हिंगणघाट : बाईने दिलेला नकार पुरुष का पचवू शकत नाहीत?

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

जानेमन जानेजा, तेरी ना मे हैं हा... तू हा कर, या ना कर, तू है मेरी किरण.. इथपासून 'नो मीन्स नो' असा प्रवास आपल्या सिनेमांनी केला खरा. कबीर सिंग आला त्याच बॉलिवूडमध्ये तापसी पन्नूचा थप्पडही आला, पण एक समाज म्हणून आपण अजूनही बाईचा नकार पचवण्याच्या पातळीपर्यंत आलेलो नाही.

नाहीतर हिंगणघाटसारख्या घटना घडल्याच नसत्या. एकतर्फी पुरुषी वर्चस्वाच्या भावनेतून (याला प्रेम म्हणणं अशक्य आहे) समोरच्या स्त्रीवर हल्ला करण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. नव्वदच्या दशकात रिंकू पाटील हत्याकांड गाजलं होतं, सोळा वर्षांच्या एका मुलीला परीक्षा केंद्रातच माथेफिरूने पेटवून दिलं होतं. 30 वर्षांनी आपण पुढारलो, समाजात समानाता आली, पुरुषांना कळायला लागलं - नो मीन्स नो - असा विचार डोक्यात यायच्या आधीच घडली हिंगणघाटची घटना.

हिंगणघाट येथे एका प्राध्यापक महिलेला जिवंत जाळण्याचा प्रकार 3 फेब्रुवारीला घडला होता. त्यानंतर या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होतो. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातील. महिला सुरक्षेबाबात सगळ्यांनी सजग असणं गरजेचं आहे, असं मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

आता अटक होईल, खटला चालेल, आपण सोशल मीडियावर आपला रागही व्यक्त करू पण मूळ प्रश्न तसाच राहील, बाईने दिलेला नकार पुरुष का पचवू शकत नाहीत?

या सुन्न करणाऱ्या घटनेची चर्चा आमच्या ऑफिसमध्येही झाली. एक सहकाऱ्याचं म्हणणं होतं की पिक्चर पाहून असल्या माथेफिरुंची डोकी फिरतात. ते पाहातात हिरो कसा हिरोईनचा पाठलाग करत राहातो, आणि तिने वारंवार नाही म्हटलं तरी ते तिचा पाठलाग करतात, हात धरतात, आणि शेवटी ती हसते. हसी तो फसी ना? ते बघून सर्वसामान्य तरूणांची माथी भडकतात आणि तेही असं करायला पाहातात, प्रत्यक्षात ती मुलगी कधीच हो म्हणत नाही कारण नो मीन्स नो असतं.

आणि मग काय करायचं ते त्यांना कळत नाही. तिथे जन्म होतो, 'xxx मला नाही म्हणतेस' या भावनेचा. तिथेही सिनेमेच मदतीला येतात 'मैं तुम्हे भूल जाऊ, ये हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये में होने नही दुंगा,' किंवा 'अगर तुम मेरी नही हुई तो किसीकी नही,' असले डायलॉग घेऊन.

पण मग सिनेमे पाहून सगळेच का तसं करत नाहीत? सैन्यावरचा सिनेमा पाहून सगळे सैन्यात जात नाहीत किंवा, शास्त्रज्ञांचा पिक्चर पाहून भरपूर अभ्यास करत नाहीत.

कारण त्या गोष्टी करणं अवघड असतं. दुसरं म्हणजे पुरुषप्रधान मानसिकता.

"पुरुषांवर कायम हेच ठसवलं गेलंय की बाई वस्तू आहे. आपला धर्म, संस्कृती, इतकंच काय सध्याचं राजकारण हेच ठसवत असतं. आणि अशात कोणत्या स्त्रीने पुरुषाला नकार दिला, तर ही फालतू बाई मला कशी नाही म्हणाली असा विचार ते करतात," स्त्रीवादाच्या अभ्यासक आणि लेखिका मीनल जगताप सांगतात.

आपल्या धार्मिक कथांमध्येही इव्ह टीझिंग, छेडछाड, मुलींच्या मागे लागणं याचं उदात्तीकरण केलं गेलंय. पटत नसेल तर कृष्ण आणि गोपिकांच्या सगळया कथा काढून बघा. आता देवच असं करतो म्हटल्यावर आम्ही का करू नये, असा प्रश्न मर्त्य मानवाला (इथे पुरुषाला) पडला नाही तर नवलच. पण मर्त्य पुरुषाच्या दुर्दैवाने देवाला कोणती गोपिका नाही म्हणत नाही आणि त्याला इतरही काम असतात त्यामुळे बाई नाही म्हणाली नाही तर पुढे काय याचं उत्तर धर्म देत नाही, पण पितृसत्ता मात्र देते. याचा बळी फक्त बाईच ठरते का?

