अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे दलित विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्याबद्दल या गोष्टी माहितीये?

    • Author, नीरज प्रियदर्शी
    • Role, पाटण्याहून, बीबीसी हिंदीसाठी

अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले होते की 'राम मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात येईल त्यात भाजप सहभागी होणार नाही. म्हणजे भाजपचा कुठलाही नेता या ट्रस्टमध्ये नसेल.'

9 फेब्रुवारी 2020 पर्यंत ट्रस्ट स्थापन करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार 9 तारखेपूर्वी म्हणजे बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेला सांगितलं, "श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये 15 विश्वस्त असतील आणि यातील एक विश्वस्त कायम दलित समाजातून असेल. सामाजिक सलोखा दृढ करणाऱ्या अशा अभूतपूर्व निर्णयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो."

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या 15 सदस्यांविषयी सांगितलं त्यापैकी एक दलित सदस्य बिहारचे कामेश्वर चौपाल आहेत.

कोण आहेत कामेश्वर चौपाल?

कामेश्वर चौपाल बिहार भाजपमधले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी 2014 साली भाजपच्या तिकिटावरून सुपौल लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती.

कामेश्वर चौपाल यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात राम जन्मभूमी आंदोलनातून झाली. त्यानंतर ते विश्व हिंदू परिषदेचे बिहार प्रांताचे संघटन महामंत्री बनले आणि मग तिथून पुढे त्यांचा भाजप प्रवास सुरू झाला.

9 नोव्हेंबर 1989 रोजी अयोध्येत राम मंदिर पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचं नाव सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आलं.

देशातील कानाकोपऱ्यातून आलेले हजारो साधू-संत आणि लाखो कारसेवक कार्यक्रमाची तयारी करत होते. पायाभरणी कार्यक्रमात पहिली वीट ठेवली ती कामेश्वर चौपाल यांनी.

'पहिली वीट रचणारे'

बीबीसीशी बोलताना चौपाल म्हणाले, "पायाभरणी कार्यक्रमाआधी कुंभ मेळा सुरू होता. त्या मेळ्यातच साधू-संत आणि धर्मगुरूंनी एकत्र येऊन ठरवलं होतं की दलित समाजातील व्यक्तीकडूनच पहिली वीट ठेवण्यात यावी. मी कारसेवक म्हणून त्या कार्यक्रमात तर होतोच शिवाय विश्व हिंदू परिषदेचा बिहारचा संघटन मंत्री म्हणूनही तिथे उपस्थित होतो. योगायोगाने धर्मगुरुंनी पहिली वीट ठेवण्यासाठी मलाच आमंत्रित केलं."

कामेश्वर चौपाल सांगतात की 1984 साली ते विश्व हिंदू परिषदेत सामिल झाले. त्याच वर्षी राम मंदिर उभारण्यासाठी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये विहिंपने एक संमेलन आयोजित केलं होतं. या संमेलनात शेकडो संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मगुरू सहभागी झाले होते. कामेश्वर चौपाल हेदेखील बिहारतर्फे भाग घेण्यासाठी गेले होते.

ते सांगतात, "राम मंदिरासाठी एक जनजागृती अभियान सुरू करावं, असं त्या संमेलनात ठरवण्यात आलं. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष गोरक्षपीठाचे तत्कालीन पीठाधीश्वर महंत के. अवैद्य नाथ होते. जनजागृतीची सुरुवात मिथिलांचलपासून झाली. याचं कारण म्हणजे तेव्हा त्या लोकांना वाटलं की सीता रामाची शक्ती आहे. त्यामुळे सीतेचं जन्मस्थान असलेल्या जनकपुरीहून रथयात्रा सुरू करावी."

"राम जन्मभूमी संघर्ष समिती देशभरात जनजागृती कार्यक्रम आयोजित करायची. पहिला संघर्ष होता राम-जानकी यात्रा. मी या यात्रेचा प्रभारी होतो. 1 फेब्रुवारी 1986 रोजी राम जन्मभूमीचं टाळं उघडलं. हाही याच यात्रेचा परिणाम होता. कोर्टाच्या आदेशानंतर टाळं उघडलं असलं तरी त्यात आमच्या यात्रेचा मोठा प्रभाव होता."

'अडवाणींपेक्षा वेगळी होती विहिंपची रथयात्रा'

राम जन्मभूमी आंदोलनात लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचाही फार उल्लेख होतो. लालू प्रसाद यादव यांच्या तत्कालीन बिहार सरकारने ही यात्रा पाटण्यात थांबवली होती. मात्र, अडवाणी यांची रथयात्रा आणि विहिंपची रथयात्रा वेगवेगळ्या होत्या.

चौपाल सांगतात, "अडवाणी यांची रथयात्रा पायाभरणी कार्यक्रमानंतर सुरू झाली होती. त्याआधीच आम्ही (विहिंप) राम-जानकी यात्रेच्या माध्यमातून अनेक रथयात्रा काढल्या होत्या. अडवाणीजी यांनी दिल्लीच्या पालममधून रथयात्रेची सुरुवात आमच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी केली होती. ते ओडिसामार्गे बिहारला आले. त्यावेळी मी विहिंपचा प्रदेश संघटन मंत्री होतो. या नात्याने मी समस्तीपूरपर्यंत अडवाणींसोबतही होतो."

बिहारमधल्या सुपौल जिल्ह्यातलं कमरैल हे कामेश्वर चौपाल यांचं मूळ गाव. हा संपूर्ण भाग कोसीचा आहे.

