You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: थिएटर बंद, शूटिंग रद्द; बॉलिवुडला जबर फटका
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी मराठीसाठी
कोरोना व्हायरसची भीती आता बॉलिवुड म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीलाही सतावतेय, आणि त्याचा फटकाही आता बसू लागलाय.
दिल्ली, मुंबई, कर्नाटक, केरळ, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृह काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता प्रदर्शित झालेल्या सिनेमांना मोठं नुकसान सोसावं लागतंय.
कोरोना व्हायरसमुळं अनेक मोठ्या कलाकारांनी आपले प्लॅन बदलले आहेत. अनेक सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. अनेक सिनेमांची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. आयफा आणि झी सिनेमा अवॉर्ड्ससारखे भारतातले मोठे चित्रपट पुरस्कार सोहळेही रद्द करण्यात आले आहेत.
मोठ्या सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या
कोरोना व्हायरसची लोकांमध्ये असलेली दहशत बघता 24 मार्च रोजी प्रदर्शित होणारा 'सूर्यवंशी' या सिनेमाची रिलीज डेट चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी रद्द केली आहे. कोरोना व्हायरसचा धोका टळत नाही, तोवर सिनेमा रिलीज करणार नाही, असं रोहित शेट्टीचं म्हणणं आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह यासारखे दिग्गज स्टारकास्ट असल्याने हा यावर्षीचा सर्वात मोठा सिनेमा मानला जातोय. सिनेमावर खूप पैसा खर्च झाल्याने नुकसान होऊ नये, असं शेट्टी यांचं म्हणणं आहे.
याविषयी बोलताना स्वतः रोहित शेट्टी म्हणाले, "सूर्यवंशीसाठी आम्ही वर्षभर मेहनत केली आहे. सिनेमाच्या ट्रेलरला रिस्पॉन्सही चांगला मिळाला आहे. त्यामुळे सिनेमा बघण्याची लोकांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसतं आणि म्हणूनच योग्य वेळ येण्याची आम्ही वाट बघू."
परदेशातील शूटिंग रद्द
झोया अख्तर आणि रीमा कागती यांची अमेझॉन प्राईमवरची 'मेड इन हेवन' ही वेबसीरिज बरीच लोकप्रिय झाली होती. या वेबसीरिजचं दुसरं पर्व 'मेड इन हेवन 2'चं शूटिंग लवकरच युरोपात सुरू होणार होतं. मात्र, हे शूटिंग आता रद्द करण्यात आलं आहे.
शूटिंग रद्द होणं निराशाजनक असल्याचं या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शोभिता धुलिपालने सांगितलं. तिची मुख्य भूमिका असणाऱ्या 'सितारा' या सिनेमावरही कोरोनाचा परिणाम बघायला मिळतोय. केरळमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार होतं. मात्र, तेही रद्द करण्यात आलं आहे.
दिग्गज कलाकारांनाही कोरोनाची भीती
सलमान खानच्या 'राधे' सिनेमाचं शूटिंगही काही काळ रद्द करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर हा सिनेमा परदेशात शूट होणार होता. मात्र, आता मुंबईत शूटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' सिनेमाचं शूटिंग राजस्थानमध्ये सुरू होतं. मात्र, आता ते मुंबईतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं जयपूर आणि जयसलमेरमध्ये होणारं शूटिंगही रखडलं आहे. कार्तिक आर्यन आणि टियारा अडवाणी यांच्या 'भुलभुलैया 2' सिनेमाबाबतही असंच काहीसं झालं आहे. या सिनेमाचं राजस्थानमध्ये होणारं शूटिंग आता लखनौला शिफ्ट करण्यात आलं आहे. कोरोनाचा धोका वाढत असल्याचं जाणवल्यास सर्वच सिनेमांचं शूटिंग रद्द होऊ शकतं.
चित्रपटगृह मालकांना मोठा फटका
शूटिंगव्यतिरिक्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बागी 3' आणि 'अंग्रेजी मीडियम' यासारख्या सिनेमांवरही कोरोनाचा परिणाम झालेला दिसतो.
फिल्म मार्केट एक्सपर्ट अमोद मेहरा बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कोरोनाचा बॉलिवुडवर आधी एवढा परिणाम झाला नव्हता. मात्र, आजपासून जास्त फटका बसणार आहे. सरकारने आधी दिल्ली, केरळ, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृहं बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि आता मुंबईतली चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बिकट होईल. चित्रपट प्रदर्शितच झाला नाही तर चित्रपटगृह मालकांचं आर्थिक नुकसान होईल. त्यांना मोठा धक्का बसला आहे."
बॉलिवुड कर्मचाऱ्यांवर संकट
अमोद मेहरा पुढे सांगतात, "हजारो कोटींहून जास्त नुकसान झालं आहे. तख्तसारख्या अनेक सिनेमांना तारखाच मिळत नव्हत्या. हा सिनेमा या वर्षातला सर्वात महाग सिनेमा होता. मात्र, आता पुन्हा एकदा सिनेमाच्या शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे केवळ पैशांचं नुकसान होत नाही तर मेकअप आर्टिस्ट, ज्युनिअर आर्टिस्ट, स्पॉट बॉय, लाईटमन, कॅमरामन यासारख्या अनेकांवरही गंडांतर येतं.
अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, हे कर्मचारी तर घरून काम करू शकत नाहीत. काम मिळालं नाही तर त्यांच्या मुलाबाळांचं पालनपोषण कसं होणार?"
छोट्या सिनेमांचं मोठं नुकसान
इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा काल रिलीज झाला. यावर अमोद मेहरा यांचं म्हणणं आहे, "आजचं सर्वात मोठं उदाहरण अंग्रेजी मीडियम सिनेमाचं आहे. या सिनेमाची अवस्था तर खूपच वाईट आहे. कालच सिनेमा रिलीज झाला आणि आजपासून थिएटर बंद आहेत. त्यांनी चित्रपट प्रदर्शित करायला नको होता. एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता 'सूर्यवंशी' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने त्यांच्या मागून येणाऱ्या रणवीर सिंहचा '83', डेव्हिड धवन यांचा 'कुली' या सिनेमांच्या तारखाही आता नव्याने ठरवण्यात येतील."
सर्व सिनेमे उशिराने येतील. त्यामुळे लहान सिनेमांचा मोठा तोटा होईल. लहान सिनेमे प्रदर्शित होतीलही की नाही, याबद्दल साशंकता आहे.
मात्र, परिस्थिती अशीच राहिली तर बॉलिवुडचं मोठं नुकसान होईल, एवढं निश्चित.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)