तबलीगी जमात : दिल्लीचा निझामुद्दीन भाग कसा बनला कोरोना व्हायरसचा 'हॉटस्पॉट'?

फोटो स्रोत, ADIL ABASS/BARCROFT MEDIA VIA GETTY IMAGES
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या देशातील रुग्णांची संख्या वाढत असताना अचानक दिल्लीतील निजामुद्दीन हा भाग चर्चेत आला आहे.
निजामुद्दीन इथं मुस्लिम संस्था तबलीगी जमातचं मुख्यालय आहे. याच ठिकाणी मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते.
एवढंच नव्हे तर सध्या देशात लॉकडाऊन असतानाही इथे मोठ्या संख्येनं लोक एकत्र राहात असल्यामुळे अनेकांमध्ये आजारपणाची लक्षणं दिसून आली.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आतापर्यंतच्या तपासणीमधून निष्पन्न झाल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यामुळे हे देशातील कोरोनाचं एक मोठं हॉटस्पॉट असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. देशभरात सरकारने असे 10 हॉटस्पॉट असल्याचं जाहीर केलं आहे, ज्यापैकी महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे आहेत.
पूर्ण भाग सील
पण सध्या देशाचं लक्ष्य दिल्लीतील या तबलीगी जमातवर आहे.
दिल्ली पोलिसांनी निझामुद्दीनमधला हा पूर्ण भाग सील केला आहे, ज्यामध्ये तबलीगी जमातच्या मुख्य केंद्राचाही समावेश आहे. या केंद्राला लागूनच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आणि शेजारीच ख्वाजा निजामुद्दीन अवलिया यांचा दर्गाही आहे.
कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय लोक मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झाले होते, असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं PTI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं जेव्हा आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल संबंधितांना नोटीस बजावली. इथं आलेल्या काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आल्यावर हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे."

फोटो स्रोत, ADIL ABASS/BARCROFT MEDIA VIA GETTY IMAGES
या ठिकाणी अनेक लोक एकत्र राहत आहेत आणि त्यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, अशी माहिती रविवारी (29 मार्च) रात्री उशिरा मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस आणि CRPFचे अधिकारी वैद्यकीय पथक घेऊन इथं पोहोचले.
इथं आलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तबलीगी जमातची बाजू
सध्याचा घटनाक्रम पाहता सोमवारी (30 मार्च) रात्री तबलीगी जमातनं एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं की या कार्यक्रमाच्या तारखा वर्षभरापूर्वीच निश्चित झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केल्यानंतर तबलीगी जमातनेही आपला कार्यक्रम तातडीने रद्द केला होता.
“देशभरात लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वीच काही राज्यांनी रेल्वे आणि बस सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, जे लोक परत जाऊ शकत होते, त्यांना परत पाठविण्याची पूर्ण व्यवस्था तबलीगी जमातनं केली होती. परंतु त्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेक लोक परत जाऊ शकले नाहीत आणि ते मरकजमध्येच अडकून पडले," असंही निवेदनात सांगण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES
जमातच्या निवेदनात अडकून पडलेल्या लोकांची संख्या 1 हजार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या गोष्टी पोलिसांना 24 मार्च रोजी सांगण्यात आल्या, जेव्हा पोलिसांनी केंद्र बंद करण्यासंबंधी नोटीस पाठवली होती.
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यात आलं असून कार्यक्रम थांबविण्या आल्याचं तसंच दीड हजार लोक परत गेल्याचंही कळविण्यात आलं, असं तबलीगी जमातचं म्हणणं आहे. मात्र 1 हजार लोक अडकल्याचंही पोलिसांना सांगण्यात आलं. त्यानंतर 26 मार्चला एसडीएमसोबत एक बैठक झाली आणि त्यानंतर 6 जणांना चाचणीसाठी नेण्यात आलं.
“त्यानंतर 33 लोकांना चाचणीसाठी नेण्यात आलं. तेव्हाही आम्ही स्थानिक प्रशासनाला विनंती केली होती, की लोकांना घरी परत पाठविण्यासाठी गाड्यांची सोय करण्यात यावी. 28 मार्चलाही लाजपत नगरच्या एसपींकडून कायदेशीर कारवाईसंबंधी नोटीस बजावण्यात आली होती, त्यालाही आम्ही 29 मार्चला उत्तर दिलं होतं.”
