You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र – जयंत पाटील
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थिर असल्याचा दावा केला. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेले दावे त्यांनी खोडून काढले आहेत.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका करताना जयंत पाटील यांनी "भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र," असा सवाल केला आहे. तसंच भाजप महाराष्ट्राचा हितचिंतक नाही, असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.
"मुख्यमंत्री सहायता निधीला भाजपनं आतापर्यंत एकही पैसा दिलेला नाहीये. पंतप्रधान निधीला पैसा द्या. पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री निधीला पैसा देऊ नका, अशी वृत्ती भारतीय जनता पक्षानं दाखवली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र? महाराष्ट्राचा हितचिंतक नक्कीच नाहीये, हे यातून दिसून आलं," असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुद्दे खोडून काढताना मांडलेले मुद्दे-
- आता आपल्या राज्यातून मजूर बाहेर गेले आहेत. त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. या लोकांकडे जे स्किल आहे, ते महाराष्ट्रातल्या लोकाकंडे आहे. मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास नाही. महाराष्ट्रातील तरुण इथले कारखाने सुरू करू शकतात. त्यासाठी आवश्यक ते स्किल्स इथल्या तरुणांकडे आहेत.
- महाराष्ट्र आणि मुंबईतले रुग्ण वाढत आहेत. मुंबईत उत्तम काम सुरू आहे, असं मी अतिशय नम्रपणे सांगतो. आपण टास्क फोर्स स्थापन केला आहे. ही टीम अगदी 24 बाय 7 काम करत आहे.
- महाराष्ट्रानं डेथ ऑडिट करण्याची सोय आहे. पुण्याल डेथ ऑडिटची टीम आहे, मुंबईमध्ये डेथ ऑडिटची टीम आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी एक टीम आहे.
- महाराष्ट्रात सतत 52 हजार केसेसचा उल्लेख केला जातोय. पण प्रत्यक्षात 35,178 केसेस अॅक्टिव्ह आहेत.
- राज्यात डबलिंग रेट कमी ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. दोन-दोन जणांच्या १६ हजार टीम्सनं महाराष्ट्रात 66 लाख जणांचा सर्व्हे केला आहे. आज जवळपास 5 लाख 67 हजार लोक होम क्वारंटाईन आहेत.
- एप्रिलमध्ये 7.6 टक्के असलेला मृत्यूदर आता 3.25 आहे. ही स्पर्धा नाही, पण गुजरातपेक्षा चांगली परिस्थिती आहे.
- भाजपनं महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. सरकार आणि जी यंत्रणा कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काम करत आहे, त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवण्याचा हा प्रयत्न होता.
- मुख्यमंत्री सहायता निधीला भाजपनं आतापर्यंत एकही पैसा दिलेला नाहीये. पंतप्रधान निधीला पैसा द्या. पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री निधीला पैसा देऊ नका, अशी वृत्ती भारतीय जनता पक्षानं दाखवली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र? महाराष्ट्राचा हितचिंतक नक्कीच नाहीये, हे यातून दिसून आलं आहे.
गुजरातला 1500 ट्रेन्स, पण महाराष्ट्राच्या वाट्याला 700 ट्रेन्स- अनिल परब
शिवसेना नेते अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीवर सरकारची बाजू मांडली.
अनिल परब यांनी मांडलेले मुद्दे-
- केंद्र सरकार महाराष्ट्राला भरघोस मदत देत असूनही महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे, असा सूर देवेंद्र फडणवीस यांचा होता.
- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यात गहू, तांदूळ, डाळ देत राज्य शासनाला मदत. 1750 कोटी रुपयांचे गहू दिल्याचा दावा फडणवीसांनी केला. पण महाराष्ट्राला एवढ्या किंमतीचा गहू मिळाला नाही.
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1626 कोटी दिल्याचा दावा. पण ही योजना आजची नाही. ही आधीपासून सुरू आहे. त्यामुळे या योजनेतून महाराष्ट्राला वेगळी मदत नाही.
