You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबद्दलच्या 'या' 9 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?
तो दिवस होता 30 सप्टेंबर 2001. उत्तर प्रदेशात विमान कोसळून झालेल्या अपघातात माधवराव शिंदे यांचा मृत्यू झाला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी या अपघातात वडिलांना गमावलं.
मध्य प्रदेशातल्या गुणा मतदारसंघातून माधवराव शिंदे खासदार होते. 1971 पासून ते एकदाही पराभूत झाले नव्हते. जनसंघाच्या तिकिटावरही माधवराव शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. गुणातून ते विक्रमी नऊवेळा लोकसभेवर निवडून गेले होते.
ज्योतिरादित्य यांची आई किरण राज्यलक्ष्मी या महाराज कास्की लामजंग जुद्धा समशेर जंग बहादूर राणा यांच्या पणती आहेत. ज्योतिरादित्य यांचं लग्न प्रियदर्शिनीराजे शिंदे यांच्याशी झालं. त्या गायकवाड घराण्याच्या वंशज आहेत.
1. राजकारणात प्रवेश
2001 मध्ये माधवरावांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यातच ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढच्याच वर्षी फेब्रुवारीत त्यांनी गुणातून निवडणूक लढवली. माधवरावांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. ज्योतिरादित्य यांनी समाधानकारक फरकाने ही निवडणूक जिंकली. ते 2002 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 मध्येही त्यांची विजयी परंपरा सुरूच राहिली.
मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत केपीएस यादव यांनी ज्योतिरादित्य यांना पराभवाचा धक्का दिला. यादव हे काही वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य यांचे राजकीय सचिव होते. राजकीय निरीक्षकांच्या मते स्वत:च्याच माजी सचिवाकडून झालेली हार ज्योतिरादित्य यांना मोठा धक्का होता.
2. धनाढ्य राजकारणी
ज्योतिरादित्य हे ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज आहेत. त्यांचे आजोबा जिवाजीराव शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे शेवटचे राजे होते.
ज्योतिरादित्य यांनी केंद्रात काँग्रेसप्रणित आघाडीचं सरकार असताना मंत्री म्हणून कारभार पाहिला आहे. 2007, 2009 आणि 2012 मध्ये ते मंत्रिपदी होते. 2007 मध्ये त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2009 मध्ये त्यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. काही काळ ते ऊर्जामंत्रीसुद्धा होते.
मंत्रिपदी असताना धाडसी निर्णय घेण्यासाठी त्यांची ख्याती होती. लोकांसाठी वेळ देणारे, त्यांच्याकरता उपलब्ध असणारे मंत्री अशी त्यांची ओळख होती. युपीए सरकारमधल्या तरुण मंत्र्यांपैकी ते एक होते.
25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर जंगम मालमत्ता नावावर असणाऱ्या ज्योतिरादित्य यांचं नाव देशातल्या धनाढ्य राजकारण्यांमध्ये घेतलं जातं. त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांची नेमकी संपत्ती किती हे स्पष्ट झालं होतं. त्यांच्या घरातील सदस्यांनी संपत्तीवरून त्यांना न्यायालयात आव्हान दिलं होतं.
3. वादविवाद
ज्योतिरादित्य ऊर्जामंत्रिपदी असताना देशभरात पॉवरग्रिड ठप्प झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. देशाच्या इतिहासातला सर्वाधिक वेळ वीजपुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांच्य मंत्रिपदाच्या कार्यकाळात या व्यतिरिक्त इतर कोणतेही वादविवाद उद्भवले नाहीत.
मात्र वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकरणामुळे त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. विरोधी पक्षांकडून तसंच युपीएचे सहकारी पक्षांनी त्यांच्यावर टीका झाली होती.
4. क्रिकेट शौकीन
क्रिकेटप्रेमी असलेले ज्योतिरादित्य मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटचा कारभार ज्या पद्धतीने हाकला जात होता त्याबाबत त्यांना आक्षेप होता.
त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
5. लोकसभा निवडणुकीत हार
2019 लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांचे एकेकाळचे राजकीय सचिव कृष्ण पाल सिंग यादव यांनी त्यांना चीतपट केलं.
तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यावेळी मध्य प्रदेशात केलेल्या प्रचारादरम्यान कमलनाथ आणि ज्योतिरादित्य हे दोघेही त्यांच्याबरोबर असत.
कमलनाथ हे अनुभवी राजकीय नेते असल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं. ज्योतिरादित्य हे भविष्यातले नेते आहेत, असं ते म्हणाले होते.
