You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही- छगन भुजबळ, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही : छगन भुजबळ
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विषयी बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय की, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मी सुद्धा जन्माचा दाखला देऊ शकत नाही. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
"आसाममध्ये मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदूंना नागरिकत्व सिद्ध करता आले नाही. मला जर विचारलं की तुमच्या आई-वडिलांचा जन्म दाखला दाखवा, तर ते मी देऊ शकत नाही. तसंच माझ्याकडेसुद्धा खरा जन्म दाखला नसून, घरच्यांनी जबरदस्तीनं शाळेत टाकलं आणि तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी माझी जन्म तारीख स्वत:च्या मनाने टाकून दिली. त्याच्यापलीकडे काहीच नाही," असं भुजबळ म्हणाले यांनी म्हटलंय. ते मुंबईत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे CAA बाबत बोलले असतील, पण त्यांनी NRCला पाठिंबा दिला नाही. आमच्या पक्षाचा मात्र या तिन्ही गोष्टींना विरोध आहे. आदिवासी भागातील नागरिकांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तर अनेक समाजातील लोक भटकंती करत असतात. त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्रे कुठून येणार?"
2. 'मोदी सरकारने राजकारणावरच भर दिल्याने घसरला अर्थव्यवस्थेचा आलेख'
मोदी सरकारनं फक्त राजकारणावर भर दिल्यानं अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला आहे अशी टीका आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
"लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मोदी सरकारनं राजकीय अजेंडा राबवण्यावर जास्त भर दिला. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी सोशल अजेंड्याला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला फक्त राजकारणात रस आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ढासळण्यात होतो आहे, " असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.
3. बोन्सायमध्ये जगातील पहिली डॉक्टरेट मराठी महिलेची
बोन्सायमध्ये जगातील पहिली डॉक्टरेट मिळवण्याचा मान पुण्यातील प्राजक्ता काळेंना प्राप्त झाला आहे, सकाळनं ही बातमी दिली आहे.
फ्रान्समधल्या पॅरिसमधील युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून काळेंना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.
बोन्साय कलेच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. आज इंडोनेशिया, तैवान, चीन, जपान, बेल्जियम, इटली या देशांमध्ये बोन्सायकडे केवळ एक कला म्हणून न पाहता एक व्यवयाय म्हणून पाहिले जात आहे. भारतात मात्र अशी स्थिती नाही. त्यामुळे एक व्यवसायनिर्मिती क्षेत्र म्हणून याचा विचार व्हावा, असं त्यांनी यावेळी म्हटलं.
4. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
महाविकास आघाडी सरकारनं शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत 22 लाख शेतकर्यांचा समावेश आहे. झी न्यूजनं ही बातमी दिली आहे.
दुसऱ्या यादीत राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांची नावं आहेत. तर 6 जिल्ह्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.
यापूर्वी सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारीला 15 हजार 558 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती.
दरम्यान, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे अवकाळी पावसाचे संकट बळीराजाच्या दारात उभे ठाकले आहे.
5. तृप्ती देसाईंची इंदुरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना तृप्ती देसाईंनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. महिलांचा अपमान केल्याबाबत इंदोरीकरांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी देसाईंनी केली आहे. दहा दिवसात जाहीर माफी त्यांनी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
"महिलांचा वारंवार अपमान करणारे इंदुरीकर यांनी महिलांचा अपमान केल्याबाबत कोणतीही जाहीर माफी मागितलेली नाही. तसंच अशी वक्तव्यं मी पुढे कीर्तनात करणार नाही, असं कोणत्याही पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी जाहीर केलेलं नाही. त्यांच्यावर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे माझी बदनामी आणि चारित्र्यहनन गेले आठ दिवस सुरु आहे. जीवे मारण्याच्या धमक्याही मला येत आहेत," असं तृप्ती देसाईंनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल, चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल, असं विधान केल्याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)