You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली दंगलः पोलिसांवरील दगडफेकीच्या व्हायरल व्हीडिओमागचं सत्य
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 200हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये दिल्ली पोलिसातील रतनलाल यांचाही समावेश होता.
रतनलाल यांचा मृत्यू कशामुळे झाला याविषयी कुणाला काहीच कल्पना नव्हती. त्यांचे कुटुंब आणि पोलीस यांनी सांगितलं होतं की, हिंसाचारात रतनलाल मृत्यू झाला आहे. पण, का आणि कशामुळे याची कोणतीही माहिती आतापर्यंत मिळाली नव्हती.
पण, बुधवारी संध्याकाळपासून 2 व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात दंगेखोर पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहे. वृत्तसंस्था ANI नंही हा व्हीडिओ गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. असं असलं तरी या व्हीडिओची सत्यतेबाबत बीबीसी कोणताही दावा करत नाही.
याच ठिकाणी रतनलाल यांच्यावर हल्ला झाले आणि ते जखमी झाले, असं वक्तव्य गोकुळपुरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुज कुमार यांनी केलं आहे.
व्हीडिओत काय आहे?
1.31 सेकंदाच्या या व्हीडिओला एका उंच ठिकाणावरुन शूट करण्यात आलं आहे. व्हीडिओच्या सुरुवातीला लोक इकडेतिकडे धावताना दिसत आहेत. या ठिकाणी काही पोलीस तैनात असलेले दिसून येतात.
यादरम्यान, काही जण पोलिसांनर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक करताना दिसत आहेत. यापासून बचाव करण्यासाठी पोलीस रस्त्यावरील दुभाजकाजवळ जमा होताना दिसतात. जमाव हिंसक झाल्यानंतर काही पोलीस कर्मचारी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाताना दिसतात.
या व्हीडिओत बुरखा घातलेल्या महिलाही दिसतात.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिलंय, "संसद आणि सर्वोच्च न्यायालय नाही, तर रस्त्यावर उतरुन देशाच्या राज्यघटनेचं संरक्षण करताना सोनियाजी आणि हर्ष मंदर यांचे मित्र-मैत्रिणी दिसत आहेत. सोनिया यांच्या सांगण्यानुसार, घरातून बाहेर पडत ते रस्त्यावर लढाई लढत आहेत. मित्रांनो याच ठिकाणी रतनलाल यांचा मृत्यू झाला होता."
या घटनेशी संबंधित दुसरा एक व्हीडिओ दुसऱ्या अँगलहून शूट झालेला आहे.
या व्हीडिओत जेव्हा पोलीस कर्माचारी पोलीस उपायुक्तांना ग्रीन बेल्टकडे घेऊन जात आहेत, तेव्हाही दंगलखोर झाडांच्या आडून दगडफेक करताना दिसून येतात. या व्हीडिओत फायरिंगचा आवाजही स्पष्टपणे ऐकू येतो.
5 ते 6 पोलीस कर्मचारी आपल्या एका सहकाऱ्याला घेऊन जाताना दिसतात.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी हा दुसरा व्हीडिओ ट्वीट केला आहे. कपिल मिश्रा यांच्यावर हिंसा पसरवण्याचा आरोप आहे.
व्हीडिओ ट्वीट करताना त्यांनी लिहिलंय, "जखमी डीएसपी अमित शर्मा यांना पोलीस कर्मचारी उचलून नेत आहेत. हल्लेखोर चवताळल्यासारखे दगडफेक करत आहेत. याच जमावानं यापूर्वी रतनलाल यांची हत्या केली आहे."
दिल्ली पोलीस काय म्हणतात?
ANI या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या या व्हीडिओत जखमी सहाय्यक पोलीस आयुक्त अनुज कुमार यांना दाखवलं आहे.