2018 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल संपूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने लागले नाहीत. ज्योतिरादित्य यांना त्यानंतर मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. काँग्रेस हायकमांडने याकरताही तात्विक मंजुरी दिली, मात्र त्यासाठी निवडून आलेल्या उमेदवारांपैकी निम्म्या उमेदवारांचा पाठिंबा असल्याचं ज्योतिरादित्य यांनी सिद्ध करावं असं काँग्रेस हायकमांडचं म्हणणं होतं. मात्र त्यांना केवळ 23 आमदारांचा पाठिंबा होता. पुढे कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आणि पुढे जे घडलं तो इतिहास आहे.
6. गांधी घराण्याशी जवळीक आणि दुभंगलेली स्वप्नं
ज्योतिरादित्य यांचे गांधी घराण्याशी विशेषत: राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. काँग्रेसच्या बऱ्यावाईट काळात ते राहुल यांच्याशी एकनिष्ठ राहिले. राहुल आणि ज्योतिरादित्य यांना अनेकदा जाहीर व्यासपीठांवर एकत्र पाहायला मिळालं आहे. मात्र मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची निवड झाल्याने ज्योतिरादित्य नाराज होते. यासंदर्भात अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली.
राज्यात सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मध्य प्रदेश काँग्रेस संघटनेच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार झाल्याचं भोपाळस्थित काँग्रेससंदर्भातील घडामोडी टिपणाऱ्यांनी सांगितलं. मात्र चंबळ हाच ज्योतिरादित्य यांचा बालेकिल्ला असून, अन्य राज्याच्या भागात त्यांचा प्रभाव नसल्याचं पक्षातील धुरिणांनी सांगितलं.
सूत्रांच्या मते राज्यसभेच्या मध्य प्रदेशातील जागी ज्योतिरादित्य यांची वर्णी लागेल अशी चिन्हं होती. मात्र ही जागा दिग्विजय सिंह आणि प्रियंका गांधी यांना मिळेल असं सूत्रांनी सांगितलं. मध्य प्रदेशातून या दोघांपैकी एकाला संधी मिळणार असल्याचं स्पष्ट होताच ज्योतिरादित्य यांच्या सत्तेच्या आशा मावळल्या.
7. सरकारविरोधात असंतोष
मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. स्वपक्षीय सरकारबाबत ज्योतिरादित्य यांच्या मनात असंतोष होता. टिकमगढ इथं 18 फेब्रुवारीला झालेल्या रॅलीत त्यांची नाराजी पाहायला मिळाली होती. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली वचनं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते, त्यांनी रस्त्यावर उतरावं.
काँग्रेस हायकमांडने पक्षातली ही अंतर्गत धुसफूस फार मोठी नसल्याचं सांगत परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं होतं. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला त्यादिवशीही सगळं काही सुरळीत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला.
8. काँग्रेसमधून राजीनामा
ज्योतिरादित्य यांनी 9 मार्चला म्हणजे सोमवारीच राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट झालं. 10 मार्चला मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सगळं काही सुरळीत होईल असं ज्योतिरादित्य वारंवार सांगत होते. मात्र त्यांचे निकटवर्तीय महिंद्र सिंग सिसोदिया यांच्या वक्तव्याने ज्योतिरादित्य यांची भविष्यातली वाटचाल स्पष्ट झाली होती.
सिसोदिया म्हणाले होते, की सरकार पाडलं जाणार नाही. मात्र आमचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दुर्लक्षित वागणूक मिळेल त्यावेळी सरकार संकटात असेल.
शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसच्या 17 आमदारांनी आमदारकीचे राजीनामे दिले. त्यांच्यापैकी काहींना बेंगळुरू तर काहींना गुरुग्राम इथल्या रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं. यामुळे कमलनाथ सरकार संकटात आलं.
9. राजकीय नाट्य
ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. कमलनाथ यांनी 9 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र राज्यातली परिस्थिती ढासळल्याने ते भोपाळला रवाना झाले.
9 मार्च रोजी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. राज्यातल्या परिस्थितीची त्यांनी पक्ष नेतृत्वाला कल्पना दिली.
दरम्यान पक्षाविरोधी कृत्यामुळे ज्योतिरादित्य यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनी सांगितलं. या घोषणेनंतर ज्योतिरादित्य यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.
भाजप नेतृत्वाने त्यांना राज्यसभेची जागा तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत हमी दिल्याचं समजतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)