ते सांगतात, "मी लहान असताना आमचं घर भागलपूर जिल्ह्यात यायचं. त्यानंतर सहरसा जिल्ह्यात गेलं आणि आता सुपौल जिल्ह्यात आहे. मात्र, आमचा भाग दरवर्षी कोसीचं तांडव भोगतो."

कामेश्वर चौपाल यांचं शिक्षण

24 एप्रिल 1956 रोजी कामेश्वर चौपाल यांचा जन्म झाला. मधुबनीच्या जेएनयू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर दरभंगा इथल्या मिथिला विद्यापीठातून 1985 साली ते एमए झाले.

बिहारचा चौपाल समाज अनुसूचित जाती श्रेणीत येतो. सामान्यपणे हा मागास आणि गरीब समाज मानला जातो.

कामेश्वर स्वतः सांगतात, "बालपण गरिबीत गेलं. कोसीच्या पुराचं संकट दरवर्षी यायचं. अशा परिस्थितीत लहानाचा मोठा झालो. वडील धार्मिक होते. आमचं कुटुंब पूर्वीही वैष्णव होतं. आताही वैष्णव आहे."

राम मंदिर आंदोलनात सहभागी होण्याविषयी ते सांगतात, "आम्ही मिथिलाचे आहोत. बालवयातच आमच्यात ही भावना येते की जगासाठी राम भगवान असले तरी आमच्यासाठी ते पाहुणे (जावई) आहेत. माझी आई रोज सकाळ-संध्याकाळ तिच्या मातृभाषेत रामाची गाणी गुणगुणायची. विद्यार्थी असताना संघाशी नातं जडलं. अशाप्रकारे घरापासून महाविद्यालयापर्यंत हिंदुत्व आणि हिंदू संस्कृतीच्या वातावरणातच वाढलो आणि या आंदोलनात सहभागी झालो."

राम मंदिरासाठी मोदी सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टवरूनही नाराजी व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशचे आमचे सहकारी समिरात्मज मिश्र सांगतात की महंत परमहंसदास धरणं आंदोलन करत आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या संतांनाही ट्रस्टमध्ये स्थान मिळावं, अशी त्यांची मागणी आहे.

ट्रस्टचे विश्वस् झाल्याबद्दल काय म्हणतात चौपाल?

ट्रस्टमध्ये एक दलित सदस्य म्हणून सहभागी होण्यावर चौपाल म्हणतात, "देशाची लोकसंख्या जवळपास दीड अब्ज आहे. हजारो जाती आहेत. जातीच्या आधारे सर्वांची निवड करायची म्हटलं तर अवघड होईल. माझ्या मते मोदी सरकारने ट्रस्टमध्ये त्यांनाच सामिल करून घेतलं आहे ज्यांना संत परंपरा, हिंदू धर्म आणि हिंदुत्वाप्रती आस्था आहे."

ते पुढे सांगतात, "सबका साथ, सबका विकास, हा भाजपचा संकल्प आहे. शिवाय विश्वस्तांमध्ये मला सहभागी करून घेतलं याचा अर्थ एका दलित व्यक्तीला सामिल करून घेतलं, एवढाच घेता कामा नये. मी खूप आधीपासून या आंदोलनाचा भाग आहे. माझी महत्त्वाकांक्षा होती की ज्याची पायाभरणी केली ते मंदिर माझ्या डोळ्यासमोर उभं झालं पाहिजे. ट्रस्टचे सर्वच विश्वत चांगले आहेत. मी या ट्रस्टचा भाग आहे, हे चांगलंच आहे. नसतो तर आणखी बरं झालं असतं. इतकी चर्चा झाली नसती. "

ट्रस्टमध्ये सामिल करून घेण्याविषयी आपल्याशी कुणी चर्चा केली नव्हती, असं कामेश्वर चौपाल सांगतात.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतरच आपल्याला कळाल्याचं ते सांगतात आणि आता लवकरात लवकर राम मंदिर उभं रहावं, अशी त्यांची इच्छा आहे.

कामेश्वर चौपाल स्वतः एक राजकारणी असल्यामुळे त्यांना ट्रस्टमध्ये सहभागी करून घेण्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.

पायाभरणी कार्यक्रमानंतर ते चर्चेत आले. त्यानंतर भाजपने त्यांना अधिकृतपणे पक्षात सामिल करून घेतलं होतं. त्यांची लोकप्रियता बघून 1991 साली रोसडा या भाजपच्या हक्काच्या लोकसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत चौपाल यांचा पराभव झाला होता.

1995 साली ते बेगुसराय मतदारसंघातूनही निवडणूक लढले. मात्र, तिथेही त्यांचा पराभव झाला. 2002 साली ते बिहार विधान परिषदेवर निवडून गेले. 2014 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते.

2009 सालच्या भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचारात ते स्टार कॅम्पेनर होते. त्या निवडणुकीत कामेश्वर चौपाल यांनी नारा दिला 'रोटी के साथ राम'.

2014 साली भाजपने कामेश्वर चौपाल यांना सुपौल लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, ते त्यांचा गृहजिल्ह्या असलेल्या सुपौलमधूनही निवडणूक हरले. त्यानंतर चौपाल यांची राजकीय सक्रीयता जरा कमी झाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र किशोर सांगतात, "हे भाजपचं दलित कार्ड असू शकतं. ते राम मंदिर आंदोलनात सक्रीय होते, यात दुमत नाही. मात्र, गेल्या काही वर्षात लोकांना त्यांचा विसर पडला आहे. मात्र, पुन्हा एकदा दलित चेहऱ्याच्या नावाखाली त्यांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सहाजिकच याचा फायदा भाजपला होईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)