- दिव्यांगांसाठी ११६ कोटी दिल्याचं सांगितलं, पण त्याच योजनेंतर्गत १२०० कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देतं हे सांगायला फडणवीस विसरले.
- महाराष्ट्र सरकारने ट्रेनचा ६८ कोटी खर्च दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून आम्ही पैसे घेतले नाहीत.
- ८० ट्रेन दिवसाला मागितल्या आणि ते ३० ते ३५ ट्रेन्स देतात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं त्याचा विरोधकांना इतका राग आला, की एका दिवसात त्यांनी 43 ट्रेन्स पाठवल्या. बंगालनं वादळामुळे ट्रेन्स पाठवू नका असं सांगूनही तिकडे ट्रेन्स पाठवल्या. लोक जाऊ नयेत आणि राज्य सरकार बदनाम व्हावं, असं नियोजन रेल्वे मंत्री करत आहेत.
- महाराष्ट्रापेक्षा लहान असलेल्या गुजरातला 1500 ट्रेन्स दिल्या, पण महाराष्ट्राला 700 ट्रेन्स दिल्या.
- महाराष्ट्र सरकारचे १८ हजार २७९ कोटी आम्हाला मिळायचे आहे. एप्रिल आणि मे चे २३६९ कोटी मिळायचे आहेत. ते मिळाले नाहीत. त्याची आम्ही सारखी मागणी करत आहोत.
- केंद्रानं कायद्यात बसत नसताना नोव्हेंबरपर्यंतचे सर्व पैसे राज्याला दिले आहेत. पण कायद्यात बसणारे १८ हजार २७९ कोटी द्या.
- केंद्रानं जीडीपीच्या पाच टक्के कर्ज घेण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार १ लाख ६० हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्राला घेता येईल. तीन टक्क्यांची तरतूद आधीपासूनच होती. उर्वरित रकमेसाठी अनेक अटी-शर्ती आहेत. त्यानुसार कर्ज घेतलं तर राज्य कर्जाच्या खाईत जाईल
- पीपीई कीट्स, N95 मास्कचा पुरवठा केंद्राने केला आहे. मार्च महिन्यात आमच्याकडे ज्या वस्तू आम्हाला आल्या त्याचे पैसे आम्ही दिले आहेत. एप्रिल महिन्यापासूनही या वस्तूंचे पैसे आम्हाला द्यायचे आहेत. त्यासंबंधीचं पत्र आहे. हे काही फुकट देत नाहीत.
- १६११ कोटी रुपये हे आपत्ती व्यवस्थापन फंडातून दिले आहेत, काही वेगळे पैसे दिले नाहीत. प्रत्येक राज्याला हा फंड दरवर्षी मिळतच असतो.
- जेवढ्या टेस्ट महाराष्ट्रात झाल्या, तेवढ्या कुठेच झाल्या नाहीत. मुंबईची लोकसंख्या इतकी दाट आहे. मुंबई महापालिकेनं त्या परिस्थितीतही हॉस्पिटल उभारणीचं काम सुरू केल आहे. पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही.
सहकार्याऐवजी विरोधक गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत - बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात यांनी मांडलेले मुद्दे खाली प्रमाणे -
- कोरोनाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नीट काम करत आहे.
- महाराष्ट्र उद्योगाचं केंद्र आहे, त्यामुळे इथं परराज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या जास्त. त्यांना सरकारनं सर्वतोपरी मदत केली आहे. त्यांच्या भोजनाची सोय आपण केली. दररोज ७ लाख जणांना जेवण देत आहोत.
- त्यानंतरही जे मजूर आपापल्या राज्यात परत जात होते, त्यांचीही काळजी आपण घेतली. त्यांच्या रेल्वे तिकिटांचा खर्च राज्य सरकारनं केला. जे पायी प्रवास करत होते, त्यांच्या प्रवासाची सोय केली.
- या सगळ्या काळात विरोधी पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा होती, मात्र ते गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत. पण आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही.
- देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं महाराष्ट्राला काय मदत केली, याची आकडेवारी सादर केली. पण त्याची वस्तुस्थिती महाराष्ट्राला कळावी यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)