सावरकर महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी येत आहेत का?

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी भाजपकडून विधानसभेत करण्यात आली. पण, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तो प्रस्ताव कामकाजात बसत नाही असं म्हणत फेटाळून लावला आहे.

त्यानंतर विरोधी पक्षानं सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. राज्य सरकारनं 2 ओळींचा प्रस्ताव मांडावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.

त्यावर उपमपुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपनं सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. आम्ही तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असं म्हटलं.

प्रस्ताव मांडण्याची मागणी करतेवेळी देवेंद्र फडणवीसांनी 'शिदोरी' मासिकात छापून आलेला मजकूर वाचून दाखवताच, विरोधी पक्षांकडून सावरकरांचा अपमान केला जात असल्याचा मुद्दा जंयत पाटील यांनी उपस्थित केला.

संसदीय कामकाज मंत्री अनील परब यांनी "नितेश राणे यांना हा प्रस्ताव मांडायला सांगा, तसंच आधी भारतरत्न द्या मग आम्ही तुम्हाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही मांडतो," असं यावर सभागृहात म्हटलं आहे.

"स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसच्या मुखपत्रात हीन दर्जाचं लेखन झाल्यानंतरही शिवसेना एकही शब्द बोलण्याची हिंमत करणार नसली, तरी भाजप सहन करणार नाही. 26 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या विधिमंडळात सावरकरांचा गौरव झाला पाहिजे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

भाजपसोबतचा तीस वर्षांचा घरोबा तोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शक्य तिथं शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपनं आटापिटा सुरू केलेला दिसून येतो.

शिवसेनेच्या मनिषा कायंदे याबाबत म्हणतात, "भाजप सध्या वैफल्यग्रस्त झालाय. त्यांचा पाय चिखलात अडकल्यानं चिखलफेक करतायत."

"सावरकरांबद्दल भाजपला इतकंच प्रेम असेल, तर 'भारतरत्न' जाहीर करावं. केंद्रात भाजपकडे पूर्ण सत्ता आहे. ती हिंमत तर भाजपकडे नाहीय. त्यामुळं मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न करतायत. भाजपचंच सावरकरप्रेम बेगडी आहे," असंही कायंदे म्हणतात.

शिवसेना आपल्या परीनं भाजपला उत्तर देत असलं, तरी शिवसेना सत्तेत काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेसची सावरकरांबाबतची भूमिका पूर्णपणे पाठिंब्याची राहिली नाहीय. त्यामुळं अशा पक्षासोबत सत्तेत बसताना शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागतेय, हे उघड आहे.

आता अधिवेशनातही सावरकरांचा मुद्दा उपस्थित होणार असल्यानं, 'सावरकर महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी का आलेत?' हा प्रश्न उपस्थित होणं सहाजिक आहे. या प्रश्नाचं बीबीसी मराठीनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.

याबाबत लेखक वैभव पुरंदरे म्हणतात, "महाराष्ट्रात सावरकरांची प्रतिमा 'स्वातंत्र्यवीर' अशी आहे. राज्यातील बहुतांश लोकांना सावरकर मान्य आहेत. त्यामुळं त्यांचा राजकीय वापर केला जात असावा."

वैभव पुरंदरे हे 'सावरकर : द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ द नेशन' या इंग्रजी पुस्तकाचे लेखक आहेत.

ते पुढं म्हणतात, "राजकारणात आता अधिकाधिक सावरकरांचा मुद्दा शिवसेनेमुळं येत असावा. याचं कारण शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेत आहे. काँग्रेसची भूमिका सावरकरवादी नाहीय. त्यामुळं शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी याहून मोठी गोष्ट काय असू शकते?"

मात्र, राजकीय विश्लेषक नितीन बिरमल यांच्या मते, शिवसेना किंवा महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा तितकासा प्रभावी ठरणार नाही.

शरद पवारांची सावरकरांवरील भूमिकेची जोड नितीन बिरमल हे त्यांच्या या दाव्याला देतात. ते म्हणतात, "शरद पवार सावरकरांबद्दल भूमिका घेतात की, 'आम्हाला विज्ञानवादी मान्य आहेत, तुम्हाला ते मान्य आहेत का?' आता अशी भूमिका महाविकास आघाडीनं घेतल्यास भाजप काय करणार आहे?"

सावरकरांच्या राजकीय वापराबाबत नितीन बिरमल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं मांडणी करतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला गेला. त्याच धर्तीवर सावरकरांचा वापर होऊ पाहतोय का, अशी शंका घेण्यास सद्यस्थिती वाव मिळतो. नितीन बिरमल या शंकेशी तत्वत: सहमत होत, थोडी विस्तृत मांडणी करतात.

बिरमल म्हणतात, "आक्रमक हिंदुत्त्ववादी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वापरली गेली. मात्र, नंतर शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी नसल्याचं महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी प्रभावीपणे मांडलं. त्यामुळं आता शिवाजी महाराजांची तशी प्रतिमा मांडता येत नाही. त्यामुळं आता मुस्लीमविरोधी प्रतिक म्हणून सावरकरांकडे पाहिलं जातंय."

मात्र, ते पुढे सांगतात, "खरंतर सावरकर त्या अर्थानं हिंदुत्ववादी नाहीत. कारण ते टोकाचे विज्ञानवादी होते. पण सावरकरांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान आणि आक्रमक हिंदुत्त्ववादी या दोन गोष्टी राजकारणात नक्कीच उपयोगी पडू शकतात."

छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांबाबत राजकीय मुद्दा म्हणून वापराबाबत नितीन बिरमल आणखी एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, "शिवाजी महाराज हे तळागाळातल्या माणसांशी जोडलेलं नाव आहे. तसं सावरकरांचं नाहीय. महाराष्ट्रात सावरकरवादी नसलात, तर ग्रामीण भागातल्या मतांवर काहीच फरक पडत नाही. मुस्लीम, दलित आणि ओबीसी यांच्यात सावरकर फारसे लोकप्रिय नाहीत. सावरकर उच्च-मध्यमवर्गीय गटात लोकप्रिय आहेत."

दरम्यान, शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं राजकारण सावरकरांभोवती फिरत असताना, त्यात आणखी एक पक्ष सावरकरांना जवळ करून आपली राजकीय विचारधारा स्पष्ट करताना दिसतोय, तो म्हणजे राज ठाकरे यांचा मनसे.

मनसेकडून कोंडी करण्याचे प्रयत्न

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर सरकार स्थापन केल्यावर शिवसेना ज्या मुद्द्यांवर अडचणीत येईल अशा मुद्दयांमध्ये सावरकरांचा मुद्दा सर्वांत मोठा आहे. शिवसेना आजवर ज्या व्यक्तिमत्वाला श्रद्धास्थान म्हणून पूजत आली त्या श्रद्धास्थानाचा मुद्दा भाजप आणि मनसेने वारंवार उचलायचा ठरवलेलं दिसतं.

मनसेने आता आपल्या कार्यक्रमांमध्ये सावरकरांच्या प्रतिमेलाही व्यासपीठावर अग्रक्रमाने ठेवण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. यामधून शिवसेनेने सावरकरांना सोडलं मात्र आम्ही त्यांना शिरोधार्ह मानलं आहे असा मनसे संकेत देत असावी. शिवसेनेला वारंवार अडचणीत आणण्यासाठी मनसे आता स्पष्टपणे हा मुद्दा वापरेल असं दिसतंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)