बँकांनी गांभीर्यानं घ्यावे, असे आदेश सरकारनं दिले आहेत. यात काही बँकांच्या अडचणी आहेत. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. बँकांनी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली आहे. तरीही काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल."

काही जिल्ह्यांमध्ये निर्धारित उद्दिष्टापैकी फक्त 10 टक्के कर्जवाटप झाल्याच्या बातम्या येत आहेत, यावर ते म्हणाले, "काही जिल्ह्यांमध्ये 20 ते 25 टक्के कर्जवाटप झालं आहे. त्यात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत."

बुलडाणा जिल्ह्यातल्या येळगाव येथे बँकेतील शेतकऱ्यांची गर्दी

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, बुलडाणा जिल्ह्यातल्या येळगाव येथे बँकेतील शेतकऱ्यांची गर्दी

पुरेसं पीक कर्ज वाटप न झाल्याची चिंता कृषी मंत्री दादा भुसे यांनी 4 दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

ते म्हणाले होते, "नुकताच साधारण 25 जिल्ह्यांचा दौरा केला. शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात पीक कर्ज वितरण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. शेतकऱ्यांना थोडीशी रक्कम मिळाली, तरी ते कर्जासाठी सावकार किंवा इतर खासगी यंत्रणेकडे जाणार नाहीत. त्यामुळे बँकांनी अग्रक्रमाने पीक कर्ज वितरण करावं."

दादा भुसे यांचं ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, दादा भुसे यांचं ट्वीट

पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करा, असे आदेशही भुसे यांनी दिले आहेत.

बीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं, "15 जूनपर्यंत जास्तीत जास्त पीक कर्जाचं वाटप करा, असे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत."

'सगळ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या'

पेरणीपासून ते धान्य मार्केटला नेईपर्यंत शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्याच्या दृष्टीनं पीककर्ज दिलं जातं. पीक कर्जासाठी स्वत:च्या मालकीची जमीन असणारे किंवा इतरांची शेतजमीन भाडेतत्वातर कसणारे शेतकरी अर्ज करू शकतात.

यासंबंधी सरकारनं 22 मे रोजी एक निर्णय जाहीर केला आहे.

त्यानुसार, 'महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019'साठी पात्र असलेल्या पण आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी थकबाकीदार न समजता खरीप हंगामासाठी कर्जवाटप करावे, असा आदेश सरकारनं दिला आहे.

त्यासाठी अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम "शासनाकडून येणे आहे" असं नमूद करावं आणि पीक कर्ज द्यावं, असं सरकारनं म्हटलं आहे.

"ज्या शेतकऱ्यांना अजून कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्यांनाही कर्जवाटप करा, असा सरकारचा आदेश आहे. पण, बँकेतले कर्मचारी म्हणतात की, अजून आम्हाला तसा आदेश दिला नाही," पतंगे सांगतात.

कर्ज वितरण कसं होतं?

एप्रिल महिन्यात पीक कर्ज वाटपाला सुरुवात होते. शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षीच्या 31 मार्चपर्यंत त्याची परतफेड करणं गरजेचं असतं. पण, सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची परतफेड करण्याची तारीख भारत सरकारनं 30 ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचं ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचं ट्वीट

आता एखाद्या शेतकऱ्याला किती पीक कर्ज द्यायचं त्याची मर्यादा कशी ठरवली जाते, ते पाहूया.

यासाठी एक व्यवस्था काम करत असते. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातली मुख्य बँक दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कामाला लागते.

यामध्ये एखाद्या जिल्ह्यात कोणकोणती पीक घेतली जातात आणि त्या पिकांच्या प्रतिएकरी किंवा प्रतिहेक्टरी उत्पादनासाठी शेतकऱ्याला मशागतीपासून ते विक्रीपर्यंत किती खर्च येतो ते पाहिलं जातं. त्यानुसार मग कोणत्या पिकासाठी किती पीक कर्ज द्यायचं हे निश्चित केलं जातं.

उदाहरणार्थ बुलडाणा जिल्ह्यातील बँका या खरीप हंगामाकरता कापसासाठी 21,600 रुपये प्रतिएकर, तर सोयाबीनसाठी एकरी 19, 200 पीक कर्ज देत आहेत.

व्याजदर किती?

राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि खासगी बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करत असतात.

किती रुपयांचं कर्ज वाटप करायचं याचं प्रत्येक बँकेला टार्गेट दिलं जातं. ते बँकांनी पूर्ण करणं अपेक्षित असतं.

कृषीकर्ज 9 टक्के व्याजदरानं दिलं जातं. ते अल्पमुदतीचं असेल तर 2 टक्के सवलत आणि शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते.

त्यामुळे शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)