You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्योतिरादित्य शिंदे: 19 आमदारांचे राजीनामे मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांकडे
मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे.
भाजप मुख्यालयात सुरू असलेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित आहेत.
6.30: काँग्रेसच्या 19 आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे
मध्य प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव, नरोत्तम मिश्रा यांच्यासह भाजपचे अन्य नेते काँग्रेसच्या 19 आमदारांचे राजीनामे सादर करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष एन.पी. प्रजापती यांच्या निवासस्थानी पोहोचले.
आमच्याकडे 19 आमदारांच्या राजीनाम्याची मूळ प्रत असल्याचं भाजप नेते भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षांना हे राजीनामे सुपुर्द करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
रात्रीपर्यंत राजीनाम्यांची संख्या 30 पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं.
विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसच्या 19 आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभेच्या घटनात्मक प्रक्रियेनुसार कार्यवाही केली जाईल असं विधानसभा अध्यक्ष प्रजापती यांनी सांगितलं.
5.08: बाबांनी घेतलेल्या भूमिकेचा अभिमान- आर्यमन शिंदे
"बाबांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचा मला अभिमान आहे. परंपरा असलेल्या पक्षातून बाजूला होण्यासाठी धैर्य लागतं. आमचं कुटुंब सत्तेचं भुकेलेलं नाही याचा इतिहास साक्षी आहे. जनतेला दिलेल्या वचनाप्रमाणे देशात आणि मध्य प्रदेशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत", असं ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र आर्यमन यांनी ट्वीट केलं आहे.
4. 06 : राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या 21
भोपाळमधील बीबीसीचे सहयोगी पत्रकार शुरैह नियाजी यांनी सांगितलं, की दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पक्ष सोडणाऱ्या आमदारांची एकूण संख्या 21 झाली आहे. ऐदल सिंह कन्साना आणि बिसाहूलाल सिंह यांनी राजीनामा दिला आहे.
शुरैह यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ शिंदे यांच्या जवळचेच मानले जाणारे आमदार राजीनामा देत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र बिसाहूलाल सिंह हे दिग्विजय सिंह यांच्या जवळचे मानले जातात.
3.37 : मंत्रिपदावरुन 6 जणांना हटविण्याची शिफारस
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून 6 जणांना मंत्रिपदावरून हटविण्याची शिफारस केली आहे.
या पत्रात इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युमन सिंह तोमर आणि डॉक्टर प्रभुराम चौधरी यांच्या नावाचा उल्लेख आहे.
2.46- मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या 19 बंडखोर आमदारांनी कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची मागणी केलीय. हे आमदार सध्या कर्नाटकातील बंगळुरूत आहेत.
"आम्ही स्वत:हून काही महत्त्वाच्या कामासाठी कर्नाटकात आलोय. त्यामुळं आम्हाला बंगळुरू आणि आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी सुरक्षा पुरवावी," अशी मागणी या आमदारांनी पत्रातून केलीय.
मध्य प्रदेशातील या 19 आमदारांनी 6 विद्यमान मंत्र्यांचाही समावेश आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर या आमदारांनीही राजीनामा दिलाय, अशी माहिती ANI नं दिलीय.
12.46- शिंदे यांना पक्षाने अनेक वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी देऊन त्यांचा सन्मान राखला. कदाचित त्यांना मंत्रिपदाची लालूच पंतप्रधान मोदी यांनी दाखवली असेल. त्यांचं कुटुंब भाजपशी अनेक दशकं संबंधित आहे हे आम्हाला माहिती आहे. पण त्यांनी पक्ष सोडणं हा मोठा धक्का आहे.
12.29- पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून तात्काळ काढून टाकत असल्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी हे ट्वीट केले आहे.
12.11- ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र त्यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केले आहे. हे पत्र 9 मार्चला लिहिल्याचे दिसून येते. सुरुवातीपासूनच राज्य आणि देशातल्या लोकांची सेवा करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय होतं. मात्र आता मी काँग्रेस पक्षासाठी हे काम करु शकत नसल्याचं दिसत आहे. आपले लोक आणि कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आता पुढे जाऊन नवी सुरुवात करावी असं मला वाटतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
11.56- काँग्रेसच्या आमदारांना बंगळुरुला घेऊन जाणाऱ्या विमानांचा खर्च भाजपनेच केला होता. कमलनाथ सरकारने मध्य प्रदेशातील माफियांविरोधात कारवाई केल्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.
