You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Corona Virus: कोलकात्यात काहींचे व्यापार तेजीत तर काही मंदावले
- Author, प्रभाकर मणी तिवारी
- Role, कोलकात्याहून बीबीसी हिंदीसाठी
"या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आमच्या रेस्टॉरंटमध्ये खासकरून संध्याकाळी उभं राहायला जागा नसायची. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून गिऱ्हाईकच नाही."
पूर्व कोलकात्यातल्या टेंगरा भागत असलेल्या देशातल्या सर्वांत मोठ्या चायना टाऊनमध्ये गेल्या तीन दशकांपासून रेस्टॉरंट चालवणारे पीटर चेन आपली व्यथा सांगत होते.
ते म्हणाले, "कोरोना विषाणुच्या दहशतीमुळे खादाडीची आवड असणाऱ्यांनी चायना टाऊनमधल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटकडे पाठ फिरवली आहे. मात्र, चीनशी आमचा कुठलाच थेट संपर्क नाही. आम्ही तिथली कुठलीच वस्तू वापरत नाही. या भागातल्या कुठल्याच व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. आमचं मोठं नुकसान झालं आहे."
चीनच्या वुहान शहरापासून जवळपास 2700 किमी दूर असलेल्या या चायना टाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी असायची.
इथल्या रेस्टॉरंट्समध्ये चीनी पदार्थ्यांची आवड असणाऱ्यांची भाऊगर्दी असायची. मात्र आता इथे शुकशुकाट आहे.
ग्राहकांची संख्या निम्म्यावर
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने या भागातल्या तीन डझनहून जास्त रेस्टॉरंटमध्ये गिऱ्हाईक दिसत नाही.
इथले काही रेस्टॉरंट तर इतके प्रसिद्ध आहे की लोक तासनतास रांगा लावून उभे असतात.
मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून या हॉटेल मालकांचं मोठं नुकसान होतंय. इथे कोरोना विषाणूची बाधा झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही.
कोलकात्यातल्या या चायना टाउनमध्ये जवळपास अडीच हजार लोक राहतात. मात्र, इथे राहणाऱ्या कुटुंबांचा आता चीनशी कुठलाच थेट संबंध नाही. इथले बहुतांश तरुण आता परदेशात स्थायिक झाले आहेत.
असं असूनही कोलकात्यातल्या लोकांमध्ये चीनी पदार्थ आणि या चायना टाउनची भीती आहे.
सगळीकडे शुकशुकाट
एका हॉटेलचे मालक मॅथ्यू चेन सांगतात, "दोन आठवड्यांमध्ये आमच्या ग्राहकांची संख्या 60 टक्क्यांनी घसरली आहे. आम्हाला रोज मोठं नुकसान सोसावं लागतंय."
चायना टाउनच्या प्रवेशद्वाराजवळ बिग बॉस आणि किम लिंग अशी दोन प्रसिद्ध आणि मोठी हॉटेल्स आहेत. विकेंडला इथे तोबा गर्दी असायची.
मात्र, आता या हॉटेल्समध्येही शुकशुकाट दिसतो. लंच असो किंवा डिनर इथे आल्यावर जवळपास तासभर तरी वाट बघावीच लागते, इतकी गर्दी इथे असायची.
एका ढोबळ अंदाजानुसार इथल्या प्रत्येक रेस्टॉरंटचं विकेंडला चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान होतंय.
चेन सांगतात, "इथे वर्षभर गर्दी असते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान गर्दी वाढते. या काळात वातावरण थंड असतं. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा या भागातल्या हॉटेल्समध्ये इतका शुकशुकाट पाहतोय."
कच्चा माल आणि मसाले कुठून येतात?
एका रेस्टॉरंटचे मालक एस. चांग सांगतात, "फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच नेहमी येणाऱ्या ग्राहकांचे फोन येऊ लागले होते. इथे आल्यावर कोरोनाची बाधा होण्याचा धोका तर नाही ना, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं."
चांग सांगतात की त्यांनी आपल्या ग्राहकांना सांगितलं की या मार्केटचा चीनशी संबंध नाही आणि सगळा कच्चा माल आणि मसाले स्थानिक बाजारातूनच आणले जातात.
असं सांगूनही ग्राहकांचा विश्वास बसत नाही. आणखी एका रेस्टॉरंटच्या मालकीन मोनिका लिउ यांचंही हेच म्हणणं आहे.
चायनीज इंडियन सोसायटीचे अध्यक्ष बीन चिंग म्हणतात, "अनेक सुशिक्षित लोकही कोरोना विषाणूविषयी साशंक आहेत. मात्र, चीनशी संबंधच नसल्याने इथे कुठल्याच प्रकारचा धोका नाही. आतापर्यंत कुठल्याच व्यक्तीला संसर्ग झालेला नाही."
विकेंडवर आपल्या कुटुंबासोबत चायना टाऊनला जाणारे दीपक गांगुली यांनी सध्या सवयीला मुरड घातली आहे.
एका खाजगी कंपनीत जनरल मॅनेजर पदावर असणारे दीपक सांगतात, "जान है तो जहान है. चीनी पदार्थ कधीही मिळतील. मात्र, कोरोनाचा संसर्ग झाला तर जीवच वाचणार नाही."
फायदा कुणाला?
चायना टाउनमधला हा शुकशुकाट शहरातल्या इतर चीयनीज हॉटेल्ससाठी वरदान ठरतोय.
तिथे जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत विक्री वाढली आहे.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इस्टर्न इंडियाचे अध्यक्ष सुरेश पोद्दार आकडेवारी देत सांगतात, "गेल्या काही दिवसात ग्राहकांची संख्या वाढली आहे. चायना टाउनला जाणारे लोक आता इकडे वळले आहेत."
पोद्दार यांचंही कोलकात्याच्या मध्यवर्ती भागात एक चायनीज रेस्टॉरंट आहे.
ते म्हणतात, "बहुतांश चायनीज रेस्टॉरंटमध्ये स्थानिक कच्चा मालच वापरला जातो. मात्र, चीनवरून मागवण्यात येणाऱ्या काही सॉसबद्दल ग्राहकांमध्ये साशंकता आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)