You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विनायक दामोदर सावरकर म्हणत, 'गाय एक उपयुक्त पशू आहे'
विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे गायीबद्दलचे विचार स्पष्ट करताना नेहमी त्यांच्या 'गाय एक उपयुक्त पशू आहे' या वाक्याचा नेहमीच उल्लेख होतो. गायीबद्दलचे त्यांचे हे सुप्रसिद्ध विधान त्यांच्या 'क्ष किरण' या निबंधातील दुसऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे.
या शीर्षकात सावरकरांनी गाय : एक उपयुक्त पशू, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे असं स्पष्ट म्हटलं आहे. समग्र सावरकर वाड्मयाच्या पाचव्या खंडात हा निबंध समाविष्ट करण्यात आला आहे.
'गोरक्षण आणि गोभक्षण असा भेद ब्रह्मसृष्टीत नाहीच'
ब्रह्मसृष्टीचा पुरस्कार करणाऱ्या लोकांबद्दल सावरकरांनी काही रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्रह्मसृष्टीनुसार सर्वांना अगदी पशूंनाही देवाचे अवतार मानण्यावर त्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत कोरडे ओढले आहेत.
आपण आज कोणत्या काळात राहात आहोत याचीही आठवण त्यांनी या निबंधात करुन दिली आहे. प्रश्न ब्रह्मसृष्टीतला आणि उत्तर आजच्या मायासृष्टीतले असे केल्यास मोठा गोंधळ उडेल याचीही त्यांनी आठवण दिली आहे.
"ब्रह्मसृष्टीत जर गाय आणि गाढव समानच आहेत म्हणून गायीचे पंचगव्य पिण्याच्या संस्काराच्या ठायी असते. मग यज्ञादी धर्मविधीत गाढवीचे पंचगाढव्य ब्राह्मणाने प्यावे की काय?" असा प्रश्न ते विचारतात.
"सुबुद्ध आणि दयाशील आणि प्रामाणिक माणसाच्या डोऴ्यांवर धर्माची झापड पडली, की त्याची बुद्धी भ्रंशते असं ते ठामपणे सांगतात. गोरक्षण आणि गोभक्षण दोन्हीही का केले जाऊ नये? ब्रह्मवादाने या दोन्हीला स्वीकारले आहे. भक्षण आणि रक्षण हा भेदच ब्रह्मसृष्टीत नाही. 'नासतो विद्येत भावः नाभावो विद्यते सतः' ही ब्रह्मसृष्टी. मग गोभक्षण का करु नये," असं ते म्हणतात.
'...तर डुक्कर रक्षण संघ का नको?'
गायीला देव मानून त्याचा अतिरेक केला जातो याबद्दलही सावरकरांनी स्पष्ट विचार मांडले आहेत. गायीत देव आहेत असं पोथ्या सांगतात. आपल्याकडे वराहवतारी देव डुक्कर झाले होते, असंही पोथ्या सांगतात. मग गोरक्षण का करावे? डुक्कर-रक्षण संघ स्थापून डुक्कर पूजा का करु नये? अशी रोखठोक भूमिका ते घेतात.
ज्याअर्थी गोरक्षण, गोपूजा, गोभक्ती या कल्पनाच मुळी मायासृष्टीतल्या आहेत तर त्या स्वीकारणं आणि नाकाराणं हे सुद्धा व्यावहारिक, प्रापंचिक आणि तुलनात्मक विवेकानं होऊ शकतात असं सावरकर म्हणतात.
'गायीला देव मानणं म्हणजे माणुसकीला कमीपणा आणणं'
मायासृष्टीत जोवर मनुष्य आणि गाय-बैल हे पशू आहेत. तोवर मनुष्याने त्याच्याहून सर्व गुणांमधिये हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्याला पशूहून कमी मानण्यासारखे आहे आणि माणुसकीला कमीपणा आणण्यासारखे आहे, असं सावरकरांचं मत होतं.
मनुष्याहून सर्व गुणांमध्ये अत्युच्च असेलल्या प्रतिकासच मनुष्याच्या देवाचे प्रतीक मानणे उचित आहे. पाहिजे तर गाढवाने त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या गाईस देव मानावे, पण मनुष्याने तसे करण्याचा गाढवपण करु नये, असं ते स्पष्ट करतात.
'शेण खाणं ही शिवी आहे, संस्कार नव्हे'
गायीचं शेण आणि मूत्र प्राशन करण्यावर सावरकर अत्यंत कडक शब्दांमध्ये टीका करतात. पंचगव्य प्राशन करणं हा अत्यंत किळसवाणा प्रकार असल्याचं ते सांगतात.
हा प्रकार हिंदूकरणाच्या संस्कारात असता कामा नये, असं ते बजावतात. शेण खाणं ही शिवी आहे, संस्कृती नाही असं सावरकरांनी लिहून ठेवलं आहे. रत्नागिरी हिंदू सभेच्या शुद्धिसंस्कारात पंचगव्य बंद केल्याची आठवणही ते करुन देतात.
गायीला देवता मानणं, गोभक्ती करणं हे भाबडेपणा म्हणून सोडून देता येईल पण एखादा पढतमूर्ख त्याचं वैज्ञानिक बुद्धीवादाने समर्थन करत असेल तरे अक्षम्य आहे असं त्यांचं मत होते.
'विज्ञानाचा पाया पाहिजे'
गोरक्षणाची चळवळ धार्मिक आणि भाकडपणाच्या आधारावर न चालवता सुस्पष्ट आणि प्रयोगक्षम अशा आर्थिक आणि वैज्ञानिक पायावर चालवावी असं सावकरांचं मत होतं.
उगाच एखादी गाय वा बैल, देव वा देवी म्हणून गावोगाव हिंडवीत भीक मागतात तशांना एक दमडीही कोण देऊ नये, त्या बैलाला कामास जुपवावा आणि त्या भीकमाग्या गोभक्ताला राष्ट्रासाठी वेठीस धरावा, असं सावरकर या निबंधात सांगतात.
'भूमातेस कवितेत सावरकर काय म्हणतात?'
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'भूमातेस' या कवितेमध्येही गायीला देव मानण्यामुळे सगळा देशच गाय झाला, अशी भूमिका मांडली आहे. याबद्दल बोलताना सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "देवासाठी प्रतीकं पशूंमधून निवडायचीच होती तर गायीऐवजी नरसिंहाला तरी निवडायला हवं होतं अशी खंत ते व्यक्त करतात."
त्राता देव नृसिंह सोडुनी पुजूं गाईसची जाय मीवाघाच्या पुढती म्हणुनी बनले गायीहुनी गाय मी
अशी काव्यरचना त्यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीरांनी गोरक्षाबद्दल इतके स्पष्ट विचार मांडले असले तरी उगाच गायीला मारा असं सांगितलेलं नाही याची आठवण रणजित सावरकर करुन देतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)