11.50- काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, जितू पटवारी, बाला बच्चन, सज्जन सिंग वर्मा, सुरेंद्र सिंग बघेल हे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भोपाळ येथिल निवासस्थानी उपस्थित.
11.45- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ज्योतिरादित्य सिंदिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक संपवून बाहेर पडले.
11.40- काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
11.30- मध्य प्रदेशात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु. माजी मुख्यमंत्री, व्ही.डी. शर्मा, विनय सहस्रबुद्धे या बैठकीस उपस्थित होते.
10.53- राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले.
10. 50 - ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला रवाना झाल्याचं काही वृत्तवाहिन्या चालवत आहेत.
10.30- आमच्या सरकारला कोणताही धक्का नाही. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी चर्चा सुरु आहे. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल- पी. सी. शर्मा, काँग्रेस नेते
ज्योतिरादित्य यांचं बंड?
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सत्ताधारी काँग्रेसचे 17 आमदार कर्नाटकात दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार ज्योतिरादित्य शिंदे गटाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे.
काँग्रेसच्या या आमदारांना बेंगळुरूतल्या एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री तुलसी सिलावत, कामगारमंत्री महेंद्रसिंग सिसोदिया, वाहतूक मंत्री गोविंद सिंह राजपूत, महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी, अन्न आणि नागरी पुरवठा प्रद्युम्न सिंग तोमर, शालेय शिक्षण मंत्री डॉ. प्रभुरा चौधरी अशी मंत्र्यांची नावं आहेत.
दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना ज्योतिरादित्य शिंदे यांना मात्र स्वाईन फ्लू झाल्याचं सांगितलं जात आहे. "जे काँग्रेसचे खरे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसमध्येच राहतील," असं सूचक वक्तव्य काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांचा आज जन्मदिन आहे. त्या निमित्तानं ते आज ग्वाल्हेरला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजच्या दिवशी ज्योतिरादित्य शिंदे नवा पक्ष स्थापन करून भाजपबरोबर युती करू शकतात अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
"हा काँग्रेसमधला अंतर्गत वाद आहे. मला त्यावर कुठलही मत प्रदर्शन करायचं नाही. आम्ही पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की आम्हाला हे सरकार पाडण्यात काहीच रस नाही," असं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे.
कमलनाथ ज्योतिरादित्य संघर्ष
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंदिया आणि कमलनाथ यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची रात्री उशीरा कमलनाथ यांच्या घरी एक बैठक पार पडली.
तर दिल्लीत रात्री उशीरा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनिय गांधींची भेट घेतली आहे.
मध्य प्रदेशातल्या विधानसभेत एकूण 228 आमदार आहेत. दोन जागा संबंधित आमदारांचं निधन झाल्याने रिक्त आहेत. काँग्रेसकडे 114 आमदार आहेत आणि भाजपकडे 107. उर्वरित 9 आमदारांपैकी बहुजन समाज पक्षाचे 2, समाजवादी पक्षाचा 1 तर 4 अपक्ष आमदार आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या 8 आमदारांना भाजपने बळजबरीने गुडगावमधल्या एका हॉटेलवर ठेवल्याचं काँग्रेसचं म्हणणं होतं.
या 8 आमदारांमध्ये 4 काँग्रेसचे होते तर सपा आणि बसपा या पक्षाचे प्रत्येक 1-1 आमदार होते तर 2 अपक्ष आमदार होते, ज्यांचा मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारला पाठिंबा आहे.
गेल्यावर्षी मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते गोपाल भार्गव विधानसभेत कमलनाथ सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले होते की आमच्या पक्षनेतृत्त्वाने एक इशारा करताच मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार 24 तासात कोसळू शकतं.
गेल्या वर्षी 24 जुलै रोजी गोपाल भार्गव विधानसभेत म्हणाले होते, "आमच्या वरच्या नंबर 1 किंवा 2च्या नेत्याने आदेश दिला तर तुमचं सरकार 24 तासदेखील चालणार नाही."
गोपाल भार्गव यांच्या या दाव्यानंतर विधानसभेत क्रिमिनल लॉवर मतदान घेण्यात आलं होतं आणि यात कमलनाथ सरकारच्या बाजूने 122 आमदारांनी मतदान केलं होतं. 231 आमदारांच्या विधानसभेत सत्ताधारी काँग्रेसला बहुमतापेक्षा 7 मतं अधिक मिळाली होती. इतकंच नाही तर भाजपच्याही 2 आमदारांनी काँग्रेसच्या पारड्यात मत टाकलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)