कोरोना व्हायरसमुळे वर्क फ्रॉम होम करताय? मग मुलांना कसं सांभाळायचं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळा बंद केल्या आहेत. आता लहान मुलांसाठी ही एकप्रकारे सुट्टीच असली तरी बाहेर गर्दीच्या ठिकाणी फिरू नये, असं आवाहनही सरकारनं केलंय.
दुसरीकडे, अनेक पालकांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारलाय. त्यामुळं नोकरी करणाऱ्या अनेकांसाठी घरात सध्या वेगळीच अडचण निर्माण झालीय - मुलांचं काय करावं?
सक्तीची सुटी
मुलांना अचानक मिळालेल्या या सुटीकडे त्रास वा वैताग म्हणून न पाहता याकडे एक संधी म्हणून पालकांनी पहावं, असं न्यू हॉरायझन्स डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉ. समीर दलवाई सांगतात.
"आपल्याला आता सक्तीची सुटी मिळालीय. पण प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी सकारात्मक बाहेर येतं. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सरकार या सगळ्यांनी 'सोशल डिस्टन्सिंग'चा सल्ला दिलाय. म्हणनूच कुटुंबासाठी ही चांगली संधी आहे एकमेकांच्या अधिक जवळ येण्याची. नातेसंबंध सुधारण्याची."

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

मुलं घरी आहेत, करण्यासाठी फार काही नाही, असं म्हणत ती टीव्ही वा मोबाईल बघत वेळ घालवण्याची शक्यताच आजकाल जास्त असते.
पण आई बाबांना मुलांसोबत काही गोष्टी एकत्र करण्यासाठी ही चांगली संधी आहे. टीव्ही वा सोशल मीडियासाठी आपण आणि मुलं देत असलेला 'स्क्रीन टाईम' कमी करून तो वेळ एकत्र घालवता येईल. इतर वेळी जेव्हा पालकांना एखादी गोष्ट करायला वेळ मिळत नसेल, तर आताची संधी चांगली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत दलवाई म्हणतात, "सध्या पसरत असलेल्या चुकीच्या बातम्या पाहता सोशल मीडियापासून काही प्रमाणात दूर जाणंच चांगलं. आपण कोणतं तरी कारण देऊन मीडिया वापरतो की खरंच गरज म्हणून याचा अंदाजही या काळात घेता येईल.
"अचानक पूर्ण वेळ एकत्र आल्याने कदाचित कुटुंबातल्या सदस्यांनाही सुरुवातीला हे थोडं कठीण जाईल. पण 'आता मला वेळ आहे तर बोल तुला काय बोलायचं होतं', असा पवित्रा पालकांनी घेऊ नये. कोरोनाच्या निमित्ताने का होईना, पण आपल्याला एकत्र वेळ घालवायची संधी मिळतेय, याचा आपल्याला आनंद आहे, हे पालकांनी मुलांना जाणवू द्यावं.
एखादी गोष्ट एकत्र करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. तुम्हाला काय करायचंय ते ठरवा, मुलांकडे ते बोलून दाखवा आणि मग प्रत्यक्ष कृती करा आणि त्यामध्ये मुलांना सहभागी करून घ्या."
यासाठी फार वेगळं काही करायची गरज नाही.
एकत्र मिळून स्वयंपाक करणं, घराची साफसफाई करणं, कपाट आवरणं किंवा मग एकत्र मिळून एखादी भिंत रंगवणं, बोर्ड गेम्स खेळणं यासारख्या गोष्टी घरच्या घरी करता येतील.

फोटो स्रोत, Getty Images
दलवाई सांगतात, "थोडा अभ्यास करून घ्यायलाही हरकत नाही, पण फार मागे लागू नका. आईबाबांपैकी कोणी एखाद्या विषयात हुशार असेल तर ते मुलांचा त्या विषयाचा अभ्यास घेऊ शकतात किंवा एरवी कठीण जाणाऱ्या विषयातल्या अडचणी दूर करा. पण जास्त अभ्यास घेऊ नका. आपण लहान असताना आपल्याला अचानक शाळेला सुटी मिळाली, तर किती आनंद व्हायचा हे आठवा."
वर्क फ्रॉम होम आणि मुलं
तुम्ही घरी असलात तरी ऑफिसचं काम करताय, याची कल्पना मुलांना आणि घरातल्या ज्येष्ठांना द्या.
तुम्ही कोणत्या वेळेत ऑफिसचं काम करणार आहात हे मुलांना सांगा. ऑफिसचा फोन कॉल सुरू असताना मुलांनी कसं वागणं अपेक्षित आहे हे देखील त्यांना समजवा.
मुलांसाठीही हा नवीन अनुभव असल्याने त्यांना या परिस्थितीशी जुळवून घ्यायला थोडा वेळ द्या.
घरच्या घरी अभ्यास
मोठी मुलं परिस्थिती समजू शकतात आणि स्वतःला घरी गुंतवून ठेवू शकतात.
पण लहान मुलांना हे करणं जमत नाही, म्हणून मग अशी मुलं कंटाळा आल्याने आई-बाबांकडे तगादा लावतात.