दडपण पुरुषांवरही

पुरुषांवरही समाजाचं दडपण असतंच. स्त्रियांपेक्षा कित्येकपटीने कमी असेल पण असतं. पुरुषांना बाईचा नकार पचवता येत नाही कारण त्यांना तसं शिकवलेलंच नसतं.

"पुरुषांच्या खांद्यावर बाईला ताब्यात ठेवण्याचं दडपण असतं. त्यांना आपली मर्दानगी सिद्ध करून दाखवावी लागते, ती कशी करणार तर बाईला कमी लेखून. म्हणूनच एखादी स्त्री जेव्हा पुरुषाला नाही म्हणते तेव्हा तुझ्यामुळे माझी समाजातली इज्जत गेली, आता लोक माझ्यावर हसतील. मग माझ्या अपमानाचं कारणच मी संपवणार अशी भावना पुरुषांच्या मनात घर करते," मीनल उलगडून सांगतात.

मुलांना कसं वाढवतोय आपण?

लहान मुलं काय ऐकत मोठी होतात? मुलीसारखा रंग वापरू नकोस, चालू नकोस, बोलू नकोस, विचार करू नकोस. समजून घेणं बाईचं काम, शांत राहणं बाईचं काम, ताकद न लागणारी लहान लहान काम करणं बाईचं काम. तू स्वयंपाकघरात जाऊ नकोस, 'अरे पुरुषासारखा पुरुष तू आणि पोरीच्या हातचा मार खातोस' हे वाक्य माझ्या शेजारणीने तिच्या मुलासाठी उच्चारलेलं मी माझ्या कानाने ऐकलंय. मुलाचं वय होतं चार आणि ज्युनिअर केजीमध्ये शेजारी बसणाऱ्या मुलीशी त्याचं भांडणं झालं होतं.

"लहानपणी मुलगा रडतो, तेव्हा काय म्हणतो आपण? काय मुलीसारखा मुळूमळू रडतोस? तिथून मनाचं कंडिशनिंग सुरु होतं," दिल्लीतल्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ शिल्पा गुप्ता सांगतात.

"शून्य ते पाच या वयातच आपण मुलांची पुरुष ही ओळख पक्की करून टाकतो की हाच मुलगा मोठा झाल्यावर बहिणीशी भांडतो, बायकोला मारतो, आईला शिवीगाळ करतो. कारण पुरुष असणं म्हणजे हेच असं त्याच्या मनावर नकळतपणे बिंबवलं गेलेलं असतं," त्या म्हणतात.

कायद्याचा धाक नाही?

अशी घटना घडली की खूप चर्चा होते, सरकारी आदेश जारी होतात, आरोपींना अटक होते, अनेकदा हे खटले फास्टट्रॅक चालतात. सर्वसामान्य जनता झाल्याप्रकाराबद्दल चीड व्यक्त करते. तरीही अशा घटना पुन्हा पुन्हा का घडत राहातात?

"महिलांवर अत्याचार करताना पुरुषांना भीती वाटत नाही हे आता पुरतं स्पष्ट झाले आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना क्लिष्ट न्यायालयीन प्रक्रियेमुळे अजूनही फाशी झाली नाही. मग बलात्कार करताना, बाईला जळताना, अॅसिड फेकताना कोण घाबरणार?" वी फॉर चेंज संस्थेच्या डॉ रश्मी पारसकर म्हणतात.

'लैंगिक हिंसा हा महिलांचा नाही, पुरुषांचाही प्रश्न'

मुळात लैंगिक हिंसा हा प्रश्न आपण बायकांपुरता मर्यादित करतो असं मत मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज या संस्थेचे हरीष सदानी मांडतात.

"अशा काही घटना घडल्या की महिला रडल्या, त्या पेटून उठल्या अशा काही बातम्या आपण वाचतो, पण पुरुषांनी यावर काय प्रतिक्रिया दिली, ते काय म्हणाले, त्यांना कसं वाटलं यावर चर्चाच होत नाही. महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य अजूनही त्यांच्या लैंगिकता धोरणाबाबतीत उदासीन आहे. सहमती म्हणजे काय? असहमती म्हणजे काय अशा गोष्टींबद्दल आपण शाळा कॉलेजमध्ये कधी बोलणार? सेक्स किंवा स्त्री-पुरुषाची शरीररचना एवढंच लैंगिक शिक्षणात येतं का?" ते पोडतिडकीने बोलतात.

पुरुषसत्तेचे बळी पुरुषही ठरतात या गोष्टीचाही ते पुनरुच्चार करतात. "तुम्ही पुरुषांना वगळून पुरुषांनी केलेल्या अत्याचाराचे प्रश्न कसे सोडवणार? त्यांच्याशी निकोप चर्चा व्हायला हवी, तीही शाळकरी वयापासूनच."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)