You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA: मुंबई बागमध्ये पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा महिलांचा आरोप
मुंबईत CAA, NRC आणि NPR विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काल रात्री महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
मुंबईतल्या नागपाड्यातल्या मोरलँड रस्त्यावर 'मुंबई बाग' असं नाव देण्यात आलं आहे. दिल्लीतल्या शाहीन बागच्या धर्तीवर हे आंदोलन सुरू आहे.
काल रात्री पोलिसांनी येऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा इथल्या आंदोलकांचा आरोप आहे. पोलिसांनी आम्हाला आंदोलकांनी धक्काबुक्की केल्यानं आम्हाला दुखापत झाली, असंही आंदोलक महिलेनं सांगितलं.
काल दुपारी ऊन लागत असल्यामुळे महिलांनी उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून शेड तयार केली. पोलिसांनी ते कापड हटविवण्यास सांगितलं. आंदोलकांनी यास नकार दिल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला.
मात्र, पोलिसांनी महिला आंदोलकांना धक्काबुक्की केल्याचे आरोप नाकारले आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना झोन-3 चे डीसीपी अभिनाश कुमार म्हणाले, "आंदोलनासाठी परवानगी नसल्यानं ते बेकायदेशीर आंदोलन आहे. त्यामुळं आंदोलनस्थळी मंडप उभारण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला, ज्याला पोलिसांनी विरोध केला. आम्ही फक्त मंडप बाजूला नेला, बाकी काहीही केलेलं नाही."
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या आंदोलकांना नोटीस दिली होती. त्या नोटिशीविरोधातही महिलांनी आवाज उठवला होता.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही म्हटलं होतं की, आंदोलन योग्य आहे, मात्र आंदोलनाचं ठिकाण चुकीचं आहे.
आता पोलिसांशी झटापट झाल्यानं 'मुंबई बाग' पुन्हा चर्चेत आलीय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)