येस बँकेचे व्यवहार पूर्वपदावर

येस बँकेने आपले सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याचे ट्वीटरद्वारे जाहीर केले आहे.

एडीजी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांना येस बॅंक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ED) समन्स बजावले आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल अंबानी हे येस बॅंकेचे डिफॉल्टर्स आहेत. अंबानी यांनी येस बॅंकेकडून 12,800 रुपयांचे कर्ज घेतले होते, पण ते त्यांनी थकवले आहेत. या व्यतिरिक्त एस्सेल ग्रुपचे प्रमुख सुभाष चंद्रा यांनी देखील येस बँकेचे 8,400 कोटी रुपये थकवले आहेत.

दिवाण हाउसिंगने येस बँकेचे 4,735 कोटी रुपये थकवले असून ILFSने 2,500 कोटी रुपये थकवले आहेत. जेट एअरवेजकडून येस बँकेला 1100 कोटी रुपये येणं बाकी आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येस बॅंकेच्या डिफॉल्टर्सची लिस्ट ट्वीट केली आहे.

येस बॅंकेचे चेअरमन राणा कपूर यांनी कर्जवाटप करताना लाच घेतली का, याची तपासणी करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाने दिल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. येस बॅंकेची 42,136 कोटींची येणं बाकी आहे.

6 मार्च रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत मान्य केलं होतं, की अनिल अंबानी ग्रुप, DHFL, ILFS आणि व्होडाफोन यांनी येस बॅंकेचे पैसे थकवले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विचारलं, की भारतीय बॅंकांचं कर्ज बुडवणारे देशातील सर्वांत मोठे थकबाकीदार कोण आहेत याची माहिती देण्यात यावी.

पुढे राहुल गांधींनी म्हटलं, "भारतीय अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. आपली बॅंकिंग प्रणाली ही चांगल्या स्थितीत नाही. याचं खरं कारण बॅंकांकडून कर्ज घेऊन बुडवणारे लोक आहेत. ते बॅंकेचा पैसा चोरत आहेत. मी विचारलं होतं, की भारताचे पहिले 50 विलफुल डिफॉल्टर कोण आहेत. पण मला काही उत्तर मिळालं नाही. पंतप्रधान सांगत होते, की जे बॅंकांचा पैसा चोरतील त्यांना मी पकडून आणेन. आता मी विचारत आहे ते 50 लोक कोण आहेत पण मला याचं उत्तर मात्र मिळालं नाही.

याच वेळी सरकारने येस बॅंकेच्या पुनर्रचनेची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार येस बॅंकेचे शेअर होल्डर तीन वर्षांसाठी आपले शेअर विकू शकणार नाहीत. पुनर्रचनेत ही अट ठेवण्यात आली आहे, की जर कुणाकडे 100 हून अधिक शेअर असतील तर 75 टक्क्यांहून अधिक समभाग तुम्हाला विकता येणार नाही. ज्या व्यक्तीकडे 100 हून कमी शेअर्स आहेत ते पूर्णपणे आपले शेअर विकू शकतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)