राम मंदिर भूमिपूजनाचं आयोजन करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कोण आहेत?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला होतं.

राम मंदिर भूमिपूजनाचा आज (5 ऑगस्ट) झालेला कार्यक्रम राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेच आयोजित केला होता. या ट्रस्टमध्ये नेमके कोणते लोक आहेत? याचा आढावा आम्ही घेतला आहे.

रामलल्लाच्या बाजूने खटला लढविणारे ज्येष्ठ वकील के. परासरन यांच्याव्यतिरिक्त धार्मिक क्षेत्रातील पाच महत्त्वाच्या व्यक्तींना या ट्रस्टमध्ये सहभागी करून घेण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधले दोन तर केंद्र सरकारमधला एक असे तीन सरकारी प्रतिनिधी या ट्रस्टचे विश्वस्त आहेत. याशिवाय राम मंदिर आंदोलनाशी संबंधित काही व्यक्तींनाही या ट्रस्टमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे.

15 सदस्यीय श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कोणकोण आहेत?

  • के. परासरन (रामललाचे वकील)
  • जगतगुरू शंकराचार्य ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज (प्रयागराज)
  • जगतगुरू माधवाचार्य स्वामी स्वामी विश्वप्रसन्न तीर्थजी महाराज (पेजावर मठ, उडुपी)
  • युगपुरूष परमानंदजी महाराज (हरिद्वार)
  • स्वामी गोविंददेव गुरूजी महाराज (पुणे)
  • महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा, अयोध्या बैठक)
  • विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या)
  • अनिल मिश्र (होमियोपॅथी डॉक्टर, अयोध्या)
  • कामेश्वर चौपाल (अनुसूचित जातीचे सदस्य, पाटणा)

- याशिवाय ट्रस्ट बोर्डाचे विश्वस्त बहुमताने दोन प्रमुख व्यक्तींची नियुक्ती करतील जे हिंदू धर्म मानणारे असतील.

- विश्वस्तांमध्ये एक प्रतिनिधी केंद्र सरकारचाही असेल. केंद्राचा प्रतिनिधी आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी असेल. त्यांचा दर्जा जॉइंट सेक्रेटरीपेक्षा कमी नसेल. केंद्राचे हे प्रतिनिधी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य असतील.

- ट्रस्टमध्ये उत्तर प्रदेश सरकारचेही दोन प्रतिनिधी असतील. एक प्रतिनिधी राज्य सरकारचे सचिव किंवा त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरील आयएएस अधिकारी असतील, तर दुसरे अयोध्येचे जिल्हाधिकारी असतील.

- केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचे तिन्ही पदाधिकारी या ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य असतील. याशिवाय हे तिन्ही सदस्य हिंदू धर्म मानणारे असावेत, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

- अयोध्येचे जिल्हाधिकारी हिंदू नसतील तर जिल्ह्याचे हिंदू अतिरिक्त आयुक्त या ट्रस्टचे विश्वस्त असतील.

- राम मंदिर परिसराचा विकास आणि प्रशासनाशी संबंधित समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती ट्रस्ट करेल. अध्यक्षपदावरील व्यक्ती न्यासाचे पदसिद्ध सदस्यही असतील.

ट्रस्टचे हे विश्वस्त तुम्हाला माहीत आहेत?

1. के. परासरन

रामलल्ला विराजमानतर्फे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील के. परासरन यांनी बाजू मांडली होती. ते 93 वर्षांचे आहेत आणि आपल्या तरुण सहकाऱ्यांसोबत ते न्यायालयात रामाची बाजू मांडत होते.

9 ऑक्टोबर 1927 रोजी तामिळनाडुतील श्रीरंगममध्ये जन्मलेले परासरन तामिळनाडूचे अॅडव्होकेट जनरल होते. तसंच भारताचे अॅटर्नी जनरलही होते.

याशिवाय 2012 ते 2018 या काळात राज्यसभेचे सदस्यही होते. परासरन यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं आहे.

2. दिनेंद्र दास

निर्मोही आखाड्याचे अयोध्या बैठकीचे प्रमुख महंत दिनेंद्र दास बाबरी मशीद खटल्यात पक्षकार होते.

राम मंदिर उभारण्याच्या नावाखाली विश्व हिंदू परिषदेने ज्या विटा, शिळा आणि रोख जमवली आहे ते सरकारला सुपूर्द करावे, अशा मताचे ते आहेत.

3. विमलेंद्र मोहन मिश्र

अयोध्येच्या माजी राजघराण्याचे सदस्य विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांनी अयोध्येत येणाऱ्या कोरियन राजघराण्यातील लोकांचं आदरातिथ्य केलं आहे.

त्यांनी बहुजन समाज पक्षाकडून निवडणूकही लढवली होती. मात्र, सध्या ते सक्रीय राजकारणापासून लांब आहेत.

4. कामेश्वर चौपाल

ट्रस्टचे दलित विश्वस्त म्हणून कामेश्वर चौपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1989 च्या राम मंदिर आंदोलनादरम्यान झालेल्या शिलान्यास कार्यक्रमात त्यांनी पायाभरणी केल्याचं म्हटलं जातं.

कामेश्वर चौपाल यांनी भाजपच्या तिकीटावरून बिहारमधल्या रोसडा आणि सुपोल लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवली होती.

मीडिया रिपोर्टनुसार संघाने त्यांना पूर्वी कारसेवकाचा दर्जा दिला होता.

5. डॉ. अनिल मिश्र

व्यवसायाने होमियोपॅथी डॉक्टर असलेले डॉ. अनिल मिश्र सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अवध प्रांताचे कार्यवाहक आहेत.

आंबेडकर नगरचे रहिवासी डॉ. अनिल मिश्र गेल्या चार दशकांपेक्षा जास्त काळापासून संघाशी जोडले गेले आहेत, असंही सांगितलं जातं.

राम जन्मभूमी आंदोलनात ते बरेच सक्रीय होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)