हा व्हीडिओ 24 फेब्रुवारीचा आहे. या दिवशी वझिराबादच्या मुख्य रस्त्यावर जमाव आला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्ही साहेबांना यमुना विहारकडे घेऊन गेलो. त्यावेळचा हा व्हीडिओ आहे.
रतनलाल यांच्याविषयी त्यांनी सांगितलं, "ते याच ठिकाणी आधी जखमी झाले होते. त्यांना मोहन नर्सिंग होममध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं.
डीएसपी साहेबांसाठी मी आणि दोन जण परत गेलो होतो. जमाव डीसीपी साहेबांना मारण्यासाठी येत आहे, हे आम्हाला दिसत होतं. दुभाजकाजवळ ते होते. त्यांच्या तोंडातून रक्त येत होतं. जमाव हिंसक होत होता. यमुनाविहारचा भाग आम्हाला तेव्हा सुरक्षित वाटला.
साहेबांना जमावाच्या हातातून सोडवणं आणि सुरक्षित स्थळी नेणं, हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता आणि आम्ही तसंच केलं. यानंतर जमावानं दवाखान्याला घेराव घातला, पण आम्ही कसंबसं तिथून बाहेर पडलो."
बीबीसीला पोलिसांनी काय सांगितलं?
हा व्हीडिओ दाखवत बीबीसीनं एका पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली.
नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं, "हा व्हीडिओ चांदबागमधील मुख्य रस्त्यावरील आहे. याच ठिकाणी रतनलाल यांच्यावर हल्ला झाला होता. ते डीसीपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असं पोलिसांमधील सुत्रांचं म्हणणं आहे. गोकुळपुरीचे एसीपीसुद्धा इथं जखमी झाले होते."
या ठिकाणी एकूण 5 व्हीडिओ मिळाले आहेत. सध्या या सगळ्या व्हीडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
ईशान्य दिल्लीत हिंसा - कधी काय घडलं?
ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शन सुरू होतं. 24 फेब्रुवारीला या निदर्शनाला हिंसक वळण लागलं.
यामध्ये आतापर्यंत 49 जणांना जीव गमवावा लागला. अनेकांवर उपचार सुरू आहेत. दिल्ली पोलिसमधील हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला आहे आणि इतर पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
हिंसाचारात अनेक व्हीडिओ असे समोर आले आहेत, ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंसाचाराच्या दिवसांत पोलीस दल रस्त्यांवर कमी प्रमाणात दिसून आलं, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: म्हटलं होतं.
रविवार, 23 फेब्रुवारी
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात दिल्लीतल्या शाहीनबाग, जाफराबाद, चांद बाग, खजूरी खास, वजिराबाद आणि यमुना विहारमध्ये निदर्शन सुरू होते.
शनिवार-रविवारी रात्री जाफराबाद येथील निदर्शक मेट्रो स्टेशनच्या खालच्या भागात बसले. त्यानंतर रविवार दुपारपर्यंत काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते.
सोमवार, 24 फेब्रुवारी
सोमवारी सकाळी परिस्थिती अधिकच बिघडली. सकाळी 7 वाजता मौजपूर चौकात काही जण नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनासाठी एकत्र आले. यानंतर या ठिकाणापासून 200 मीटर अंतरावर कबीर नगर भागात काही जण नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले. साडेदहा वाजता मौजपूर चौक आणि कबीर नगर मधल्या निदर्शकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. दुपारी 1 वाजेपर्यंत दगडफेक सुरू होती.
मंगळवार, 25 फेब्रुवारी
मंगळवारी ईशान्य दिल्लीत तणावाचं वातावरण होतं. पोलीस, RAF आणि SSB यांनी अनेक ठिकाणी फ्लॅग मार्च काढला. यापूर्वी हिंसाग्रस्त भागात पोलीस दिसत नव्हते, ते आता दिसायला लागले. त्यानंतर खजूरी खास भागात दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, नंतर पोलिसांनी अश्रुधूराचा मारा केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)