30 मार्चला हे सर्व प्रकरण माध्यमांमध्ये आलं.
दिल्ली सरकारने काय म्हटलंय?
तेलंगणामध्ये कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 6 लोक हे दिल्लीतील निजामुद्दीन इथं झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, असं तेलंगणा सरकारनं म्हटल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं.
ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार दिल्ली सरकारनं या प्रकरणाची दखल घेत एक बैठक बोलावली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं, की तबलीगी जमातच्या मुख्यालयात राहत असलेल्यांपैकी 24 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 700 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, तर 335 जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवलं गेलंय.
या कार्यक्रमाच्या आयोजकांवर FIR दाखल करण्याची शिफारसही दिल्ली सरकारनं केली आहे. ज्यावेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी दिल्लीत 5 जणांपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालणारं कलम लागू झालं होतं, असं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे.
निजामुद्दीन इथं असलेल्या 1500-1700 लोकांपैकी जवळपास 1 हजार लोकांना तिथून काढण्यात आलं होतं. आरोग्य विभागाचे कर्मचारी इथं काम करत होते.
'आयोजकांवर कारवाई होणार'
आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी (30 मार्च) केंद्र सरकारच्या कोरोना साथीबद्दलचा आपडेट देताना सांगितलं, की धार्मिक आयोजनात सहभागी झालेल्या लोकांची तपासणी, क्वारंटाईन करणं आणि अन्य चाचण्या प्रोटोकॉलप्रमाणेच होतील.
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
तबलीगी जमात आहे काय?
ही एक धार्मिक संस्था आहे. 1920 सालापासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. त्याला मरकज असंही म्हटलं जातं.
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले जफर सरेशवाला हे अनेक वर्षांपासून तबलीगी जमातशी संबंधित आहेत. त्यांच्या मते ही मुसलमानांची जगातील सर्वात मोठी संस्था आहे. याची केंद्रं 140 देशात आहेत.
भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची मरकज म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर ‘इज्तेमा’ सुरू असतो, म्हणजेच लोक इथं येत-जात राहतात.
कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडत असल्याच्या बातम्या येत असतानाही निजामुद्दीन इथल्या केंद्रात ‘इज्तेमा’ सुरू होता. या दरम्यान इतर राज्यांमधूनही लोक इथं येत होते. प्रत्येक ‘इज्तेमा’ 3-5 दिवस चालतो.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES
मार्च महिन्यातही यासाठी अनेक राज्यातून लोक आले होते. त्यामध्ये परदेशी नागरिकही होते. भारतासोबतच त्यावेळी पाकिस्तानातही ‘इज्तेमा’ सुरू होता.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरात अनेक ठिकाणी अशा आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र दिल्लीमध्ये असं झालं नाही.
परदेश कनेक्शन
या तबलीगी जमातच्या एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मलेशियातील क्वालालांपूरमधील एका मशिदीमध्ये करण्यात आलं होतं. 27 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्याही माध्यमांमधून आल्या.
अल् जझीराच्या एका बातमीनुसार मलेशियात कोरोना संसर्गाचे जेवढे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी दोन तृतीयांश रुग्ण हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब्रुनेईमध्ये याच मशिदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 40 पैकी 38 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES
सिंगापूर, मंगोलियासह अनेक देशात तबलीगीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे कोरोना पसरला. पाकिस्तानातही तबलीगीमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं ‘डॉन’ या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
परदेशातून आलेल्या 500 जणांचा सहभाग
वर्तमानपत्रातील बातमीनुसार कार्यक्रमात आलेल्या 35 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 27 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पाकिस्तानातही तबलीगीच्या कार्यक्रमात 1,200 लोक सहभागी झाले होते. त्यापैकी 500 जण परदेशातून आले होते.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES
मार्च महिन्यात दिल्ली सरकारने कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर 31 मार्चपर्यंत बंदी घातली होती. त्याचप्रमाणे आंदोलनामध्येही 50 हून अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही, असं म्हटलं होतं.
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधानांनी 25 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवून आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








