कोरोना व्हायरस: भविष्यातला आपला प्रवास कसा असेल?

फोटो स्रोत, NIKITA DESHPANDE
गेली चाळीस वर्षे शमसुद्दिन टूर गाईडचं काम करत आहेत. या काळात त्यांनी जवळपास 40 सन्माननीय पाहुण्यांना आग्र्याचा ताजमहाल दाखवला आहे. त्यामध्ये प्रिन्सेस डायनाचाही समावेश आहे.
आता जागतिक आरोग्य संघटनेने पुढील काही काळ आपल्याला कोरोनाबरोबर राहावं लागेल असं जाहीर केलं आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचा चेहरामोहरा बदलून जाईल असं शमसुद्दीन सांगतात.
लॉकडाऊन शिथिल केलं जात असलं तरी पर्यटन व्यवसाय मूळपदावर यायला काही महिने किंवा वर्षं लागतील असं ते म्हणतात. लोक मोठ्या गटाने फिरायला जाण्याऐवजी एकटे-दुकटे फिरायला लागतील.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

"ताजमहालसमोर तुम्ही मास्क लावून फोटोसाठी उभे राहिला आहात," अशी कल्पना करुन पाहा.
जगभरातल्या सर्व ऐतिहासिक स्थळांजवळ हा नियम लागू असेल. तसेच सोशल डिस्टन्सिंगमुळे पर्यटकांच्या संख्येवरही मर्यादा येईल.
विमान प्रवास
हवाई वाहतूक तज्ज्ञ अश्विनी फडणीस म्हणतात, आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना घ्यायच्या काळजीबद्दल द इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजे आयटाने 'बायोसिक्युरिटी फॉर एअर ट्रान्स्पोर्टः अ रोडमॅप फॉर रिस्टार्टिंग एविएशन' नावाने नियमावली सुरू केली आहे.
भारत सरकारचे नागरी उड्डाण मंत्रालयही अशाच प्रकारची नियमावली तयार करत आहे.
परदेशात ज्याप्रमाणे विमानतळांवर प्रवाशांची तपासणी कंप्युटरच्या मदतीने होते त्याचप्रमाणे भारतातही आता प्रवासी आणि कर्मचारी यांचा संपर्क कमीत कमी येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वेब चेकइन आवश्यक होईल, प्रवाशांना बोर्डिंग पासची प्रत स्वतःकडे ठेवायला लागेल अणि स्वतः लगेज चेक-इन करावे लागेल. काही विमानप्रवासात पीपीई किट वापरणे अत्यावश्यक केल्यामुळे प्रवाशांना हवाईसुंदरींचे स्मितहास्य दिसणार नाही, असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, NIKITA DESHPANDE
पण सध्या काही विमानप्रवासांमध्ये मधल्या सीटवरही प्रवासी बसल्याचे दिसून येते. एमीरेट्स आणि एअर कतारसारख्या विमान कंपन्यांनी सुरुवातीला मधली सीट मोकळी ठेवण्यात येईल असे जाहीर केले होते. परंतु ही नियमावली सतत बदलत राहाते. येत्या काही आठवड्यात आणि महिन्यात नवी नियमावली जाहीर होईल, असे फडणीस म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासापेक्षा देशांतर्गत प्रवासासमोर जास्त अडथळे असण्याची शक्यता आहे कारण प्रत्येक राज्याचे नियमही वेगवेगळे आहेत. उदाः दिल्लीमधून कोरोनाचा प्रसार कमी असलेल्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नियम अधिक कडक असतील.
लॉकडाऊन संपल्यावरही पुढचे काही महिने 14 दिवस क्वारंटाइन करण्याचा नियम आवश्यक असेल. सर्व प्रवाशाना फेस कव्हरिंग वापरणे आवश्यक असेल. केबिन सर्विस अत्यंत साधी करण्यात येऊन कर्मचारी व प्रवाशांचा संबंध कमीत कमी यावा यासाठी प्री-पॅकेज्ड केटरिंगमध्येही सहजता आलेली असेल.
विमान उड्डाण करण्यापुर्वी अल्ट्रा व्हायोलेट तंत्रज्ञानाचा वापर करुन सॅनिटाइज करण्याचाही समावेश नव्या नियमावलीत होऊ शकतो असे फडणीस म्हणतात. तर नागरी उड्डाण मंत्रालयातील काही सूत्रांच्या मते प्रवासी आणि केबिन क्रूसाठी फेस शिल्ड वापरणे आवश्यक करण्यात येण्याचा विचार सुरू आहे.
रेल्वे
भारताची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेप्रवासाचं येत्या काळात नियोजन करणं हे देशासाठी सर्वात मोठं आव्हान असेल. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी रेल्वे डब्यात आणि फलाटावरील गर्दी कमी करावी लागेल.
थ्री टायर स्लीपर डब्यातील मधला कप्पा मोकळा ठेवावा लागेल. स्वच्छतागृहाचा वापर कोणी करत असेल तर प्रवाशांना आधीच कळेल अशी व्यवस्था असणारे डबे तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शौचालयाजवळ गर्दी होणार नाही.

