कोरोना व्हायरस : 'पगार द्या, घरी जाऊद्या', शेकडो मजूर मध्यरात्री सुरतच्या रस्त्यावर #5मोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत.

1. कोरोना व्हायरस: सुरतमध्ये ऐन मध्यरात्री शेकडो मजूर रस्त्यावर

लॉकडाऊनमुळे देशात ठिकठिकाणी अडकलेले कामगार गावाकडे पायी चालत निघाले. मात्र, अनेकजण विविध राज्यांमध्ये अजूनही अडकून आहेत. गुजरातमधील सुरतमध्ये अशाच मजुरांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं. द हिंदू वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. जमावाने काही वाहनं पेटवून देत नासधूसही केली.

आम्हाला आमचे पगार द्या आणि आमच्या घरी जाऊ द्या, अशी मागणी करत शेकडो स्थलांतरित मजूर सुरतमध्ये मध्यरात्री रस्त्यावर उतरले.

यातले बहुतांश मजूर सुरतमधील वस्त्रोद्योगात काम करणारे आहेत. अनेकजण ओरिसामधील आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आणि वस्त्रोद्योगही ठप्प झालं. त्यामुळं या मजुरांसमोर आता रोजच्या जगण्याचाच प्रश्न आहे.

सुरत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मजुरांपैकी 70 जणांना लॉकडाऊनचे नियम मोडल्याच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतलं आहे.

2. हरियाणात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगारात दुप्पट वाढ

कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा करत नाहीत. हेच लक्षात घेऊन हरियाणा सरकारनं कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं ही बातमी दिलीय.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवणाऱ्या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतंय.

याचसोबत, कोरोनाच्या संकटात रस्त्यावर उतरून सुरक्षा आणि लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष देणाऱ्या पोलिसांसाठीही विम्याचं सुरक्षा कवच दिलं आहे.

या आरोग्य संकटसमयी कुणाही पोलिसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबायांना 30 लाख रुपयांचा मदतनिधी दिला जाईल, असंही हरियाणा सरकारनं जाहीर केलंय.

3. उद्धव ठाकरेंच्या 170 सुरक्षारक्षकांचे अहवाल निगेटिव्ह

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याजवळील चहावाल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्यानं हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलाय.

या चहावाल्याकडे मातोश्री बंगल्यातील सुरक्षारक्षकही चहा पित असल्यानं त्यांचीही चाचणी घेण्यात आली होती. मात्र, या सर्व सुरक्षारक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 'लोकमत'नं ही बातमी दिलीय.

मातोश्री बंगल्याजवळील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तातडीनं सर्व सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. कारण यातील बहुतांश सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या चहावाल्याकडे चहा पित असत.

दुसरीकडे, मुंबई पोलिसांमधील तीन पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळं सर्व पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पोलिसांच्या 15 वसाहतींवर विशेष लक्ष ठेवण्यात आलंय. दोन वसाहती पूर्णपणे सीलही करण्यात आल्या आहेत.

4. मुंबईत लॉकडाऊन काटेकोरपणे राबवण्यासाठी SRPF मैदानात

मुंबई शहर भारतात कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनलाय. तरीही लॉकडाऊनचे नियम बाजूला करुन अनेकजण रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळं मुंबईतल्या रस्त्यांवर आता राज्य राखीव दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'नं ही बातमी दिली आहे.

मुंबईतील दाटीवाटीच्या काही लोकवस्तीत लॉकडाऊन अधिक कठोरपणे राबवण्यासाठी SRPF तैनात केले जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिक संख्या एकट्या मुंबईतील आहे. दिवसागणिक मुंबईतील संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसतेय. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

5. वाधवान बंधूंना ताब्यात देण्याची CBI ची मागणी

लॉकडाऊनचा भंग करत खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करणाऱ्या वाधवान कुटुंबाच्या अडचणी आता आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. लॉकडाऊनच्या आदेशाचं पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन कारवाई सुरु झालीय. तर दुसरीकडे, CBI नं वाधवान बंधूंना ताब्यात देण्याची विनंती सातारा पोलिसांना केलीय. 'लोकसत्ता'नं ही बातमी दिलीय.

वाधवान कुटुंबीय सध्या साताऱ्यातच विलगीकरण कक्षात आहेत.

YES बँक प्रकरणात चौकशीसाठी हवे असलेले दिवाण हौसिंग फायनान्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना विलगीकरणानंतर आपल्या ताब्यात द्यावे, असे पत्र केंद्रीय गुप्तचर विभागानं सातारा जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवलं आहे.

YES बँक प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून वाधवान बंधू फरार असल्याचं सीबीआयनं म्हटलंय. 9 मार्च रोजी सीबीआयनं त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली, त्यावेळी ते घरात आढळून आले नव्हते. चौकशीसाठी हजेरीच्या नोटिसही बजावण्या आल्या होत्या. मात्र त्यांनी त्याही जुमानल्या नव्हत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)