कोरोना व्हायरस : या व्हायरल व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे तबलीगीचे लोक पोलिसांवर खरंच थुंकले का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कीर्ती दुबे,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तबलीगी जमातच्या दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 56 जणांपैकी 15 जण या कार्यक्रमाशी संबंधित होते. जवळपास 2000 कोरोनाग्रस्तांपैकी 400 जण तबलीगीच्या कार्यक्रमात सहभागी होते.
हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत.
पोलिसांना कोरोनाची लागण व्हावी म्हणून जमातच्या कार्यक्रमातील काही जण पोलिसांवर थुंकले, एका व्हीडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे.
गुरुवारी संध्याकाळी एका ट्वीटर यूझरनं 27 सेकंदांचा हा व्हीडिओ शेयर करताना लिहिलं, ज्यांना पुरावे हवे आहेत, त्यांनी हा व्हीडिओ बघावा.
हा व्हीडिओ ट्वीटरवर 81 हजार जणांनी पाहिला आहे आणि जवळपास 4 हजार जणांनी त्याला रिट्वीट केलं आहे.


फेसबुकवरही अनेक जण हा व्हीडिओ शेयर करत आहेत. मेधराज चौधरी नावाच्या युजरनं हा व्हीडिओ शेयर केला आहे आणि तो 2 लाख जणांनी पाहिला आहे.
या व्हीडिओत एका व्यक्तीच्या आजूबाजूला पोलीस बसलेले आहेत. काही वेळानं तो व्यक्ती पोलिसांच्या अंगावर थुंकतो, त्यानंतर पोलीस त्याला मारायला सुरुवात करतात.
त्याच्यामागे मोठ्या प्रमाणात आवाज ऐकायला येतो आणि मग व्हीडिओ समाप्त होतो. या व्हीडिओ तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी जोडलं जात आहे.
ही घटना कधी घडली आणि व्हीडिओबाबत करण्यात आलेला दावा खरा आहे का, हे समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.


तबलीगी जमातच्या लोकांना दवाखान्यात दिल्लीतल्या सरकारी बसमधून नेण्यात आलं होतं. पण, व्हीडिओत दिसणारी गाडी पोलिसांच्या व्हॅनसारखी दिसून येते, त्यामुळेच या व्हीडिओबाबत साशंकता निर्माण होते.
या व्हीडिओतील व्यक्तीला पोलिसांनी घेराव घातला आहे. या व्यक्तीला आरोग्य तपासणी नेत असल्यास गाडीत आरोग्य कर्मचारी का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या व्हीडिओच्या की-फ्रेमचा वापर करून आम्ही रिव्हर्स सर्च केलं, तर आम्हाला टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरील एक व्हीडिओ मिळाला.
2 मार्च 2020ला प्रसिद्ध झालेल्या या व्हीडिओनुसार, एका कैद्यानं त्याच्यासोबत गाडीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि पोलिसाच्या अंगावर थुंकलादेखील. या कैद्याचे घरचे त्याच्यासाठी घेऊन आलेलं जेवण खाण्याची परवानगी न दिल्यामुळे तो पोलिसांवर नाराज होता.
आम्ही या व्हीडिओविषयी अधिक सर्च केलं, तेव्हा महाराष्ट्र टाइम्स आणि मुंबई मिरर या वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवरही तो दिसून आला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुंबई मिररनं हा व्हीडिओ 29 फेब्रुवारी 2020ला शेयर केला होता.
या रिपोर्टनुसार, या कैद्याचं नाव मोहम्मद सुहैल शौकत अली असून त्याचं वय 26 वर्ष आहे. मुंबई कोर्टात त्याला सुनावणीसाठी आणलं होतं. जिथं कुटुंबीयांनी त्याच्यासाठी घरून जेवण आणलं होतं, पण पोलिसांनी ते खाऊ देण्यास नकार दिला.
यामुळे नाराज झालेल्या शौकत अलीनं पोलिसांशी बाचाबाची केली आणि त्यांच्या अंगावर थुंकला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली.
खरं तर हा व्हीडिओ 1 मिनिटं 25 सेकंदांचा आहे, ज्यात शौकत अली पोलिसांशी भांडताना आणि शिव्या देताना दिसून येतो.
पण, गुरुवारपासून या व्हीडिओतील 27 सेकंदांचा भाग तेवढा व्हायरल होत आहे आणि त्याला निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी जोडलं जात आहे.
बीबीसीच्या पडताळणीत समोर आलं की, हा दिल्लीतल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित व्हीडिओ नसून मुंबईतील जुना व्हीडिओ आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








