कोरोना व्हायरस पुणेः 'घरी गेल्यावर गावातली माणसं जवळसुद्धा येत नव्हती'

फोटो स्रोत, Reuters
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा महेश जाधव गावाकडे परतल्यानंतर त्याला वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं.
महेशनं यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.
"कोरोनाच्या बातम्यांमुळे माझ्या घरातल्या लोकांच्या मनात धडकी भरली होती. घरी ये म्हणून ते माझ्या मागेच लागले होते. त्यांचे फोनावर फोन सुरू होते. शिवाय इथं पुण्यात अनेक अफवा ऐकायला मिळत होत्या.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभ्यासिकेतील काही विद्यार्थी कोरोनाची चाचणी करण्यासाठी नेण्यात आले, अशा अनेक अफवा कानावर येत होत्या. त्यामुळे मग मी आणि माझ्या रुममेट्सनी गावाकडे जायचा निर्णय घेतला.
मी गावाकडे गेलो खरा, पण तिकडे याहून वाईट परस्थिती दिसली. तिकडे कोरोना व्हायरसच्या अनेक अफवा आधीच पसरल्या होत्या. पुण्यात कोरोना जास्त पसरल्याच्या बातम्या गावकरी ऐकत होते. शिवाय, मी पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, हे गावात सगळ्यांना माहिती आहे.
घरी गेलो त्या दिवशी मी सकाळी दूध आणायला डेअरीवर गेलो. तर डेअरीवाला म्हणाला, तू तर पुण्यात राहतो, तिकडं कोरोना सुरू आहे. डेअरीवाल्याचं हे वाक्य ऐकून दूध विकण्यासाठी आलेल्या तिघांनी पटापट खिशातले रुमाल काढून तोंडाला बांधायला सुरुवात केली. त्यानंतर ते माझ्यापासून काही अंतरावर जाऊन उभे राहिले. कुणी जवळ येऊन बोलायलासुद्धा तयार नव्हतं. तेव्हा क्षणभर मलाच कोरोना झाल्यासारखं वाटलं."

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा -कोरोनाच्या संसर्गासोबतच का वाढू लागले आहेत मानसिक आजार?
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

चार दिवस गावाकडे राहिल्यानंतर महेश पुन्हा पुण्याला परत आला आहे.
"5 एप्रिलला राज्यसेवेचा पेपर आहे. घरी थांबून अभ्यास होणार नाही, म्हणून मी पुण्याला वापस आलो. माझी ताई पुण्यातच राहते, तिच्याकडे राहण्याची माझी सोय झाली आहे. बाकी सगळे रुममेट्स मात्र गावाकडे गेले आहेत. कारण पुण्यात क्लास, अभ्यासिका आणि मेस बंद आहेत."
महेश बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये राहतो.
'पुण्यात अभ्यासाचं एक रूटीन असतं'
वाशिम जिल्ह्यातल्या जोगेश्वरी गावचा योगेश वाळुकर हासुद्धा गावाकडे परतला आहे.
बीबीसीला त्यानं सांगितलं, "कोरोनाबाबत अनेक मेसेज व्हायरल झाले होते. कोरोनाची एकदा लागण झाली की माणूस मरतो, खोकला जरी आला तरी कोरोना होतो, त्यामुळे मग घरच्यांना काळजी वाटत होती. ते सारखे फोन करून घरी बोलावत होते. त्यामुळे मग मी घरी आलो."
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला होणार आहे.

पण, आता कोरोनाच्या भीतीमुळे गावाकडे परतल्यामुळे परीक्षेसाठीच्या अभ्यासावर थोडा परिणाम होईल, असं योगेशला वाटतं.
तो म्हणाला, "स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचं पुण्यातलं रूटीन फिक्स असतं. त्यामुळे अभ्यासात अडथळा येत नाही. पुण्यात आपलं कुणीच नसतं. आपलं म्हणजे एकच अभ्यास. आजूबाजूला जी मित्र मंडळी असतात, तीसुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारीच असतात, त्यामुळे अभ्यासाचं एक वातावरण असतं."
"गावाकडे मात्र सगळेच ओळखीचे असतात. येताजाताना ते बोलत असतात. शिवाय लग्नसमारंभ तसंच शेतातली कामही असतात. त्यामुळे मग अभ्यासात अडथळा येतो."
5 एप्रिलची परीक्षा देण्यासाठी पुण्यात जाणार आहे, कारण वर्षभर त्यासाठी अभ्यास केला असल्याचं योगेश सांगतो.
'आयोगाची भूमिका स्पष्ट हवी'
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलाव्या, अशी सूचना राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती.
यावर आयोगानं भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की, 31 मार्चपर्यंत आयोगातर्फे कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. 5 एप्रिलला जी परीक्षा प्रस्तावित आहे, तिच्याबाबत 31 मार्चपर्यंत भूमिका जाहीर करण्यात येईल.
पण, आयोगानं आताच स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी अजित गावडे व्यक्त करतो.
सातारा जिल्ह्यातील गोखळी गावातील अजित अद्याप गावाकडे गेला नाही.