फोटो स्रोत, Getty Images
विविध भाषांच्या अभ्यासक असणाऱ्या अमृता जोशी - आमडेकर यांनी त्यांच्या मुलासाठी 'होम स्कूलिंग'चा पर्याय निवडलाय. त्या सांगतात, "घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना सहभागी करून घ्यायची ही एक उत्तम संधी आहे. यातून त्यांना नवीन काही शिकायला मिळेल, चांगल्या सवयी लागतील आणि त्यांचा वेळही जाईल. आणि यासाठी फार वेगळं असं काही करायचीही गरज नाही.
"स्वयंपाक करताना त्यांना त्या प्रक्रियेत त्यांच्या वयानुसार सहभागी करून घ्या. यासाठी वेगळा पदार्थ करणं गरजेचं नाही. त्यांच्यासोबत रोजच्या जेवणातले किंवा आपले पारंपरिक पदार्थ बनवा. त्यातलं विज्ञान त्यांना सांगा.
"घरातली लहानसहान कामं करू द्या. सहज सोप्या खेळांमधून तुम्ही त्यांचा अभ्यासही घेऊ शकता. एखादा विषय निवडून त्यांना त्याविषयीची तपशीलवार माहिती गोळा करायला सांगा किंवा मग त्यांच्याशी इतर भाषेतले शब्द न वापरता ठराविकच एका भाषेतून बोलायची पैज लावा.
"शिवाय, अनेक गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. मुलं त्याच्या मदतीने या दिवसांमध्ये नवीन कला किंवा कौशल्यं शिकूही शकतील. मुलांच्या सोबत मिळून विविध पुस्तकं वाचणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. घरातले सगळेजण मिळून रोज सकाळी एकत्र थोडा व्यायामही करू शकतात. यामुळे तब्येत चांगली रहायलाही मदत होईल," असं त्या सांगतात.
इंटरनेटवरचा खजिना
मुलांना गुंतवून ठेवतील अशा अनेक गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत, मात्र स्क्रीन टाईम मर्यादित राहील याची दक्षता तुम्हालाच घ्यावी लागेल.
मुलांसाठीची पुस्तक छापणाऱ्या अमर चित्र कथा प्रकाशनाने त्यांच्या अमर चित्र कथा आणि टिंकल डायजेस्ट या दोन प्रकाशनांचे सगळे भाग पुढच्या महिन्याभरासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहेत. त्यांची अॅप्स डाऊनलोड करून मुलांना त्यावर ही पुस्तकं वाचता येतील.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रॅव्हल अँड लेझर या वेबसाईटवर जगभरातल्या 12 प्रसिद्ध म्युझियम्सची व्हर्च्युअल टूर उपलब्ध आहे.
स्कोलास्टिक (Scholastic) या पब्लिशिंग कंपनीने मुलांच्या इयत्तेनुसार त्यांना शिकता येतील अशा गोष्टी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
तर नॅशनल जिओग्राफिकच्या लहान मुलांसाठीच्या वेबसाईटवर अत्यंत रंजक माहिती उपलब्ध आहे. कोरोना व्हायरसविषयीची माहितीही इथे आहे.
याशिवाय मुलांसोबत करता येतील अशा अनेक अॅक्टिव्हिटीज, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर गोष्टी शिकवणारी अनेक युट्यूब चॅनल्सही आहेत.
मुलांसोबत घरी तुम्ही काही चांगले सिनेमेही पाहू शकता. अनेक वेबसाईट्सवर यासाठीची लिस्ट उपलब्ध आहे.
नैसर्गिक आणि सामाजिक भान
निसर्गाशी आपला असलेला संबंध मुलांना समजावून सांगण्याची ही चांगली संधी आहे.
पर्यावरणासंबंधीची आपली जबाबदारी, पर्यावरणाचा समतोल ढळू नये म्हणून आपण काय करायला हवं, हे मुलांना शिकवता येईल.
यासोबतच मुलांना सामाजिक जाणीवा करून देण्याची ही योग्य संधी असल्याचं डॉ. दलवाई सांगतात. ते म्हणतात, "हे साथीचे रोग पसरतात तेव्हा ते गरीब - श्रीमंत, धर्म, जात असा भेदभाव करत नाहीत. ही लागण कोणालाही होऊ शकते. जगभरात आता तेच झालंय. ही परिस्थिती मुलांना सांगा आणि म्हणून माणुसकी या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे, हे मुलांना शिकवा."

फोटो स्रोत, Getty Images
"तुमच्या आजूबाजूला वृद्ध व्यक्ती एकट्या राहत असतील, तर त्यांना सामान आणून द्यायला मदत करा. वृद्धांना सध्या सर्वात जास्त धोका कशा प्रकारे आहे आणि आपण त्यांना मदत का करायला हवी हे समजावत यामध्ये मुलांना सहभागी करा. समाजातल्या इतरांचं आपण देणं लागतो, आपण इतरांना मदत करायला हवी, स्वतःसोबत इतरांचीही काळजी घ्यायला हवी हे मुलांना कळू द्या."
मुलांचं मानसिक आरोग्य
आजूबाजूला सतत सुरू असणाऱ्या कोरोना व्हायरसच्या चर्चा आणि घरात बसण्यामुळे मुलांच्या मनात विविध शंका येऊ शकतात.
याविषयी मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलच्या माजी डीन आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर सांगतात, "मुलं लहान असली तरी त्यांच्या कानावर शब्द पडत असतात, ती विचार करत असतात. म्हणून त्यांच्याशी त्यांना कळेल अशा सोप्या भाषेत बोलणं गरजेचं आहे. त्यांना कळेल अशा पद्धतीने त्यांना चांगल्या सवयी आणि तसं करण्याची गरज समजवावी. आलेली परिस्थिती फेटाळून लावू नये. अशी परिस्थिती आलेली आहे, आपण सगळ्यांनी मिळून तिला तोंड द्यायचंय आणि त्यासाठीचे पर्याय आपल्याकडे आहेत याची जाणीव आणि खात्री मुलांना करून द्यावी.
"मुलांना स्वतःहून कसली भीती वाटत नाही. पण घरातल्या मोठ्यांना काळजीत पाहून ती घाबरतात. तुम्ही घाबरला नाहीत तर मुलंही घाबरणार नाहीत. तुमच्या कृतीतून ते मुलांना कळू द्या," त्या सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