फोटो स्रोत, NIKITA DESHPANDE
रेल्वेमध्ये अन्न पुरवण्यासाठी पॅन्ट्रीकार असेल की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती स्पष्ट नाही. जर असेल तर ते फक्त पॅकबंद जेवण आणि पाणी पुरवतील. एकेकाळी लांबच्या बस प्रवासासाठी प्रवासी जसे स्वतःच्या उशा, ब्लॅंकेट्स घेऊन प्रवास करायचे त्याप्रमाणे कदाचित आता करावे लागेल.
ते म्हणतात, "रेल्वे स्थानकं आता विमानतळासारखी झालेली असतील. प्रवशांसाठी नियमावलीही सारखीच असेल. रेल्वे सुटण्यापुर्वी 4 तास आधी पोहोचावे लागेल."
शौचालयांचा वापर केल्यानंतर रेल्वेतर्फे सॅनिटायझर्स पुरवले जातील. मात्र काही प्रमाणात प्रवाशांनाही सॅनिटायझर्स जवळ बाळगावे लागतील. लॉकडाऊनच्या काळात प्रवासी रेल्वे पूर्णपणे बंद होत्या. आता हळूहळू काही रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. रेल्वे व्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी नवी नियमावली तयार होण्याचीही शक्यता आहे.
महामार्ग
भारतामध्ये प्रवासासाठी महामार्गांचा वाटा मोठा आहे. रस्त्याच्याकडेला असणाऱ्या धाब्यांना विशेष महत्त्व असून महानगरातील लोकही तेथे जेवण्याला पसंती द्यायचे. परंतु भविष्यात ही स्थिती नसेल. रोड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सदस्य राजीव अरोरा म्हणतात, "आता यापुढे थेट गेलं आणि ढाब्यावर बाजेवर बसून जेवण केलं असं होणार नाही."

फोटो स्रोत, NIKITA DESHPANDE
मानवी संपर्क टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी अधिक निर्बंध येण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ तुम्ही दिलेली ऑर्डर वेटरच्या ऐवजी एखाद्या फळीवर ठेवून बाहेर येईल, महामार्गावरचं जीवन पूर्वीसारखं नसेल असं ते सांगतात.
धाबेवाल्यांना त्यांचे कर्मचारी, ट्रक ड्रायव्हर, इतर प्रवासी यांच्यासाठी वेगवेगळे विभाग तयार करावे लागतील. महामार्ग अनेक राज्यांमधून जात असल्यामुळे प्रत्येक राज्य आपापले नियम बनवू शकेल.
मेट्रो
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रवक्ते अनुज दयाळ बीबीसीशी बोलताना म्हणाले, मेट्रोमध्ये एक जागा मध्ये रिकामी ठेवून प्रवाशांना बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मोजक्या प्रवाशांना उभे राहाण्याची परवानगी असेल.
अर्थात त्यामुळे गर्दीच्या वेळेस लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा ताण आमच्या कर्मचाऱ्यांवर असेल. मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ विमानतळाप्रमाणे नियमावली करावी लागेल. रांगेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील तसेच सॅनिटायझिंग टनेलमध्ये जाण्याआधीही ठराविक अंतरावर वर्तुळं काढलेली असतील.

फोटो स्रोत, NIKITA DESHPANDE
यामुळे मेट्रोचे डबे वाढवावे लागतील तसेच फेऱ्याही वाढवाव्या लागतील. प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक डब्यात एक किंवा दोन सुरक्षारक्षक ठेवावे लागतील. लोकांनी गर्दी करू नये याची ते काळजी घेतील.
मेट्रो अधिकाऱ्यांच्यामते राजीव चौकसारख्या काही स्टेशनवर आधीपासूनच गर्दी आवरण्यासाठी गार्ड आहेत परंतु बदललेल्या स्थितीत ते अधिक आव्हानात्मक असेल. मेट्रो कॉर्पोरेशन यावर विचार करत आहे.
इन्शुरन्स
दुबईस्थित इन्शुरन्स बिझनेस ग्रुपचे सरचिटणीस आफताब हसन म्हणतात, कोव्हिडनंतरचं जग वेगळं असेल. साधारणपणे पैसे वाचवण्यासाठी तरूण लोक ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय निवडत नाहीत. पण आता परिस्थिती बदलली आहे.
आता मात्र ते करणं महत्त्वाचं असेल . तुम्ही कामासाठी प्रवास करा किंवा फिरण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्सला लोक महत्त्व देतील.

फोटो स्रोत, NIKITA DESHPANDE
साधारणतः साथीच्या रोगांचा त्यात विचार केलेला नसतो. किंवा त्यासाठी जास्त पैसे भरावे लागतात. पण येत्या काळात साथीच्या रोगांचाही त्यात समावेश अत्यावश्यक केलेला असेल .शमसुद्दीन म्हणतात, अशा प्रकारच्या भविष्याची कधीच अपेक्षा केली नव्हती. जर वेळेत लस उपलब्ध झाली नाही तर पर्यटनाचे स्वरुप बदलून जाईल. पण जर वेळेत लस तयार झाली तर सगळं पुर्वीसारखं होईल.
(स्टोरी- सलमान रावी, संपादन- निकिता मानधानी, अर्कचित्रे- निकिता देशपांडे)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