तो म्हणाला, "मी आता घरी जाऊ शकत नाही. कारण या परीक्षेसाठी मी वर्षभर अभ्यास केला आहे आणि आता एक-दोन मार्कानं पेपर हुकला, तर ते माझ्यासाठी अवघड आहे.
"खरं तर आयोगानं आताच स्पष्ट भूमिका जाहीर करायला हवी होती. 31 मार्चला जर आयोगानं म्हटलं की, 5 एप्रिलचा पेपर 15 एप्रिलला होणार आहे, तर सगळेच जण गावाकडे गेले असते. पण, आता आयोगानं 31 मार्चला सांगितलं की, पेपर 15 एप्रिलला होणार आहे आणि तोवर कोरोनाच्या बाबतीत राज्य फेज-3 किंवा फेज-4 मध्ये गेलं तर ते अजूनच अवघड होईल."
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अजित पुण्यात खोली भाड्यानं घेऊन राहतो. कितीही नाही म्हटलं तरी चहा, नाश्ता आणि जेवणासाठी आम्हाला बाहेर पडावंच लागतं. पण, आता मेस बंद असल्यामुळे जेवायचं कुठे, असा प्रश्न आमच्यासमोर समोर उभा ठाकल्याचं अजित सांगतो.

फोटो स्रोत, Getty Images
मेस बंद
राधाबाई पवार पुण्यातल्या नारायण पेठेत गेल्या 2 वर्षांपासून मेस चालवतात.
विद्यार्थी गावाकडे परतल्यामुळे त्यांनाही आर्थिक फटका बसला आहे.
त्या म्हणाल्या, "आमच्या मेसमध्ये 15 मुलं आहेत. तसंच 15 डबे दररोज बाहेर जायचे. पण, आता कोरोनाच्या भीतीमुळे सगळे मुलं गावाकडे गेले आहेत. त्यामुळे सध्या आमची मेस बंद आहे."
किती नुकसान झालं, असं विचारल्यावर त्या सांगतात, "आता मुलं वापस येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. तोवर जेवढं नुकसान व्हायचं तेवढं होणारच आहे."

फोटो स्रोत, Getty Images
'विद्यार्थ्यांनी तयारीवर लक्ष द्यावं'
पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी आम्ही 'द युनिक अकॅडमी'च्या मनोहर भोळे यांनी विचारलं.
त्यांनी सांगितलं, "पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे 89 ते 90 टक्के विद्यार्थी बाहेर गावाहून येतात. यांतील जवळपास सगळीच मुलं गावाकडे परतले आहेत. आई-वडिलांना वाटणाऱ्या काळजीपोटी विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. सध्या आम्ही क्लासला सुटी दिली आहे, तसंच सरकारचे निर्देश पाळा, असंही विद्यार्थ्यांना सांगितलं आहे."
पण, गावाकडे अभ्यास नीट होणार नाही, अशी साशंकता विद्यार्थ्यांच्या मनात आहे, यावर ते सांगतात, "विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा माहिती असेल, तर ते कुठेही अभ्यास करू शकतात."

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
आयोगानं पूर्व परीक्षेबाबत आताच ठोस भूमिका घ्यायला हवी होती, असं विद्यार्थ्यांना वाटतं, यावर भोळे म्हणतात, "पूर्व परीक्षेच्या बाबतीत सर्व बाबी विचारात घेऊन आयोग योग्यवेळी योग्य तो निर्णय नक्की घेईल. सध्या विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








